|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » चेन स्नॅचिंग करणाऱया तिघांना अटक

चेन स्नॅचिंग करणाऱया तिघांना अटक 

वार्ताहर/ पाटण

पाटण पोलीस ठाण्यासह कराड तसेच कोल्हापूर जिह्यातील वडगाव, कोडोली, शाहूवाडी याठिकाणी घडलेल्या नऊ गुह्यांमधील तब्बल 18 तोळे सोन्याचे दागिने व एक दुचाकी असा 7 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करत, यातील सराईत गुन्हेगारांसह त्याच्या अन्य दोन सहकाऱयांना ताब्यात घेण्यात पाटण पोलिसांना यश मिळाले आहे. अल्पावधीतच तपास करून मुद्देमालासह आरोपींना अटक करण्यात दाखवलेली तत्परता लक्षात घेऊन संबंधित अधिकारी व कर्मचाऱयांना बक्षीस देण्याची शिफारस करण्यात आली आहे. या आरोपींकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याच्या दाट शक्यता असल्याची माहिती जिल्हा अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी दिली. पाटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, साहाय्यक पोलीस निरीक्षक तृप्ती सोनवणे उपस्थित होत्या.

सराईत गुन्हेगार लक्ष्मण चंद्रकांत चाळके (वय 28, रा. चांदोली वसाहत, आष्टा, ता. वाळवा), अजिंक्य विजय मळणगावकर (रा. आष्टा, जि. सांगली) यांच्यासह आणखी एका संशयितास अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून चोरीत वापरलेली दुचाकी, 18 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 7 लाख 500 रूपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.  

संबंधित आरोपींनी अशाप्रकारे नऊ ठिकाणी गुन्हे केले आहेत. त्यापैकी पाटण पोलीस ठाण्याच्या हद्दीत तीन तसेच कराडमधील एक तर कोल्हापूर जिल्हय़ातील वडगाव, वाठार (ता. हातकणंगले), कोडोली, येळावे एकुण नऊ ठिकाणी संशयितांनी चेन स्नॅचिंग केले होते. पाटण तालुक्यातील मरळी येथील वत्सलादेवी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील पालक बैठकीसाठी गेलेली मरळी येथील सत्यशीला सत्यवान मोहिते ही महिला आपली मुलगी कु. रिद्धी (वय 13) हिच्यासोबत परत येत असताना चोपदारवाडी गावाजवळ पाठिमागून दुचाकीवरून आलेल्या संशयिताने फिर्यादीच्या गळ्यातील तीन तोळे वजनाचे व एक तोळ्याचे मिनी गंठण दोन्ही मिळून सुमारे 61 हजार रूपयांचा ऐवज लंपास केला होता. त्यानंतर सत्यशीला मोहिते यांनी दिलेल्या माहितीवरून व वर्णनानुसार पाटण पोलिसात गुन्हा होता. पोलिसांनी या वर्णनावरून आरोपीचा सी. सी. टी. व्ही. फुटेजद्वारे फोटो प्राप्त केला. गोपनीय पद्धतीने आरोपीची दुचाकी व त्याचा शोध घेण्यात आला. त्यात तो आंबेघर (ता. पाटण) येथील जावई असून लक्ष्मण चंद्रकांत चाळके (रा. चांदोली वसाहत, आष्टा) असे त्याचे नाव असल्याचे स्पष्ट झाले. संशयित आरोपीच्या घरी जाऊन तपास केला असता तो सापडला नाही. परंतु तो वापरत असलेली पल्सर मोटारसायकल पोलिसांनी जप्त केली. वारंवार या आरोपीचा शोध घेतला असता तो सातत्याने आपली ठिकाणे बदलत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पोलीस तपासात त्याने या गुन्ह्य़ांची कबुली दिली. त्यानुसार या नऊ गुह्यांमधील 18 तोळे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले. त्याला या चोरीत मदत करणाऱया अजिंक्य विजय मळणगावकर (रा. आष्टा) याच्यासह अजून एक अशा एकुण तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांना पाटण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

      या गुन्हय़ांचा तपास जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्या मार्गदर्शनाखाली उप विभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात, साहाय्यक निरीक्षक तृप्ती सोनवणे, पोलीस हवालदार पाटील, चव्हाण, लोंढे, मोरे, माने, जाधव, गुरव, चालक पाटील, आळंदे यांनी केला.

शहरासह ग्रामीण भागातील प्रमुख रस्ते, बाजारपेठा, वस्त्या, दुकाने आदी ठिकाणी मोठय़ा प्रमाणावर सी. सी. टी. व्ही. बसवण्यात यावेत. त्यामुळे गुन्हे कमीत कमी घडतील व त्याचा तातडीने तपास लागू शकतो, असे धीरज पाटील यांनी केले.

Related posts: