|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » मुंबई » बाबासाहेबांच्या पुतळय़ाची उंची वाढणार

बाबासाहेबांच्या पुतळय़ाची उंची वाढणार 

उंची 100 फुटाने वाढविण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

स्मारकाच्या खर्चात 317 कोटी रुपयांची वाढ

मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाचे सादरीकरण

मुंबई / प्रतिनिधी

दादर येथील इंदू मिलच्या जागेवर उभारण्यात येणाऱया डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकामधील पुतळय़ाची उंची 100 फुटाने वाढविण्याचा निर्णय बुधवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. स्मारकाच्या सुधारीत आराखडय़ामुळे स्मारकाच्या खर्चात 317 कोटी रुपयांची वाढ होणार आहे.

उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार यांनी इंदूमिलच्या जागेला भेट घेऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाच्या कामाचा आढावा घेतला होता. त्यानंतर बुधवारी मंत्रिमंडळ बैठकीत स्मारकाचे सल्लागार शशी प्रभू यांनी स्मारकाच्या सुधारित संकल्पनेचे सादरीकरण केले. सादरीकरणानंतर पुतळय़ाची उंची 350 फूट करण्याचा निर्णय घेण्यात आला. सुरुवातीला पुतळय़ाची उंची 250 फूट प्रस्तावित होती. आजच्या निर्णयामुळे स्मारकाचा चबुतरा 100 फूट तर पुतळा 350 फूट अशी स्मारकाची एकूण उंची जमिनीपासून 450 फूट असणार आहे.

मंत्रिमंडळ बैठकीत झालेल्या निर्णयाची माहिती अजित पवार आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनी पत्रकारांना दिली. मुंबई महानगर विकास प्राधिकरणाने सुधारित संकल्पनेनुसार, सादर केलेल्या स्मारकाच्या अंदाजित खर्चास मंत्रिमंडळाने मान्यता दिली. स्मारकाचा खर्च प्राधिकरण करणार असून त्याची प्रतिपूर्ती सरकार करणार आहे. हा प्रकल्प तीन वर्षात पूर्ण होणे अपेक्षित आहे. स्मारकासाठी 9 फेबुवारी 2018 रोजी कार्यारंभ आदेश देण्यात आला असून सर्व संरचनात्मक आराखडय़ाचे 100 टक्के काम पूर्ण होऊन आवश्यक त्या परवानग्या प्राप्त झाल्या आहेत, असे पवार म्हणाले.

पुतळय़ाची उंची वाढल्यामुळे ब्राँझ आणि लोखंडाचे प्रमाण वाढेल. तसेच पुतळय़ाचा पाया देखील वाढणार आहे. सरकार स्मारकासाठी निधी कमी पडू देणार नाही. राज्य सरकारच्या सर्व परवानग्या संबंधित विभागाच्या सचिवांनी आठ दिवसात द्याव्यात, अशा सूचना केल्याचे पवार यांनी सांगितले.

दलितांना प्रभावित करण्याचा राष्ट्रवादीचा प्रयत्न

 पक्षापासून दूर गेलेल्या दलित मतदाराला प्रभावित करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादीने चालवला आहे. राष्ट्रवादीने प्रथमच बौध्द समाजातील संजय बनसोडे यांचा मंत्रिमंडळात समावेश केला. आता बाबासाहेबांच्या स्मारकाला पक्षाने प्राधान्य दिले आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे येत्या 21 जानेवारीला इंदू मिलच्या जागेला भेट देऊन स्मारकाच्या कामाची पाहणी करणार आहेत.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाची वैशिष्टे

बौध्द शैलीतील वास्तूरचना आणि घुमट

संग्रहालय आणि प्रदर्शन भरविण्याची सोय

68 टक्के खुली हरित जागा

एक हजार आसनक्षमता असलेले प्रेक्षागृह

Related posts: