|Thursday, February 20, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » जामा मशीद पाकमध्ये नाही

जामा मशीद पाकमध्ये नाही 

न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

धार्मिक स्थळांबाहेर निदर्शने करता येत नाहीत, असे तुम्हाला कोणी सांगितले?, तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली आहे का?,  जामा मशीद दिल्लीत आहे; मग येथे निदर्शने करण्याची परवानगी कशी नाकारता. जामा मशीद पाकिस्तानमध्ये असल्यासारखे वर्तन तुम्ही करत आहात, अशा शब्दात मंगळवारी येथील तीस हजारी न्यायालयाने दिल्ली पोलिसांना फटकारले. नागरिकत्व सुधारणा कायद्या (सीएए) विरोधातील आंदोलनप्रकरणी अटकेत असलेले भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या जामीन अर्जावरील सुनावणीवेळी न्यायालयाने पोलिसांच्या भूमिकेवर अनेक प्रश्न उपस्थित केले. याप्रकरणी बुधवारीही सुनावणी होणार आहे.

  दिल्लीतील दरियागंज परिसरात ‘सीएए’विरोधातील आंदोलनास हिंसक वळण लागले होते. तसेच भीम आर्मीने 20 डिसेंबर रोजी जामा मशीद ते जंतर-मंतर या मार्गावर मोर्चाचे आयोजन केले होते. याप्रकरणी भीम आर्मीचे चंद्रशेखर आझाद यांना अटक झाली होती. त्यांनी जामीनासाठी तीस हजारी न्यायालयात अर्ज केला होता. पोलिसांनी केलेले आरोप संदिग्ध आहेत. केवळ संशयावरून अटक करण्यात आली. कारवाईवेळी नियमांचे पालन झाले नसल्याचा दावा चंद्रशेखर यांचे वकील महमूद प्राचा यांनी केला. धार्मिक स्थळांबाहेर आंदोलनास परवानगी नसल्याचा नियम आहे, असे सरकारी वकिलांनी या वेळी सांगितले. यावेळी न्यायाधीश म्हणाले की, दिल्ली पोलिसांनी आजपर्यंत अत्यंत किरकोळ प्रकरणातही पुरावे सादर केले आहेत; मग याप्रकरणी पुरावे का सादर केले नाहीत. धार्मिक स्थळांबाहेर निदर्शने करता येत नाहीत, असे तुम्हाला कोणी सांगितले. तुम्ही भारतीय राज्यघटना वाचली आहे का, शांततापूर्णरित्या नागरिक आंदोलन करू शकतात. जामा मशीद पाकिस्तानमध्ये नाही दिल्लीतच आहे; मग या परिसराबाहेर निदर्शने करण्याची  परवानगी कशी नाकारता, चंद्रशेखर आझाद यांनी केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांना कोणती अडचणी होती, अशी प्रश्नांची सरबत्ती न्यायाधीशांनी केली. तसेच बुधवारी जामीन अर्जावर सुनावणी होईल, असे स्पष्ट केले.

Related posts: