|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » निळेली येथे युवतीची आत्महत्या

निळेली येथे युवतीची आत्महत्या 

वार्ताहर / कुडाळ:

निळेली येथील पशुपैदास केंद्राच्या वसाहतीत राहणाऱया सायली वासुदेव धुरी (26) हिने मागील खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. सोमवारी मध्यरात्री दिडच्या सुमारास ही घटना घडली. सायलीला मानसोपचार तज्ञांकडून औषधोपचार सुरू होते.

वासुदेव धुरी माणगाव-धुरीवाडी येथील मूळ रहिवासी आहेत. निळेली पशुपैदास केंद्रात ते नोकरीला असून तेथील वसाहतीमध्ये ते कुटुंबासह राहतात. काल रात्री ते पशुपैदास केंद्रात कामाला गेले. सायली हिने जेवण केले आणि ती आपल्या आईसोबत झोपली. मध्यरात्री दिडनंतर तिच्या आईला जाग आली. तेव्हा सायली अंथरुणावर दिसली नाही. तिचा शोध घेत असताना मागील खोलीत तिचा मृतदेह गळफास लावलेल्या स्थितीत निदर्शनास आला.

माणगाव पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक देवानंद माने, पोलीस नाईक सचिन सोन्सुरकर व पो. कॉ. अजय फोंडेकर घटनास्थळी दाखल झाले. कुडाळच्या पोलीस उपनिरीक्षक शीतल पाटील यांनी पंचनामा केला. कुडाळ येथे मृतदेहाचे विच्छेदन करून तो नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सायली हिच्यावर मानसोपचार तज्ञांकडून औषधोपचार सुरू होते. त्याच मनस्थितीत तिने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Related posts: