|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » वाघ मेल्याचे दु:ख …आणि सोकावलेला काळ!

वाघ मेल्याचे दु:ख …आणि सोकावलेला काळ! 

वाघ हत्येच्या प्रकरणामुळे वन खात्याच्या कारभारावर तसेच वन्य क्षेत्रालगत राहणाऱया आदिवासींच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले गेले आहे. रानटी जनावरांचा वाढता उपद्रव, गव्या रेडय़ांकडून माणसांवर होणारे हल्ले, बिबटय़ा किंवा पट्टेरी वाघांकडून भक्ष्यस्थानी पडणारी शेतकऱयांची गुरे, अशा घटना गोव्यात वारंवार घडतात.

सत्तरी तालुक्यातील गोळावली गावात धनगर कुटुंबीयाकडून वाघिणीसह तीन बछडय़ांची झालेली हत्या, ही अत्यंत दुर्दैवी घटना आहे. गेला आठवडाभर गोव्यात हाच विषय गाजत आहे. या घटनेनंतर विविध स्तरावरून ज्या तीव्र प्रतिक्रिया उमटल्या त्याचा रोख व्यवस्थेच्या हलगर्जीपणाकडे अधिक दिसतो. उपजीविकेचे साधन असलेल्या गुरांचा वाघाने बळी घेतल्याने, संतप्त भावनेच्या भरात धनगर कुटुंबातील सदस्यांच्या हातून हा प्रमाद घडला. वाघांच्या हत्येनंतर नखांची झालेली तस्करी व एकंदरीत घटनेचा तपास सध्या सुरू आहे. वाघाकडून होणाऱया या उपद्रवाची कल्पना वनखात्याला होती. त्यामुळे वेळीच परिस्थिती हाताळली असती तर पुढची घटना टाळता आली असती. घटनेच्या तपासासाठी केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्रालयाने नियुक्त केलेल्या द्विसदस्यीय चौकशी पथकानेही वनखात्याची ही बेफिकिरी व निष्काळजीपणावर ठपका ठेवला आहे.

वाघ हत्येच्या या प्रकरणामुळे वन खात्यामधील एकंदरीत कारभारावर तसेच वन्य क्षेत्रालगत राहणाऱया आदिवासींच्या प्रश्नाकडेही लक्ष वेधले गेले आहे. रानटी जनावरांचा वाढता उपद्रव, गव्या रेडय़ांकडून माणसांवर होणारे हल्ले, बिबटय़ा किंवा पट्टेरी वाघांकडून भक्ष्यस्थानी पडणारी शेतकऱयांची गुरे, अशा घटना गोव्यात वारंवार घडतात. संबंधित खात्याकडून हे प्रकार फारसे गांभीर्याने घेतले जात नाहीत अशी व्यथा नेहमीच ऐकायला मिळते. पट्टेरी वाघासंबंधी बोलायचे झाल्यास गोव्यात वाघ असल्याचा पर्यावरणप्रेमींचा दावा नेहमीच फेटाळला जायचा. सन 2009 मध्ये याच सत्तरी तालुक्यात वन्य प्राण्यांच्या शिकारीसाठी लावलेल्या सापळय़ात अडकलेल्या पट्टेरी वाघाची गोळी घालून हत्या केल्याने खळबळ उडाली होती. गेल्या वर्षी 2019 मध्ये झालेल्या वन्य प्राण्यांच्या गणनेत म्हादई अभयारण्य क्षेत्रात चार तर मोले महावीर अभयारण्य क्षेत्रात एका वाघाचे कॅमेऱयात दर्शन झाल्याने गोव्यातही वाघ असल्याचे सिद्ध झाले. वन खात्यातील काही कार्यक्षम अधिकाऱयांच्या वन्यजीवाविषयी असलेल्या आस्थेमुळेच हे घडू शकले. त्यामुळे गोव्यातील जंगलात वाघ होते पण हे सत्य जाणूनबुजून दडपून ठेवले जात होते, ही गोष्टही आता उघड झाली आहे.

गोवा राज्यात एकूण सहा अभयारण्ये व एक राष्ट्रीय उद्यान आहे. वाघांसाठी त्यातील पश्चिम घाटात येणाऱया अभयारण्यात मर्यादित आकाराचे व्याघ्र क्षेत्र उभारण्याचा प्रस्ताव अद्याप भिजत पडला आहे. गोव्यातील संरक्षित जंगलांचे रूपांतर व्याघ्र क्षेत्रात करावे. त्यासाठी सरकारने स्थानिक जनतेला विश्वासात घेऊन व्याघ्र कृतीदलाची स्थापना करून वाघांचे आणि त्यांच्या नैसर्गिक अधिवासाचे रक्षण करण्याची पर्यावरणप्रेमींची मागणी आहे. विशेष म्हणजे म्हादई अभयारण्याची सीमा अधोरेखित करण्यासाठी 1999 साली अधिसूचना घोषित होऊनही गेल्या 20 वर्षात त्याबाबत कुठलीच कारवाई झालेली नाही. सत्तरीतील या घटनेमुळे हा प्रश्न प्रामुख्याने उपस्थित झालेला आहे. दुसरीकडे सत्तरीचा भाग व्याघ्र प्रकल्प म्हणून आरक्षित करण्यास काही राजकीय पुढाऱयांनी तीव्र विरोध दर्शविला आहे. वन्य जीव आरक्षित विभाग लोकवस्तीपासून दूर असावा. हा भाग व्याघ्र संरक्षित केल्यास अनेक वर्षे वास्तव्य करून असलेल्या आदिवासी लोकांच्या उपजीविकेवर गदा येईल, असा त्यांचा दावा आहे. वाघांच्या संरक्षणासाठी ‘कॉरिडोअर’ किंवा ‘बफर झोन’ करता येईल, असे त्यांचे म्हणणे आहे.

गोव्याचे क्षेत्रफळ इतर राज्यांच्या तुलनेत अत्यंत आटोपशीर आहे. सांगे, वाळपई, धारबांदोडा हे काही तालुके पश्चिम घाटी वन्य क्षेत्रात येतात. जैविक संपदेच्या दृष्टीने ते समृद्ध आहेत. या राखीव वन क्षेत्रात खाण उद्योगांचे झालेले अतिक्रमण व इतर कारणांमुळे वाघ्र प्रकल्पांना नेहमीच विरोध होत आलेला आहे. खाणी व इतर उद्योगांचे हितसंबंध त्यात गुंतल्याने वन खात्यावर असे प्रकल्प राबविताना नेहमीच दबाव असतो. याच गोष्टीमुळे गोव्यातील जंगलांमध्ये वाघाचे अस्तित्व असल्याचे कायम झाकून ठेवण्यात आले. वन खात्याच्या या अकार्यक्षमतेमुळे पर्यावरण संहारक कृतींना बळ मिळत गेले. अधिवासच धोक्यात आल्याने जगण्याच्या अस्तित्वासाठी वन्य प्राणी व माणसातील संघर्षाला येथूनच सुरुवात झाली. चार वाघांच्या हत्येमागे हीच परिस्थिती कारणीभूत ठरली आहे. वनक्षेत्रालगत राहणाऱया रहिवाशांच्या प्रश्नांकडे झालेले दुर्लक्ष, जागृतीचा अभाव तसेच वन खात्याच्या कुठल्याही उपक्रमांमध्ये अशा लोकांना विश्वासात न घेणे, यामुळे वन खाते व स्थानिकांचा संवाद तुटत गेला. त्याची परिणती अशा घटनांमधून दिसत आहे.

म्हादई हे अभयारण्य क्षेत्र म्हणून 1999 साली घोषित झाले. मात्र या भागातील रहिवाशांना अद्याप त्यांचे हक्क मिळाले नाहीत किंवा पुनर्वसन झाले नाही. आपले हितसंबंध जपण्यासाठी काही राजकारण्यांना अभयारण्ये किंवा व्याघ्र आरक्षित क्षेत्र नको आहे. त्यामुळे जनतेच्या आड उभे राहून त्याविरोधात रेटा लावला जातो पण  त्यात भरडली जातात, ती मुकी जनावरे आणि गरीब जनताच. म्हादईचे पाणी वळवण्यावरून गोव्यात सध्या आंदोलन सुरू आहे. पर्यावरण टिकल्यास येथील वन्य प्राणी जगतील. गोवा हे पर्यटन क्षेत्र म्हणून ओळखले जाते. व्याघ्र प्रकल्प त्याला पूरक ठरू शकतो. अनेक राज्यांनी व्याघ्र आरक्षित क्षेत्र उभारून त्याला पर्यटनीय प्रवाहात आणले आहे. हा पॅटर्न गोव्यात शक्य आहे पण त्यासाठी लागणाऱया राजकीय इच्छाशक्तीची उणीव आहे. सत्तरीच्या घटनेमध्ये वाघ दगावल्याचे दु:ख तर आहेच… पण काळ सोकावतो आहे, हे अधिक चिंताजनक म्हणावे लागेल….!

सदानंद सतरकर

Related posts: