|Monday, January 27, 2020
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स-निफ्टी दुसऱया दिवशीही उच्चांकावर

सेन्सेक्स-निफ्टी दुसऱया दिवशीही उच्चांकावर 

नफा कमाईमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण

वृत्तसंस्था / मुंबई

चालू सप्ताहात मुंबई शेअर बाजारात सलग दुसऱया दिवशीही मंगळवारी नफा कमाईमुळे सेन्सेक्स आणि निफ्टी यांनी नव्या विक्रमाची नोंद करत सर्वोच्च उच्चांक गाठला आहे. मंगळवारी बाजारात एचडीएफसी, आयटीसी, ऍक्सिस बँक आणि टीसीएस यांच्या समभागात नफा कमाईमुळे तेजी पहावयास मिळाली आहे.

दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्स 92.94 अंकानी वधारुन निर्देशांक  41,952.63 वर बंद झाला आहे. तर राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 32.75 अंकानी वधारुन  निर्देशांक 12,362.30 वर बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.

मागील सप्ताहात बाजारात अमेरिका आणि इराण यांच्यातील तणावामुळे शेअर बाजाराचा प्रवास चढउताराचा राहिला आहे. परंतु दोन्ही देशातील तणावाच्या वातावरण सध्या काही प्रमाणात निवळल्याने बाजारा सावरला असल्याचे दिसून येत आहे. यामुळे नवीन सप्ताहाच्या पहिल्याच दिवशी नवा विक्रम गाठण्यास बाजाराला यश मिळाले आहे.

तिमाही आकडे-अर्थसंकल्पाची चाहूल

डिसेंबर तिमाहीचे कंपन्यांचे नफा कमाईचे आकडे सादर होत आहेत, त्याच्या आधारे विविध समभागांमध्ये नफा कमाई झाली आहे.  दुसऱया बाजूला लवकरच सादर होणाऱया अर्थसंकल्पाच्या चाहूलीमुळे बाजारात उत्साहाचे वातावरण पहावयास मिळत आहे. 

दिग्गज कंपन्यांमध्ये हीरोमोटो कॉर्प सर्वाधिक 2.15 टक्के तेजी मिळवली आहे. सोबत आयटीसी 1.74, एनटीपीसी 1.48. महिंद्रा ऍण्ड महिंद्रा 1.43, टेक महिंद्रा 1.42, ऍक्सिस बँक 1.38, नेस्ले 1.32 एचडीएफसी 1.1 आणि टीसीएस यांचे समभाग 0.74 टक्क्यांनी वधारले आहेत.

Related posts: