|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » सहकार भारतीचे उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त : अनंतराव जोशी

सहकार भारतीचे उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त : अनंतराव जोशी 

वाई/प्रतिनिधी

सहकार भारती या देशपातळीवरील संघटनेच्या माध्यमांतून राबविण्यात येत असलेले उपक्रम सहकारी संस्थांसाठी उपयुक्त असल्याचे प्रतिपादन सहकार भारतीचे राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अनंतराव जोशी यांनी केले. वाई येथे सहकार भारतीच्या 41 व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी सहकार भारतीचे सातारा जिल्हाध्यक्ष सीए. चंद्रकांत काळे होते.

यावेळी बोलताना जोशी म्हणाले, मी सहकारात अनेक वर्षे काम करीत आहे. आपल्या देशात सहकाराची मोठी परंपरा आहे. सहकाराची सुरक्षा मजबूत करण्यासाठी सर्व सहकारी संस्थांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे. सामान्य लोकांचे जीवन सहकाराशी निगडीत असल्याचे ते म्हणाले. शेतकरी, मजूर संस्था, दूधसंस्था, बाजार समित्या आदींचा आपण विचार केला तर सहकाराशिवाय आपले जीवन अपूर्ण आहे. सहकारी संस्थांची शुध्दी व वृध्दी झाली पाहिजे. सहकारी संस्थांच्या माध्यमांतून अनेकांचे जीवनमान सुधारले असल्याचे मत ही त्यांनी यावेळी व्यक्त केले.

सीए. चंद्रकांत काळे म्हणाले, निव्वळ नफा कमावणे हा सहकाराचा हेतू नाही. सहकारी बँका, पतसंस्थांना कर्ज वसुलीच्या प्रचंड अडचणी निर्माण होत आहेत. सरकारी कायद्यांमधल्या पळवाटा शोधून कर्जदार सहकारी संस्थांना अडचणीत आणत आहेत. सहकार भारती ही संस्था सहकारी पतसंस्था, बँकांना फायदेशीर असे काम करीत आहे. सरकार व रिझर्व्ह बँक नवनवीन बंधने घालीत असल्याने संस्था चालविताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. मात्र सहकार भारतीच्या माध्यमांतून एकत्र येऊन आपण सर्व सहकारी संस्थांनी कार्यरत राहिले पाहिजे.

याप्रसंगी उपस्थित सहकार अभ्यागतांनी विविध प्रश्न उपस्थित केले. त्यावर चर्चा करण्यात आली.यावेळी जिल्हा सचिव आनंद शेलार यांनी सहकार भारती स्थापना उद्देश व संस्थापक स्व. लक्ष्मणराव इनामदार यांच्या कार्याची माहिती दिली. जिल्हा कोषाध्यक्ष नरेंद्र गांधी यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. जिल्हा कार्याध्यक्ष विनय भिसे यांनी सहकार गीत गायले. पश्चिम महाराष्ट्र प्रशिक्षण प्रमुख अविनाश जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विजयकुमार मुळीक, मिलिंद पुरोहित, किसनराव बुलुंगे, मल्हारी पेटकर यांनी स्वागत केले. जगन्नाथ मुळीक यांनी आभार मानले.

Related posts: