|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » हिमस्खलनात 5 हुतात्मा

हिमस्खलनात 5 हुतात्मा 

जम्मू-काश्मीरमध्ये जोरदार हिमवृष्टी : 5 नागरिकांचा मृत्यू : सैन्याने वाचविले अनेकांचे प्राण

वृत्तसंस्था/ श्रीनगर

उत्तर काश्मीरमध्ये रविवारपासून जोरदार हिमवृष्टी होत असल्याने सोमवारी अनेक ठिकाणी हिमस्खलन झाले आहे. माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीकच्या सैन्यचौकीवर हिमस्खलनामुळे बर्फाचा ढिगारा कोसळल्याने 4 सैनिकांना हौतात्म्य आले आहे. तर 5 सैनिक बर्फाखाली अडकून पडले होते. यातील 4 जणांना वाचविण्यात आले आहे. नौगाम सेक्टरमध्ये तैनात बीएसएफचा जवान हिमस्खलनात सापडून हुतात्मा झाला आहे.

मध्य काश्मीरच्या गांदरबल जिल्हय़ात हिमस्खलनाच्या तावडीत सापडल्याने 5 नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. तर लडाखच्या किनौरमध्ये हेलिकॉप्टरच्या मदतीने अडकून पडलेल्या पर्यटकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. रामपूर आणि गुरेज सेक्टरमध्येही हिमस्खलनामुळे सैन्याच्या चौक्यांना नुकसान पोहोचले आहे. तेथेही एक जवान हुतात्मा झाल्याचे सांगण्यात येत असले तरीही याची अधिकृत पुष्टी मिळू शकलेली नाही. बर्फात अडकून पडलेल्या जवानांना वाचविण्यासाठी वायुदलाची मदत घेतली जात आहे. जोरदार हिमवृष्टीमुळे कुपवाडा, बांदीपोरा आणि बारामुल्ला जिल्हय़ातील घरांना नुकसान पोहोचले आहे.

4 जवानांना वाचविले

माछिल सेक्टरमध्ये नियंत्रण रेषेनजीक झालेल्या हिमस्खलनाचा सैन्याच्या चौकीला फटका बसला आहे. या हिमस्खलनानंतर बर्फाच्या ढिगाऱयाखाली अडकून पडल्याने 4 सैनिक हुतात्मा झाले आहेत. तर बर्फात अडकून पडलेल्या 5 सैनिकांना बाहेर काढण्यासाठी सैन्याची मोहीम सुरूच आहे. सैन्याने 4 सैनिकांना सुखरुप बाहेर काढले असून एकाचा शोध घेतला जात आहे. खराब हवामानामुळे सैनिकांच्या उपचारात अडथळे येत आहेत.

पर्यटकांना हलविले

लडाखमध्ये हिमवृष्टीमुळे अडकून पडलेल्या पर्यटकांसाठी सैन्याकडून शोध आणि बचावमोहीम राबविली जात आहे. लडाखमध्ये गोठलेल्या नदीवर गिर्यारोहण करताना खराब हवामानामुळे अडकून पडलेल्या पर्यटकांना वाचविण्यासाठी फायर अँड फ्युरी कॉर्प्सने अनेक मोहिमा हाती घेतल्या आहेत. सातत्याने बर्फात राहिल्याने फ्रॉस्टबाइट (शीतदंश) आणि अत्याधिक उंचीच्या क्षेत्रात श्वसनप्रक्रियेत त्रास होत असल्याने गंभीर आजारी असलेल्या 6 पर्यटकांना हेलिकॉप्टरच्या मदतीने लेहच्या सैन्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गांदरबलमध्ये वाचविले प्राण

गांदरबल जिल्हय़ाच्या कुल्लन भागात सोमवारी रात्री हिमटेकडीचा भाग कोसळल्याने 9 जण गाडले गेले होते. तेथे सैन्याच्या पथकाने बर्फाखाली गाडले गेलेल्या लोकांना बाहेर काढले आहे. 4 जणांचा जीव वाचविण्यास यश आले असून 5 जणांचा मृत्यू झाला आहे. तर बारामुल्ला जिल्हय़ाच्या गुलमर्गमध्ये हिमस्खलनात अडकून पडलेल्या दोन मुलींना वाचविण्यात आले आहे.

Related posts: