|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » जि. प. वर आता ‘महिला राज’

जि. प. वर आता ‘महिला राज’ 

सहापैकी चार महिला पदाधिकारी : विषय समिती सभापती निवडी बिनविरोध

प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या चारही विषय समिती सभापती पदांच्या निवडी बिनविरोध झाल्या. महिला व बालविकास सभापतीपदी माधुरी बांदेकर, समाजकल्याण सभापतीपदी शारदा कांबळी आणि अन्य दोन सभापती पदासाठी सावी लोके व रवींद्र जठार यांची निवड झाली. त्यांचे खातेवाटप नंतर होणार आहे. बिनविरोध निवडी झाल्या असल्या, तरी अनेक इच्छुक उमेदवारांचे पत्ते कट झाल्याने नाराजी दिसून येत होती दरम्यान सहा पदाधिकाऱयांपैकी चार महिला पदाधिकारी झाल्याने जि. प. वर महिला राज राहणार आहे.

जि. प. पदाधिकाऱयांची अडीच वर्षांची मुदत संपल्यानंतर पुढील अडीच वर्षांसाठी सर्वप्रथम 30 डिसेंबर 2019 रोजी अध्यक्ष व उपाध्यक्ष पदाची निवडणूक झाली. यामध्ये राणे समर्थक भाजप गटाचेच वर्चस्व राहिले. त्यानंतर मंगळवारी जि. प. च्या चार विषय समिती सभापतीपदांसाठी निवडणूक निर्णय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी वर्षा शिंगण यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक झाली. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर उपस्थित होते.

सर्व निवडी बिनविरोध

देवगड तालुक्यातील मिठबाव जि. प. मतदारसंघाच्या सदस्या सावी गंगाराम लोके, कणकवली तालुक्यातील खारेपाटण जि. प. मतदारसंघाचे सदस्य रवींद्र उर्फ बाळा कांतीलाल जठार, महिला व बाल विकास सभापती पदासाठी मालवण तालुक्यातील सुकळवाड जि. प. मतदारसंघाच्या सदस्या माधुरी महेश बांदेकर आणि समाजकल्याण सभापतीपदासाठी वैभववाडी तालुक्यातील तिथवली जि. प. मतदारसंघाच्या सदस्या शारदा शरद कांबळी यांची नावे सुचविण्यात आली. त्या प्रमाणे निवडणुकीसाठी अर्ज भरले गेले. मात्र त्यांच्या विरोधात शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज भरले न गेल्याने सभापती निवडी बिनविरोध झाल्या. पीठासन अधिकाऱयांनी या निवडी बिनविरोध झाल्याची घोषणा केली. त्यानंतर उपस्थितांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

शिक्षण, आरोग्य सावी लोकेंकडे?

सभापती निवडीच्या वेळी जि. प. अध्यक्ष समिधा नाईक, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, माजी अध्यक्षा संजना सावंत, माजी उपाध्यक्ष रणजित देसाई, सर्व मावळते पदधिकारी, सदस्य उपस्थित होते. सभापती निवडीमध्ये सावी लोके व रवींद्र जठार यांना अद्याप खाते वाटप झालेले नाही. जि. प. च्या सर्वसाधारण सभेत खाते वाटप केले जाणार आहे. माहितीनुसार, शिक्षण व आरोग्य खाते सावी लोके यांना, तर वित्त व बांधकाम खाते रवींद्र जठार यांना देण्याचे निश्चित झाले आहे.

समन्वयाने काम करणार

सभापती निवडीनंतर नवनिर्वाचित पदाधिकाऱयांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना सर्व पदाधिकारी समन्वयाने काम करणार आहेत. जि. प. च्या सर्व योजना तळागाळापर्यंत पोहोचविल्या जाणार आणि वरिष्ठ नेत्यांनी टाकलेला विश्वास सार्थकी लावणार, अशी प्रतिक्रिया सर्वांनीच व्यक्त केली.

जि. प. वर आता महिला राज

जि. प. मधील एकूण सहा पदाधिकाऱयांपैकी चार पदाधिकारी महिलाच आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी सुद्धा महिलाच आहेत. त्यामुळे सिंधुदुर्ग जि. प. वर महिला राज राहणार आहे. दरम्यान पदाधिकारी निवडी बिनविरोध झाल्या असल्या, तरी इच्छुकांचे पत्ते कट झाल्याने अनेक सदस्यांमध्ये नाराजी दिसून आली. विशेषत: शर्वाणी गावकर, उन्नती धुरी, उत्तम पांढरे, महेंद्र चव्हाण तसेच मावळते पदाधिकारी अंकुश जाधव, डॉ. अनिशा दळवी यांनी आपण नाराज नसल्याचे सांगितले असले, तरी त्यांच्या चेहऱयावरील नाराजी त्यांना लपवता येत नव्हती.

आमदारांचे वर्चस्व, कुडाळ, सावंतवाडीची पाटी कोरी

 जि. प. पदाधिकारी निवडी पाहिल्यास कुडाळ व सावंतवाडी तालुक्याला प्रतिनिधीत्व न मिळाल्याने या दोन तालुक्यांची पाटी कोरीच राहिली, तर या चार सभापती पदांच्या निवडीत आमदार नीतेश राणे यांच्या कणकवली विधानसभा मतदारसंघाचे वर्चस्व राहिले. चारपैकी तीन पदाधिकारी कणकवली मतदारसंघातील, तर एक सभापतीपद मालवण तालुक्याला दिले गेले. दोडामार्ग व वेंगुर्ल्याला अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडीच्यावेळी प्रतिनिधीत्व दिले गेले. कुडाळ व सावंतवाडीला प्रतिनिधीत्व मिळाले नाही.

Related posts: