|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » म्हादईसाठी तीव्र लढय़ाची तयारी

म्हादईसाठी तीव्र लढय़ाची तयारी 

प्रतिनिधी/ पणजी

म्हादई वाचविण्यासाठी गोवा प्रोग्रेसिव्ह प्रंट, म्हादई बचाव आंदोलन व विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी आता थेट आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. सरकारवर अवलंबून गोव्याचे भवितव्य असलेली म्हादई राखता येणार नाही हे आता सर्वांनाच कळून चुकले आहे. त्यामुळे गेले दोन दिवस पणजीत बैठका सुरू आहेत. सोमवार 13 व मंगळवार 14 रोजी सलग बैठका घेण्यात आल्या. म्हादईचा विषय घेऊन घरोघरी जाण्याची तयारीही केली जात आहे.

म्हादई बचाव आंदोलन आता म्हादईसाठी युद्ध पातळीवर काम करीत आहे. गोवा सरकार म्हादईबाबत गंभीर नाही. केंद्र सरकारने राजकीय स्वार्थापोटी कर्नाटकला सहकार्य करून म्हादईचा गळा घोटला अशी भावना म्हादई बचाव, गोवा बचाव आंदोलनाच्या नेत्यांची झाली आहे. त्यामुळे सरकारवर विसंबून न राहता थेट लोकांपर्यंत जाण्याची तयारी त्यांनी केली आहे.

राज्यभरात एक लाख पत्रके वाटणार

म्हादई वाचविण्यासाठी जनजागृती केली जाणार असून सुमारे 1 लाख पत्रके गोवाभरात घरोघरी वाटली जाणार आहेत. म्हादई वाचविण्याचे आवाहन आता लोकांनाच केले जाणार आहे. पर्यावरणपेमी, सायकलीस्ट, बायकार्स, रनर्स, स्वीमर्स अशा सर्वांनीच या आंदोलनात उतरण्याची तयारी केली आहे. लोकांमध्ये जागृती करण्याचे उपक्रम सुरू राहतील. समविचारी राजकीय पक्ष, पर्यावरणप्रेमी व लोकांच्या पाठिंब्यावर आंदोलन उभारण्याची तयारी चालली आहे.

सरकारची भूमिका उदासिन

म्हादईसंदर्भात सरकारचे नेमके धोरण काय याबाबत सध्या संभ्रम निर्माण झाला आहे. गोवा सरकार धोरण स्पष्ट करीत नाही, तर केंद्र सरकार उघडपणे कर्नाटकला पाठिंबा देत आहे. त्यामुळे गोवा सरकारच्या भूमिकेवर सध्या म्हादई बचाव अभियानला संशय आहे. कर्नाटकने ज्या पद्धतीने पाणी वळविण्याची तयारी केली आहे ते पाहता गोवा धोक्यात आहे. कर्नाटकने म्हादईचे पाणीही वळविले आहे. सरकारला या सर्व गोष्टींची जाणीव असताना सरकार शांत असल्याने अभियानचे नेते संशय व्यक्त करीत आहे.

आंदोलनाची सुरुवात 1 मार्चपासून

येत्या 1 मार्चपासून आंदोलनाला सुरुवात होईल. रन फॉर म्हादईचा उपक्रम सर्वच तालुक्यामध्ये करण्याचा विचारही चालविला आहे. साधारणपणे तीन हजार लोकांचा सहभाग या आंदोलनात असणार आहे. गोव्यातील म्हादईचा विषय माहित नाही. त्यामुळे या विषयाचे गांभीर्य लोकांपर्यंत पोचलेले नाही. या आंदोलनातून लोकांपर्यंत हा विषय नेला जाणार आहे. मंगळवारी झालेल्या बैठकीत लढा कशा पद्धतीने पुढे न्यावा व रुपरेषा कशी असावी यावर चर्चा करण्यात आली. म्हादई नाही तर गोवा नाही, हे लोकांना पटवून दिले जाणार आहे.

Related posts: