|Monday, January 27, 2020
You are here: Home » क्रिडा » ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत चारीमुंडय़ा चीत

ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत चारीमुंडय़ा चीत 

विराटसेनेचा पहिल्या वनडेत 10 गडय़ांनी धुव्वा, वॉर्नर, फिंचची 258 धावांची अभेद्य सलामी निर्णायक

मुंबई / वृत्तसंस्था

कर्णधार ऍरॉन फिंच व डेव्हिड वॉर्नर यांनी झंझावाती नाबाद शतके झळकावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने येथील पहिल्या वनडेत यजमान भारतीय संघाचा तब्बल 10 गडी राखून फडशा पाडला आणि 3 सामन्यांच्या या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. विजयासाठी 256 धावांचे आव्हान असताना फिंचने नाबाद 110 तर डेव्हिड वॉर्नरने नाबाद 128 धावांची आतषबाजी साकारली व 74 चेंडूंचा खेळ बाकी राखत निव्वळ एकतर्फी विजय संपादन केला.

या लढतीत प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर भारताला 50 षटकांचा कोटाही पूर्ण करता आला नाही. ठरावीक अंतराने गडी बाद होण्याचा सिलसिला कायम राहिल्यानंतर भारताचा डाव 49.1 षटकात सर्वबाद 255 धावांवर संपुष्टात आला. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने एकही गडी न गमावता 37.4 षटकात विजयाचे लक्ष्य गाठले.

विजयासाठी 256 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरल्यानंतर वॉर्नर, फिंच फटकेबाजी करणार, हे अपेक्षितच होते. पण, या दोघांनीच बाजी मारुन दिली, ते अधिक अनपेक्षित ठरले. एकीकडे, डावखुऱया वॉर्नरने 112 चेंडूत 17 चौकार व 3 उत्तूंग षटकारांसह 128 धावांचा झंझावात साकारला तर दुसरीकडे, ऍरॉन फिंचनेही तोलामोलाचीच साथ देत 114 चेंडूत 13 चौकार, 2 षटकारांसह नाबाद 110 धावांची खेळी साकारली. या जोडगोळीच्या फटकेबाजीत जसप्रित बुमराहचे (7 षटकात 0-50) चार महिन्यानंतरचे पुनरागमन पूर्णपणे झाकोळले गेले. शिवाय, शमी (7.4 षटकात 0-58), शार्दुल ठाकुर (5 षटकात 0-43), कुलदीप यादव (10 षटकात 0-55), रविंद्र जडेजा (8 षटकात 0-41) यांची पाटीही कोरीच राहिली.

फलंदाजीतील अपयश नडले

तत्पूर्वी, फलंदाजीतील अपयश नडल्यानंतर भारताला 49.1 षटकात सर्वबाद 255 या किरकोळ धावसंख्येवर समाधान मानणे भाग पडले. धवनचे अर्धशतक, हे भारताच्या डावातील एकमेव वैशिष्टय़ ठरले. याशिवाय, केवळ केएल राहुलनेच (47) अर्धशतकाच्या उंबरठय़ापर्यंत मजल मारली. सलामीवीर रोहित शर्मा (10) स्वस्तात बाद झाल्यानंतर या जोडीने दुसऱया गडय़ासाठी 136 चेंडूत 121 धावांची भागीदारी साकारली. या भागीदारीमुळे भारतीय संघ मोठी धावसंख्या उभी करेल, अशी चिन्हे जरुर होती. पण, नंतर अचानक डाव गडगडला आणि यजमान भारतीय संघाला यातून शेवटपर्यंत सावरता आले नाही.

प्रारंभी, रोहितने मिशेल स्टार्कच्या (3-56) गोलंदाजीवर मिडऑफवर तैनात वॉर्नरकडे झेल दिला तर अर्धशतकापासून 3 धावांनी दूर असलेल्या केएल राहुलची एकाग्रता अचानक भंगली व त्याने ऍगरच्या गोलंदाजीवर कव्हर्सवर स्मिथकडे सोपा झेल दिला. त्यानंतर पुढील षटकातच धवनला पॅट कमिन्सने (2-44) ऍगरकडे झेल दिला. राहुलच्या 61 चेंडूतील खेळीत 4 चौकार तर धवनच्या 91 चेंडूतील खेळीत 9 चौकार, 1 षटकाराचा समावेश राहिला.

विराट ठरला झाम्पाचा बळी

धवन, रोहित व केएल राहुल या तिघांनाही संघात सामावून घेण्यासाठी स्वतः चौथ्या स्थानी उतरलेल्या विराटने (16) आक्रमक सुरुवात केली. पण, नंतर झाम्पाने स्वतःच्या गोलंदाजीवरच अप्रतिम झेल टिपत त्याची खेळी संपुष्टात आणली. श्रेयस अय्यर (4) स्वस्तात परतल्यानंतर ऋषभ पंत (28) व रविंद्र जडेजा (25) यांनी सहाव्या गडय़ासाठी 49 धावांची भागीदारी केली. पण, हे दोघेही लागोपाठ षटकात बाद झाले आणि भारताची पुन्हा एकदा पिछेहाट झाली.  डावाच्या उत्तरार्धात कुलदीप (17) व शमी (10) यांनी थोडीफार फटकेबाजी करण्याचा प्रयत्न केला. 

धावफलक

भारत : रोहित शर्मा झे. वॉर्नर, गो. स्टार्क 10 (15 चेंडूत 2 चौकार), शिखर धवन झे. ऍगर, गो. कमिन्स 74 (91 चेंडूत 9 चौकार, 1 षटकार), केएल राहुल झे. स्मिथ, गो. ऍगर 47 (61 चेंडूत 4 चौकार), विराट कोहली झे. व गो. झाम्पा 16 (14 चेंडूत 1 षटकार), श्रेयस अय्यर झे. कॅरे, गो. स्टार्क 4 (9 चेंडू), ऋषभ पंत झे. टर्नर, गो. कमिन्स 28 (33 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), रविंद्र जडेजा झे. कॅरे, गो. रिचर्डसन 25 (32 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), शार्दुल ठाकुर त्रि. गो. स्टार्क 13 (10 चेंडूत 2 चौकार), मोहम्मद शमी झे. कॅरे, गो. रिचर्डसन 10 (15 चेंडूत 1 चौकार), कुलदीप यादव धावचीत (स्मिथ) 17 (15 चेंडूत 2 चौकार), जसप्रित बुमराह नाबाद 0 (0 चेंडू). अवांतर 11. एकूण 49.1 षटकात सर्वबाद 255.

गडी बाद होण्याचा क्रम

1-13 (रोहित, 4.3), 2-134 (केएल राहुल, 27.1), 3-140 (धवन, 28.5), 4-156 (विराट, 31.2), 5-164 (श्रेयस, 32.5), 6-213 (रविंद्र जडेजा, 42.1), 7-217 (ऋषभ, 43.2), 8-229 (शार्दुल, 44.5), 9-255 (कुलदीप, 48.6), 10-255 (शमी, 49.1).

गोलंदाजी

मिशेल स्टार्क 10-0-56-3, पॅट कमिन्स 10-1-44-2, केन रिचर्डसन 9.1-0-43-2, ऍडम झाम्पा 10-0-53-1, ऍस्टॉन ऍगर 10-1-56-1.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर नाबाद 128 (112 चेंडूत 17 चौकार, 3 षटकार), ऍरॉन फिंच नाबाद 110 (114 चेंडूत 13 चौकार, 2 षटकार). अवांतर 20. एकूण 37.4 षटकात बिनबाद 258.

गोलंदाजी

मोहम्मद शमी 7.4-0-58-0, जसप्रित बुमराह 7-0-50-0, शार्दुल ठाकुर 5-0-43-0, कुलदीप यादव 10-0-55-0, रविंद्र जडेजा 8-0-41-0.

पाया रचला, कळसारोहणही केले!

विजयासाठी 256 धावांचे तुलनेने किरकोळ आव्हान असताना डावखुरा डेव्हिड वॉर्नर व कर्णधार ऍरॉन फिंच यांनी भारताच्या हरएक गोलंदाजावर जोरदार हल्ला चढवला आणि यातच भारतीय संघ पुरता नेस्तनाबूत झाला. मोहम्मद शमी (7.56), बुमराह (7.14), शार्दुल ठाकुर (8.60), कुलदीप (5.50) व रविंद्र जडेजा (5.12) या सर्वांची इकॉनॉमी यात बिघडून गेली. यादरम्यान, वॉर्नर व फिंच यांनी भक्कम पायाभरणी केल्यानंतर ऑस्ट्रेलियासाठी विजयाचे कळसारोहणही करुन दिले.

Related posts: