|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » वानखेडेवर सीएएविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने

वानखेडेवर सीएएविरोधात विद्यार्थ्यांची निदर्शने 

वृत्तसंस्था/ मुंबई

भारत व ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यावेळी सामना पाहण्यासाठी आलेल्या विद्यार्थ्यांच्या एका समूहाने नागरिकता सुधारणा कायदा व नियोजित एनआरसीच्या विरोधात निदर्शने केली.

या विद्यार्थ्यांनी पांढऱया टी-शर्ट्सवर नो सीएए, नो एनपीआर, नो एनआरसी अशी इंग्रजी अक्षरांतील बॅनर्स लावले होते. मात्र भारताचा डाव संपण्याआधी ते स्टेडियम सोडून बाहेर गेले. ‘मुंबई अगेन्स्ट सीएए’ या ग्रुपचे ते सदस्य आहेत. ‘एकूण 26 जण विजय मर्चंट पॅव्हेलियनच्या स्टँडमध्ये बसले होते. भारताचे गडी झटपट बाद होऊ लागल्यानंतर ते मैदान सोडून बाहेर गेले,’ असे या ग्रुपचा एक सदस्य फवाद अहमदने सांगितले.

स्टेडियममध्ये काळे कपडे परिधान केलेल्यांनाही आत सोडले जात नव्हते, असे वृत्त सोशल मीडियावर पसरले होते. मात्र मुंबई क्रिकेट संघटनेच्या एका वरिष्ठ अधिकाऱयाने अशी कोणतीही सूचना किंवा आदेश दिला नसल्याचे स्पष्ट केले. स्थानिक पोलिसांनी दिलेल्या आदेशामुळे सुरक्षा रक्षकांकडून काळे कपडे परिधान केलेल्यांना प्रवेश दिला जात नव्हता, असेही त्यांनी सांगितले. या सुधारित कायद्यासंदर्भात पंतप्रधान मोदी यांनी विद्यार्थ्यांची भेट घ्यावी, असे या विद्यार्थ्यांच्या समूहाची मागणी असल्याचे सांगण्यात आले.

Related posts: