|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » तरूण भारतचे पत्रकार डाकवेंना राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

तरूण भारतचे पत्रकार डाकवेंना राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर 

तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील डाकेवाडी (काळगांव) येथील तरूण भारतचे पत्रकार संदीप डाकवे यांना महाराष्ट्र शासनाकडून दिला जाणारा सन 2019-20 साठीचा विभागस्तरीय प्रथम क्रमांकाचा राजमाता जिजाऊ स्वावलंबन सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण 17 जानेवारीला महालक्ष्मी सरस या प्रदर्शनात सकाळी 10 वाजता एमएमआरडीए मैदान, वांद्रेकुर्ला कॉम्प्लेक्स (पूर्व) मुंबई येथे प्रमुख अतिथींच्या हस्ते होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियान संबंधी स्वंयसहाय्यतता गटांचे कार्य, उपक्रमांच्या अनुषंगाने लिहलेल्या लेखमालेमुळे डाकवे यांना हा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

पत्रकार डाकवे हे गेली 14 वर्षे पत्रकारिता क्षेत्रात काम करत आहेत. माजी मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडवणीस, राज्यमंत्री ना.शंभूराज देसाई यासह मंत्रीमंडळातील मान्यवरांच्या हस्ते ‘जलयुक्त शिवार अभियान’ यावरील लेखसंग्रह पुस्तकाचे प्रकाशन झाले आहे. तसेच ‘मनातलं’ हा चारोळीसंग्रह प्रकाशित केला आहे. याशिवाय तंटामुक्त अभियान, जलयुक्त शिवार अभियान, लेक वाचवा मोहिम या शासकीय योजनांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. यापुर्वी त्यांना राज्य शासनाकडून महात्मा गांधी तंटामुक्त गांव अभियान, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलमित्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. संदीप डाकवे यांच्या लेखणीची शासन दरबारी गौरव होण्याची ही त्यांची तिसरी वेळ आहे.

चित्रपटसृष्टीतील सेलिब्रिटींना त्यांचे स्वतःचे रेखाचित्र भेट देणे या त्यांच्या अनोख्या उपक्रमाची नोंद ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’ मध्ये झाली आहे. याशिवाय संदीप डाकवे यांनी रांगोळी रेखाटन, शब्दातून चित्रे रेखाटणे, खडूतून अष्टविनायक, मोरपीसजाळीदार पिंपळाच्या पानावर कलाकृती, छत्रीद्वारे व्यसनमुक्तीचा प्रयत्न, सर्वात मोठी ‘प्रतिबिंब’ भित्तीपत्रिका, जटानिर्मूलनासाठी प्रयत्न असे विविध छंद मोठ्या कौशल्यपूर्वक जपले आहेत.

पत्रकार संदीप डाकवे यांना हा पुरस्कार मिळाल्याबद्दल सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीष पाटणे, अनिल देसाई, संदीप चेणगे, सुहास बाबर, शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे, प्राचार्य डॉ. यशवंत पाटणे, प्रा..बी.कणसे, बाळासाहेब कचरे, वडील राजाराम डाकवे, आई गयाबाई डाकवे, रेश्मा डाकवे, जयंत कदम, एन.बी.परीट, शिवछत्रपती प्रतिष्ठान डाकेवाडी, स्पंदन चॅरिटेबल ट्रस्टचे पदाधिकारी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Related posts: