|Thursday, February 20, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » परी दोहींचें भिन्न कर्म

परी दोहींचें भिन्न कर्म 

आता रुक्मिणीसह देव द्वारकेच्या दिशेने निघाले. पुढे मागे चतुरंग सैन्याच्या पलटणी चालत होत्या. रथावर श्रीकृष्ण व रुक्मिणी विराजमान झाले होते. रणवाद्ये वाजत होती. जयजयकार आकाशात केंदला होता. मार्गात ठिकठिकाणी लोक, राजे, भक्त स्वागताला येत होते. वधूवरावर फुले उधळीत होते.

जिणोनि सकळिकां रायांशी । विरुप करुनि रुक्मियासी । कृष्णे नेले नोवरीसी । भीमकाशी श्रुत जाले ।। ऐकोनि जाले अत्यंत सुख । जीवी न समाये हरिख। मज तुष्टला आदिपुरुख । भाग्य चोख भीमकीचे।।मजपासूनि दोघां जन्म । परी दोहींचे भिन्न कर्म ।भीमकी पावली पुरुषोत्तम । विरुपकर्म रुक्मिया।। रुक्मिया निंदी कृष्णासी । तेणेंच कर्मे वैरुप्य त्यासी । भीमकीभावार्था कृष्णचरणाशी। अर्धांगाशी पावली।। आपला भावर्थाचि जाण । कृष्णप्राप्तीसी कारण ।यावेगळे शहाणपण । केवळ जाण दंभार्थ ।। याचिलागी निजभावेसी। शरण जावे श्रीकृष्णासी। भीमकी अर्पूनियां त्यासी । हृषीकेशी भजावे ।। पाचारून शुद्धमतीसी । वृत्तांत सांगितला तियेसी। येरी म्हणे रहावा श्रीकृष्णासी । कन्यादानासी विधि करू ।।  कन्यादानाचेनि मिसे । कृष्ण पूजूं सावकाशे । पांचां पंचकाचे फिटेल पिसे । अनायासें मन निवे।।

इकडे भिष्मकाला कळले की सर्व राजांचा पराभव करू, रुक्मीला विरुप करून श्रीकृष्ण रुक्मिणीला घेऊन गेला. त्याला अत्यंत आनंद झाला. हर्ष पोटात मावेना. तो म्हणाला-भिमकी भाग्याची खरी! रुक्मी व रुक्मिणी दोन्हीही माझीच लेकरे, पण दोघांचेही कर्म भिन्न असल्याने रुक्मिणीला कृष्ण प्राप्त झाला तर रुक्मीच्या वाटय़ाला घोर विटंबना आली. रुक्मीने कृष्णाची निंदा केली म्हणून त्याला विरुपता प्राप्त झाली. भीमकीने कृष्णाची भक्ती केली. तिला कृष्णाचे अर्धांग प्राप्त झाले. जशी भावना तसे फळ! मग भीष्मकाने विचार केला-आपण कृष्णाला शरण जाऊ व कन्या अर्पण करून आपल्या कुळाचा उद्धार करू. मग त्यांनी राणी शुद्धमतीला बोलावले व तिला आपल्या हृदयीचे गुज सांगितले-महाराणी! आपण कृष्णाला कन्यादान करून त्याची पूजा करू, म्हणजे आपल्या मनाला खरी शांती लाभेल. तिच्याही मनात तेच होते.

भीमक निघाला वेगेंसी ।। ठाकोनि आला प्रभासासी ।

लोटांगण श्रीकृष्णासी । निजभावेंसी घालित ।।

त्राहि त्राहि जी दातारा । नेत्री अश्रुंचिया धारा ।

कृपा उपजली कृष्णवीरा । वेगे सामोरा धाविन्नला।।

उचलोनियां वेगेसी । हृदयीं धरी हृषीकेशी ।

 येरे मिठी घातली कंठेसी ।  भावार्थेसी मिसळला ।।

जीवींच्या जीवा झाली भेटी । काही केलिया न सुटे मिठी ।  बाप कृपाळू जगजेठी ।  पूर्णदृष्टी पाहिला ।।

सच्चिदानंदे झाला तृप्त । सबाहय़ देखे कृष्णनाथ।

फिटला आर्तीचा मनोरथ। कृतकृत्यार्थ पैं झाला ।।

मनाचा निश्चय होताच भीष्मक वेगाने निघाला. कृष्णाचा रथ तोवर प्रभास क्षेत्री पोहोचला होता.

Ad.  देवदत्त परुळेकर

Related posts: