|Monday, January 27, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » भारतातील सद्यस्थिती दुःखद : नडेला

भारतातील सद्यस्थिती दुःखद : नडेला 

स्थलांतरितांचा प्रश्न जगभरात : भारतीय संस्कृतीबद्दल गर्व, उदारमतवादी मूल्यांची जपणूक व्हावी

वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन

 मायक्रोसॉफ्ट या दिग्गज  कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबद्दल भाष्य केले आहे. कायद्यावरून देशभरात सुरू असलेल्या निदर्शनांना त्यांनी दुःखद ठरविले आहे. बजफीड या संकेतस्थळाचे संपादक बेन स्मिथ यांनी ट्विट करत याची माहिती दिली आहे.

स्मिथ यांनीच नडेला यांना या कायद्यासंबंधी प्रश्न विचारला होता. भारतात सद्यकाळात जे घडत आहे, ते दुःखद आहे. एखादा बांगलादेशी स्थलांतरिताने भारतात येऊन मोठी कंपनी सुरू केल्यास किंवा इन्फोसिस सारख्या कंपनीचा पुढील सीईओ झाल्यास आनंदच होईल, असे नडेला यांनी म्हटले आहे. नडेला यांनी मॅनहॅटनमध्ये मायक्रोसॉफ्टच्या कार्यक्रमात संपादकांशी बोलताना स्वतःचे म्हणणे मांडले आहे.

कुठल्याही देशाने सुरक्षेसंबंधी चिंता करू नये असे मी म्हणत नाही. देशांमध्ये सीमा असतात आणि ही वस्तुस्थिती आहे. स्थलांतर हा अमेरिकेसमोरील गंभीर प्रश्न आहे, युरोप आणि भारताचाही मुद्दा आहे. मात्र स्थलांतर म्हणजे काय, शरणार्थी कोण आणि अल्पसंख्याक समूह कोण हे तुम्ही कोणत्या आणि कशाच्या आधारे ठरवता हे महत्त्वाचे असल्याचे नडेला यांनी म्हटले आहे.

स्वतःचा सांस्कृतिक वारसा मिळालेल्या ठिकाणाबद्दल मला गर्व आहे. हैदराबादमध्ये ही लहानाचे मोठे होण्यासाठी सर्वात चांगली जागा असल्याचे नेहमीच वाटते. आम्ही ईद, नाताळ आणि दिवाळीही साजरी करत होतो, असे त्यांनी म्हटले आहे.

भारतीय वारशासह मी वाढलो आहे. स्थलांतरित एक समृद्ध स्टार्टअप सुरू करणे किंवा बहुराष्ट्रीय कंपनीचे नेतृत्व करण्याचे स्वप्न पाहू शकेल अशा भारताची अपेक्षा करतो. मी एका जागतिक कंपनीचा मुख्य कार्यकारी अधिकारी असून त्याचे शेय भारतातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराला आणि अमेरिकेच्या स्थलांतर विषयक धोरणाला जात असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी भारतातील सर्वसमावेशक संस्कृतीचाही उल्लेख केला आहे. उदारमतवादी मूल्यांमुळे भांडवलशाहीला बळ मिळत असल्याचे ते म्हणाले.

Related posts: