|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » खवले मांजरासह सातजण ताब्यात

खवले मांजरासह सातजण ताब्यात 

आंतरराष्ट्रीय तस्करीचा संशय : माडखोल येथे कारवाई : इनोव्हा कारही ताब्यात, चौघांना 21 पर्यंत वनकोठडी

प्रतिनिधी / सावंतवाडी:

खवले मांजराची तस्करी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सातजणांना वनविभागाने मंगळवारी रात्री सावंतवाडी-बेळगाव मार्गावर माडखोल (ता. सावंतवाडी) सावली हॉटेलजवळ खवले मांजरासह ताब्यात घेतले. याप्रकरणी इनोव्हा कारही (एमएच-07/बीजे-4143) जप्त केली. आंतरराष्ट्रीय बाजारात या खवले मांजराची किंमत 35 लाख रुपये आहे. तर जप्त केलेल्या इनोव्हा कारची किंमत 7 लाख रुपये आहे. विकास प्रकाश चव्हाण (35, वारगाव-कणकवली), संतोष गणू चव्हाण (37 मालवण), उमेश बाळा मेस्त्राr (65, बांदा), उदय श्रीकांत शेटे (49, वाखेड-लांजा), सुनील चंद्रकांत कडवेकर (21, येळाणे शाहूवाडी, कोल्हापूर), पप्पू ऊर्फ मधुकर वसंत राऊळ, माडखोल, अमोल ऊर्फ गजानन अर्जुन सावंत (देवसू) अशी संशयितांची नावे आहेत. त्यापैकी विकास चव्हाण, सुनील कडवेकर, संतोष चव्हाण, उदय शेटे यांना येथील न्यायालयात हजर केले असता 21 जानेवारीपर्यंत वनकोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.

खवले मांजरांची तस्करी करणारे रॅकेट कार्यरत असून या प्रकरणात आणखी चौघांचा समावेश असण्याची शक्यता असून आंतरराष्ट्रीय पातळीवर ही तस्करी होत असल्याचा संशय वनविभागाने व्यक्त केला असून त्या दृष्टीने तपास करण्यात येणार आहे. यापूर्वी सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत खवले मांजराची तस्करी करणाऱया टोळीला पोलीस आणि वनविभागाने पकडले होते. तरीही तस्करीचे प्रकार होत आहेत.

स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने खवले मांजराची एका टोळीकडून तस्करी होणार असल्याची खबर वनविभागाला दिली होती. त्यानुसार वनविभागाने वनक्षेत्रपाल गजानन पाणपट्टे, फिरते पथकातील रमेश कांबळे, अमृत शिंदे (कुडाळ), सर्जेराव सोनवडेकर (कणकवली) यांनी सावंतवाडी-बेळगाव मार्गावर मंगळवारी रात्री सापळा रचला. माडखोल सावली हॉटेलजवळ या पथकाने इनोव्हा कार थांबवून तपासणी केली. त्यावेळी त्यांना खवले मांजर आढळले. त्यामुळे कारमध्ये असलेल्या सातजणांना ताब्यात घेतले. त्यानंतर या सर्वांना सावंतवाडीच्या वनविभाग कार्यालयात चौकशीसाठी आणण्यात आले. चौकशी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

एक रुग्णालयात दाखल

यापैकी उमेश मेस्त्राr आजारी असल्याने तो रुग्णालयात उपचार घेत आहे. तर राऊळ, सावंत यांना बंधपत्र घेऊन सोडून देण्यात आले. चौघांना येथील न्यायालयात हजर केले असता सात दिवसांची कोठडी देण्यात आली. याप्रकरणात गुरुनाथ कृष्णा राऊळ (माडखोल), संभाजी निगडे (इचलकरंजी), प्रसन्न ऊर्फ बंडू कांबळी (वाखेड-लांजा) हे पसार आहेत. या तस्करीत आणखी कुणाचा समावेश आहे? खवले मांजर कुठून आणि कुणी पकडले? पकडण्यासाठी कुठली साधने वापरली? त्यांची कुठे तस्करी करण्यात येणार होती? यात आणखी कुणाचा समावेश होता काय? याचा तपास करण्यासाठी तसेच व्यवहारातील रक्कम जप्त करण्यासाठी कोठडीची मागणी वनविभागाने केली. संशयितांतर्फे ऍड. सुहेब डिंगणकर, ऍड. परशुराम चव्हाण यांनी काम पाहिले. यावेळी ऍड. डिंगणकर यांनी तपासातील आणि एफआयआरमधील तफावत लक्षात घेता पोलीस कोठडीची गरज नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून न्यायालयाने सात दिवसांची वनकोठडी दिली.

कोकणातून मोठी तस्करी

खवले मांजर अनुसूची वर्ग एकमध्ये येते. त्याची शिकार केल्यास 25 हजार रुपये दंड आणि तीन ते सात वर्षे कैद अशी शिक्षा आहे. या खवले मांजराची गेल्या काही वर्षात कोकणातून मोठय़ा प्रमाणात तस्करी होत आहे. खवल्यांना औषधासाठी मोठी मागणी आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्याची तस्करी होते. तस्करी करणारी टौळी कार्यरत असली तरी टोळीला पकडूनही वनविभाग अद्याप मुळाशी गेलेले नाही. त्यामुळे वारंवार तस्करी होत आहे. खवले मांजरांच्या खवल्याचा जादू-टोण्यासाठीही वापर होत असतो. त्यासाठीही ते पकडले जाते. पुणे मुळशी भागात अशी टोळी कार्यरत आहे. खवले मांजर कोकणात सर्वत्र आढळते. परंतु त्याची होत असलेली तस्करी या प्राण्याच्या अस्तित्वाला धोका निर्माण करणारी ठरत आहे.

नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश

वनविभागाने संशयित आरोपींकडून हस्तगत केलेले जिवंत मांजर नैसर्गिक अधिवासात सोडण्याचे आदेश न्यायालयाने वनविभागाला दिले. तसेच अधिवासात सोडतांना त्याचा पूर्ण पंचनामा व व्हिडिओ शूटिंग करून त्याचा अहवाल न्यायालयात सादर करण्याचेही आदेशात नमूद केले आहे.

21 जानेवारीपर्यंत वनकोठडी

खवले मांजरांना भारतातच नव्हे तर परदेशातही मोठी मागणी आहे. माडखोल येथे वनविभागाने पकडलेल्या खवले मांजर तस्करीतील अटकेतील संशयित आरोपी हे वेगवेगळय़ा जिल्हय़ातील आहेत. ते मांजराची तस्करी करण्याच्या हेतूने एकत्र आले. त्यामुळे या गुन्हय़ाचा सखोल तपास करण्यासाठी सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने द्यावी, अशी मागणी सरकारी अभियोक्ता ऍड. राजशेखर परमाज यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने या प्रकरणाचा तपास करण्यासाठी संशयित चौघांना 21 जानेवारीपर्यंत सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.

Related posts: