|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिष्यत्व म्हणजे रियाज, गाणं म्हणजे रियाज!

शिष्यत्व म्हणजे रियाज, गाणं म्हणजे रियाज! 

या आधीच्या भागात आपण पाहिलं की श्रद्धा व नि÷ा हा शिकणाऱयाच्या सांगीतिक व्यक्तिमत्त्वाचा पाया आहे. गाण्याच्या क्षेत्रात पाऊल टाकण्यासाठी ही जणुकाही पूर्वतयारी आहे. पण या क्षेत्रात पहिलं पाऊल टाकल्यापासून ते शेवटच्या श्वासापर्यंत करायची एक सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे अखंड रियाज! शिष्यत्त्व म्हणजे रियाज, गाणं म्हणजे रियाज. दुसरं तिसरं काही नाही. कितीही तीव्र बुद्धिमत्ता असो, कितीही कल्पकता तुमच्याकडे असो किंवा जगातील उत्तमातला उत्तम गुरु तुम्हाला मिळो, जर का रियाज नसेल तर सारं काही व्यर्थ ठरतं. कारण आधी आपल्याला एखादी गोष्ट यावी यासाठी, मग ती पक्की व्हावी यासाठी आणि मग ती टिकावी यासाठी रियाजच करावा लागतो आणि ती वाढवण्यासाठीही तोच मार्ग आहे. आणि तो कसा करावा व त्यामध्ये कशाकशाचा समावेश होतो हे जेव्हा पहायला आणि वाचायला मिळालं तेव्हा अद्भुत वाटलं. किती बहुआयामी संकल्पना आहे ही! कारण त्यामध्ये श्रवण, मनन, चिंतन, प्रत्यक्ष सराव, जाणिवांप्रमाणे पद्धती बदलत जाणे हे सगळंच समाविष्ट होतं आणि ‘रियाज’ या विषयी मोठमोठय़ा कलाकारांच्या ज्या कथा मी ऐकल्या ते अक्षरशः वंदनीय आहेत. लगन आणि रियाज किती कडवा असावा? रियाजाची वेळ झाली पण जागा उपलब्ध नाही म्हणून मोरीत उभं राहून रियाज? चक्क संडासात उभं राहून तास न् तास रियाज? कानाच्या पाळीवर उदबत्त्या लावून त्याचा चटका बसेपर्यंत अखंड रियाज? अख्खी मेणबत्ती जळेपर्यंत रियाज? काय आहे हे? किस्से आहेत का? तर नाही. या सत्य गोष्टी आहेत. रात्री दहा ते पहाटे तीनपर्यंत एकच पलटा घोटत राहणं, सलग तीन वर्षं एकाच रागाची तालीम घेणं, रोजच्या रोज बोटं सुजेपर्यंत वाद्य वाजवणं, हे सगळं सगळं खरं आहे आणि हे सगळं करणारीही तुमच्या माझ्यासारखीच सर्वसामान्य माणसं होती. अखंड रियाज करूनच ती मोठी झाली आहेत.

पं. अजॉय चक्रवर्ती यांनी त्यांच्या रियाजाविषयी माहिती देताना एक गमतीदार गोष्ट सांगितली. ते लहान असताना खर्जाच्या रियाजासाठी पहाटे तीन वाजता त्यांना जाग येत नसे. हे सांगितल्यावर दुसऱया दिवशी वडिलांनी त्यांना उठवून अक्षरशः पलंगावरून खाली लोटून देऊन आणि पाणी शिंपडून जागं करायला सुरुवात केली.

अजून एक गोष्ट वाचलेली आठवली. पं. भीमसेन जोशी मिष्किलपणे एकदा म्हणाले होते की गाणं शिकणाऱयाने पहिल्यांदा तीन तास एका जागी, वळवळ न करता स्थिर बसण्याचा रियाज करायला हवा. मग बाकीचं.

एक सर्वसामान्य श्रोता म्हणून आपण निरीक्षण करत राहिलो तर उत्तम शिष्यांची एक प्रवृत्ती दिसत राहते. ती म्हणजे शोधक वृत्ती होय. निरनिराळय़ा ठिकाणाहून वेगवेगळय़ा गोष्टी वेचत राहणे. एका निश्चित ध्येयाने शिकणारा विद्यार्थी नेहमी नव्याचा शोध घेत राहतो. उदाहरणार्थ, बेसिक (पायाभूत) शिकणारा विद्यार्थी सतत भरपूर ऐकत राहतो आणि त्या त्या लेव्हलचा रियाज करत राहतो. विशारदची परीक्षा पास झालेल्या एका कलाकाराला उत्साहाने ‘तुम्हाला आता खूप काही जमायला लागलं असेल ना? तुम्ही भरपूर गाऊ शकत असाल आता!’ असा (खरं तर अजागळ) प्रश्न मी विचारला होता. त्याने उत्तर दिलं ‘छे! आत्ता कुठे मला कळायला लागलंय की मला काय काय येत नाही ते.. आणि खरं तर आता कळतंय की मला नीटपणे सा सुद्धा लावता येत नाही. माहिती, ओळख आणि ज्ञान यात फरक असतो हे समजायला लागलंय.’ मला इतका अचंबा वाटला! म्हणजे हे सगळं असं असतं होय? एकाच घराण्यातले वेगवेगळे गायक ऐकून त्यांची स्वतंत्र वैशिष्टय़ं अभ्यासणे, वेगवेगळे गीतप्रकार अभ्यासणे, एकाच व्यक्तीचं वेगवेगळय़ा वेळचं गाणं ऐकणं असे विविध प्रकार हे लोक करत असतात आणि हे सगळं करत जेव्हा ते मोठे कलाकार होतात तेव्हा ते परत पायाभूत गोष्टींवर मेहनत घेतच असतात. अशा माणसांमध्ये कल्पकता असणंही आवश्यक असतं. कारण त्याशिवाय गाणं शिकणं आणि ते प्रत्यक्ष गाणं यातली तफावत भरली कशी जाणार?

  शिकत असतानाची पुढची पायरी म्हणजे त्या माणसाने स्वतःची कल्पनाशक्ती वापरून पुढे जाणं अपेक्षित असतं. तांत्रिक बाजू जर वारंवार सरावाने घोटून पक्की होत असेल तर त्याबरोबरच ती कल्पकता जागृतीचंही काम करते. स्वतःचं असं वेगळं काही सुचणं ही कल्पकता असते. एकच गाणं वेगवेगळे कलाकार त्यांच्या त्यांच्या पद्धतीने सादर करतात. याचाच अर्थ असा की ते आपापल्या कल्पकतेने त्याची मांडणी करतात. अर्थात ऐकणाऱयालाही तेवढी विविधता मिळते. आणि याच कल्पकतेच्या हातात हात घालून येते ती प्रयोगशीलता. आपल्या कल्पनाशक्तीला सतत आवाहन करून प्रयोग करत राहणं. कारण कल्पना ही अध्याहृत असते. तिचा प्रत्यक्ष आविष्कार हा प्रयोग असतो. पुलंच्या पुस्तकात वाचल्याप्रमाणे ‘म्हणूनच नाटकाच्या सादरीकरणाला प्रयोग म्हणतात की काय कोण जाणे’ हे खरंच म्हणावं लागेल. हृदयनाथ मंगेशकर यांनी त्यांच्या गाण्यात स्केल चेंजिंगचा प्रयोग केला होता तेव्हा खूप जाणकारांनी त्याला नाकं मुरडली होती म्हणतात. पण नंतर त्यांचा तो प्रयोग कल्पनेबाहेर यशस्वी झाला. प्रचंड लोकप्रियता त्याला मिळाली. ‘आनंदी आनंद गडे’ हे गाणं त्यातलेच एक उदाहरण. याचं कारण त्यांच्याकडे असलेल्या अफाट कल्पकतेतून त्यांना काळाच्या पुढे पाहणं जमत होतं. तितकी प्रयोगशीलता असणारी महान व्यक्ती आहे ती. असंच ऐकत राहिलं आणि विचार करत राहिलं की वाटत राहतं, संगीत अभ्यासक असणाऱया व्यक्तीकडे किती गुण असावे लागतात! कितीही पुढे गेलं तरी विद्यार्थी असणं जपावं लागतं. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ या उक्तीची कायमच आठवण ठेवावी लागते. कारण त्यांच्या गाण्यावर साधकबाधक टीका सदैव होतच राहते. ती चांगल्या मनाने स्वीकारावी लागते. कित्येकदा गुरु करण्याच्या बाबतीत तर दत्तात्रेयांचा मार्गच धरावा लागण्याची वेळही येते. आणि त्यातून जे काही कमी-जास्त मिळेल ते ते अभ्यासाने परिश्रमाने मांडता येण्यासाठी त्यांना किती विचार करावा लागत असेल बरं? आणि बाकी व्यावहारिक गोष्टींबद्दल तर न बोललेलंच बरं! पण आपल्याला सतत खूप नवे कलाकार या क्षेत्रात येऊन नाव काढताना दिसतात. कधी ते स्पर्धेतून येतात तर कधी ते वेगळय़ाच पद्धतीने लोकांसमोर येतात. पण खऱया कलाकारांची गाण्यावर श्रद्धा आणि नि÷ा असते. त्यामुळे ते अविचलपणे रियाज करत राहतात. छोटय़ा छोटय़ा तांत्रिक गोष्टींपासून ते लालित्यपूर्ण मांडणीपर्यंत सर्व गोष्टींचा विचार, सराव करून ते श्रोत्यांना नवीन काही  सतत देत असतात. त्यांना उपजत असलेल्या आवडीचं सोनं तेव्हाच होतं जेव्हा ते प्रबळ इच्छाशक्ती बाळगून सतत चिंतन आणि मनन करीत राहतात. आणि मग आपणा सर्वांना अफाट ताकदीचं गाणं ऐकायला मिळत राहतं. आयुष्य गाण्यासाठी खर्च केलेले कलाकर जेव्हा असं म्हणतात की अजून पाऊलभर पाण्यातही आम्ही नाही, तेव्हा शिष्यभाव म्हणतात तो काय हे कळतं. संगीतकलेच्या वृद्धीसाठी सदैव झटत राहणाऱया या सर्व प्रामाणिक शिष्यांना आणि त्या परंपरेला विनम्र अभिवादन!

अपर्णा परांजपे-प्रभु

Related posts: