|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » कुंकळीत युवकांचा पोलिसांवर हल्ला

कुंकळीत युवकांचा पोलिसांवर हल्ला 

प्रतिनिधी/ मडगाव

समाजात कायदा व सुवस्था राखण्याचे काम ज्या यंत्रणेकडे आहे त्या यंत्रणेतील पोलीस कर्मचाऱयांवरच दारु पिऊन तर्र झालेल्या सात युवकांनी हल्ला करुन त्यांना जखमी करण्याची घटना कुंकळ्ळी येथे मंगळवारी पहाटे घडली. यातील दोन युवकांना अटक करण्यात आली आहे. उर्वरित पाचजण फरारी आहेत.

आकाश गांवकर, प्रमोद कोठारकर व महेश नाईक अशीं जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱयांची नावे आहेत.

अटक करण्यात आलेल्यांची नावे मयुर देसाई आणि शेख अब्दुल रझाक अशी असून संदीप देसाई, संतोष देसाई, शुभम बोरकर, साईश देसाई व स्वप्नेश देसाई फरारी असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांवर हल्ला करण्याची ही घटना मंगळवारी पहाटे 3 ते 4 वाजण्याच्या सुमाराला कुंकळ्ळी येथील साई सुपर स्टोअरजवळ घडली.

दारु पिऊन दंगामस्ती करत होते युवक

काही युवक रस्त्यावरच दारु पिऊन मस्ती करीत असल्याची तक्रार कोणीतरी कंट्रोल रुमला केली होती. कंट्रोल रुमने ही माहिती कुंकळी पोलिसांना दिली आणि यावर कोणती कारवाई केली याची माहिती मागविली.

पोलिसांची संख्या पडली कमी

एक जीप व दोन पोलीस कर्मचारी कुंकळहून निघाले आणि घटनास्थळी पोहोचले. तेथे एकूण सात युवक तर्र अवस्थेत होते. घटनास्थळी आलेल्या पोलिसांची संख्या कमी. एकंदर परिस्थिती पाहून आणखी पोलीस मागविण्यात आले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आणि जीपमध्ये कोंबले तेव्हा इतरांनी त्यास आक्षेप घेतला आणि येथेच पुढील प्रकार घडला.

दोघांना अटक करण्यात पोलिसांना यश

दारुच्या नशेत तर्र असलेल्या या युवकांनी घटनास्थळी आलेल्या पोलिसांवरच हल्ला चढविला आणि पोलिसांना दांडय़ानी मारहाण केली. पोलीस जखमी झाले. तर्र झालेल्या युवकांनी दोन्ही पोलीस जीपची हानीही केली. ही घटना कुंकळी पोलीस स्थानकावर कळताच इतर पोलीस आले आणि त्यांनी यातील दोघांना अटक केली. उर्वरित पाचजण फरारी झाले अशी पोलिसांनी रात्री माहिती दिली.

अटक केलेल्या आणि फरारी असलेल्या सर्व आरोपीविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या 143, 147, 148, 323, 324, 352, 506 (2) कलमाखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. त्याशिवाय सार्वजनिक मालमत्तेची हानी केल्याच्या आरोपावरुनही या आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद केला असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Related posts: