|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » यालागीं न वचें कौंडिण्यपुरा

यालागीं न वचें कौंडिण्यपुरा 

बलरामदादांनी रुक्मिणीला उपदेश केला व तिला श्रीकृष्णाच्या स्वरूपाचा बोध प्राप्त झाला. त्यानंतर काय घडले ही कथा एकनाथ महाराज वर्णन करतात.

यापरी कृष्णपत्नी । रामें प्रबोधिली वचनीं। रुक्मिया दिधला सोडोनी । विरुपपणी सलज्ज।। दीन हीन गेली कळा । वीर्यशौर्य मुकला बळा । केवी मुख दाखवूं भूपाळा । भीमकबाळा न सुटेचि ।। पित्याने म्हणीतले नपुंसक । त्या वचनाचे थोर दु:ख। दाविता त्रूपतेचे मुख । सकळ लोक हांसती ।। प्रतिज्ञा करूनि वाहिली आण । रणी विभांडोनि श्रीकृष्ण ।भीमकी आणीन मी जाण । तोही पण सिद्धी नपवेचि ।। यालागी न वचें कौंडिण्यपुरा । लाजां राहिला बाहिरा। उभवोनि भोजकटनगरा । वस्तीसी थारा तेणे केला ।।

कृष्णाने रुक्मीला सोडून दिले. रुक्मी मानी होता. त्याला वडिलांनी नपुंसक म्हटले. त्याचा राग त्याच्या मनात होता. रागाच्या भरात त्याने प्रतिज्ञा केली होती. कृष्णाचा रणात पराभव करून मी रुक्मिणीला परत आणेन. नाही आणली तर कुंडिनपुरात प्रवेश करणार नाही. तो आपली प्रतिज्ञा पुरी करू शकला नाही. त्यामुळे प्रतिज्ञेप्रमाणे तो कुंडिनपुरात परत गेला नाही. कुंडिनपुराच्या बाहेर भोजकट नावाचे शहर वसवून तो तिथे राहिला.

रुक्मिया सोडिल्यापरी । यादवांच्या दळभारी ।

लागलिया निशाणभेरी । जयजयकारी गर्जती ।।

यापरी रणांगणी । जिणोनि महावीर श्रेणी ।

कृष्ण आणिली रुक्मिणी । अतिविदानी लाघवी ।।

कृष्ण निघाला वेगेंसी । आला प्रभासक्षेत्रासी ।

तेथे पूजोनि सोमनाथसी । दुसे चोपाशी दिधली ।।

पाहोनि सावकाश वाडी । कटक उतरले निरवडी ।

हट चोहट परवडी । घडामोडी वस्तूंची ।।

राजे प्रजा देशदेशिक ।नगर नागरिक लोक ।

उपायने जी अनेक । येती सम्युख घेऊनी ।।

रुक्मी गेल्यावर यादवांनी आनंदाने जयजयकार केला. रणवाद्यांचा गजर केला. सारे यादव दळ परत निघाले. त्यावेळी तो किन्नर आला. त्याने श्रीकृष्णाचे पाय धरले. त्याने कुंडिनपुराच्या राजसभेत कृष्णाचे वर्णन करून रुक्मिणी कृष्णाला अर्पण करावी असे सांगितले होते. ते कार्य पूर्ण झाले. त्याचे किन्नरकवच फुटले व तो शापमुक्त झाला. तो वेदघोष ब्राह्मण झाला. त्याला उःशाप मिळाला होता की अंबिकालयात रुक्मिणी कृष्णाला माळ घालेल तेव्हा तू शापमुक्त होशील. त्याप्रमाणे तो शापमुक्त झाला व कृष्णाला वंदन करून मधुवनात निघून गेला. तिथे तो अहोरात्र वेदाध्ययन करू लागला. मग कृष्णाने साऱया यादव सैन्याची पाहणी केली. ज्यांना जखमा झाल्या होत्या त्यांना मलमपट्टी केली. काही जणांकडे भगवंताने नुसत्या कृपादृष्टीने पाहिले तर ते बरे झाले. जखमी घोडय़ांना भगवंताने हस्तस्पर्शाने बरे केले. सारथ्यांनाही धीर देऊन वेदनामुक्त केले. सर्वांची चौकशी करून उपचार केले. मग सैनिकांना अहेर वाटले. ज्यांच्या त्यांच्या योग्यतेप्रमाणे सैनिकांचे, सेनेतील पराक्रमी वीरांचे सत्कार केले. अनेकांचा सन्मान केला.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: