|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिवरायांचा आठवावा प्रताप!

शिवरायांचा आठवावा प्रताप! 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी करणाऱया पुस्तकाच्या प्रकाशनापासून सुरू झालेला वाद आता भलतीकडेच पोहोचला आहे. लेखक जयभगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी नरेंद्र मोदी’ हे पुस्तक लिहिले आणि वादाला सुरुवात झाली. एकमेकावर आरोप-प्रत्यारोप झाले. भाजपने नंतर प्रकरण अंगलट येते असे दिसताच त्यापासून स्वतःला दूर ठेवण्याचा प्रयत्न केला. लेखक जरी भाजपचा कार्यकर्ता असला तरी पुस्तकातील मते ही लेखकाची व्यक्तीगत मते असतात. भाजपचा या प्रकाशनाशी काहीही संबंध नाही असे जाहीर केले. या पुस्तकावर बंदीची चर्चा झाली. पाठोपाठ लेखक जयभगवान गोयल यांनी आपण हे पुस्तक मागे घेणार नाही. मात्र त्यातील वादग्रस्त भागाचे नव्याने लेखन करू असे सांगतानाच शिवसेना आणि काँग्रेसवर टीका केली. त्यामुळे प्रकरण पुन्हा तापले. त्यात संजय राऊत यांनी छत्रपतींच्या वारसांना हे मान्य आहे का असे म्हटले. आता भाजपची वेळ होती. त्यांच्याकडून मैदानात उतरले ते शिवरायांचे वंशज आणि माजी खासदार उदयनराजे भोसले. वास्तविक उदयनराजे भोसले यांनी या वादात जी भूमिका घेतली ती कोणत्याही बाजूने झुकणारी अशी असता कामाची नव्हती. मात्र ते शिवसेनेवर आणि शरद पवारांच्यावर घसरले. त्यातही शिवसेनेने आपल्या पक्षाचे नाव ठाकरे सेना करावे म्हणजे त्यांच्या पक्षात किती तरुण उरतील ते पहावे आणि शरद पवारांचे नाव न घेता त्यांना जाणता राजा म्हटल्याचा आपण निषेध करतो ही त्यांची राजकीय टिप्पणी त्यांच्या इतर सर्व वक्तव्यावर पाणी फिरवून गेली. त्यांनी संजय राऊतांवर जहरी टीका केली. आता याचा समाचार घ्यायला संजय राऊत मागे हटतील असे आजच्या स्थितीत तरी अशक्य होते. त्यांनी थेट उदयनराजेंनी ते वंशज असल्याचा पुरावा द्यावा अशी टीका केली. आता या टीकेनंतर त्याला आणखी अनेक धुमारे फुटायला लागतील. मूळ मुद्दा काय होता तेच यातून विसरले जाऊन घाणेरडे राजकारण खेळले जाईल. अशा प्रकारच्या टीका सुरू झाल्यानंतर त्याची पातळी कितपत खाली घसरेल हे सांगता यायचे नाही. उदयनराजेंची आणि त्यांच्या विरोधकांची सातारा जिल्हय़ात पातळी सोडून होणारी टीका त्या जिल्हय़ाला सवयीची आहे. पण, उर्वरित महाराष्ट्राला तशी सवय नसल्यामुळे या टीकेनंतर उर्वरित महाराष्ट्र हळहळल्याशिवाय राहणार नाही. छत्रपती हे महाराष्ट्राची अस्मिता आहेत. फार मोठा वर्ग त्यांना दैवतासमान मानतो तर दुसरा तितकाच ताकदीचा वर्ग छत्रपती शिवाजी महाराज हा विषय डोक्यावर घेण्याचा नव्हे तर डोक्यात घेण्याचा असल्याचे मानतो. मात्र कोणत्याही बाजूचा असला तरी शिवाजी महाराज हे त्याच्यासाठी आदराचे आणि अभिमानाचे स्थान आहे. राजकीय पक्षांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर आपल्या राजकारणासाठी करणे काही नवे नाही. राज्यातील एकाही पक्षाने ती संधी  सोडलेली नाही. शिवाजी महाराजांवर पुस्तक लिहिताना त्यांचे चुकीचे मूल्यमापन करणाऱया पं. नेहरू यांना प्रतापगडावर येऊन आणि महाराष्ट्र राज्याची स्थापना करून पापक्षालन करावे लागले. त्यांच्याच कन्या इंदिरा गांधी यांनाही छत्रपतींच्या महानिर्वाणाच्या त्रिशतकोत्तरी महोत्सवांसह राजघराण्याशी जवळीक ठेवावी लागली. अलीकडच्या काळात पाचच वर्षांपूर्वी नरेंद्र मोदी यांना देशाची आणि राज्याची सत्ता मिळविण्यासाठी ‘शिवछत्रपतींचा आशीर्वाद’ची जाहिरात करावी लागली. शिवसेनेपासून राष्ट्रवादीपर्यंत सर्व प्रादेशिक पक्षांना शिवाजी महाराजांचे नाव न घेता राजकारण करता आले नसते हेही वास्तव आहे. पण, शिवरायांचे कर्तृत्वच इतके मोठे होते की, ज्यामुळे त्यांना वगळून काही करता येईल हे त्यांच्या मृत्यूनंतर साडेतीनशे वर्षांनीही शक्य वाटत नाही. त्याचे कारण शिवरायांचा प्रताप! हा प्रताप काही रोमांचित करणाऱया, काव्यरूप प्रसंगांपुरता मर्यादित नाही. महाराष्ट्राच्या जडणघडणीत शिवनीतीचा मोठा वाटा आहे. पण, ही नीती राजकारण्यांना हवी आहे काय? रयतेचे राज्य आणि राष्ट्र या संकल्पनेपासून लोकशाही राज्यव्यवस्था दूर गेली आहे. लोकशाहीचा पाया जसा अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा आहे तसाच तो कल्याणकारी राज्य या संकल्पनेचाही आहे. पण, म्हणजे फक्त लोकप्रिय घोषणा आणि प्रतिमेचा मतांसाठी करायचा वापर इतक्या पुरतीच मर्यादित होताना दिसत आहे. नाहीतर कुणातरी गोयलला शिवाजी महाराजांशी मोदींची तुलना करावी असे का वाटले असते. ही तुलना महाराष्ट्रात भाजपला सत्तास्थापनेत अपयश मिळाल्यानंतर केली आहे आणि ती महाराष्ट्रासाठी नसून उत्तर भारतातील हिंदी जनतेत आपला अजेंडा रेटण्यासाठी आहे. महाराष्ट्र व्यर्थच त्यामध्ये गोवला गेला आहे. गुजरातच्या पाटय़पुस्तकात शिवाजी महाराजांच्या विषयी खोटेनाटे लिहिले गेल्याची टीका अगदी तीन-चार वर्षांपूर्वी झाली होती. त्यामुळे जोपर्यंत खरे शिवाजी महाराज देशातील लोकांना समजत नाहीत तोपर्यंत त्यांच्याविषयी मिथकं निर्माण करणे सुरूच राहणार आहे. महाराष्ट्रात त्यामुळेच या पुस्तकाला विरोध होणे स्वाभाविक होते. पण, त्यातून त्यामागील हेतू नष्ट होणार आहे काय? जेम्स लेन प्रकरण ज्या पद्धतीने तापवले गेले आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रात ब्राह्मण-ब्राह्मणेतर अशी विभागणी झाली, त्यानंतर त्या पुस्तकावरील बंदीही कायम राहू शकली नाही. न्यायालयात महाराष्ट्राची बाजूही नीटपणे मांडली गेली नाही. छत्रपतींचे वारसदार म्हणून केवळ उदयनराजेच नव्हे तर महाराष्ट्रातील प्रत्येक राजकीय पक्षाने त्यासाठी प्रत्येक मराठी माणसाची माफी मागायला हवी होती. पण, हेतू साध्य झाल्यानंतर अशा गोष्टींना सोयिस्कररित्या विसरले जाते. गोयल यांच्या पुस्तकाचा हेतूही साधला गेला आहे. त्यामुळे या वादात पडायचे की, शिवरायांच्या प्रतापाला आठवून शिवनीतीने राज्य चालवायचे ते केंद्र आणि राज्य सरकारने आपल्या कृतीतून दाखविण्याची गरज आहे. महागाईच्या गर्तेतील जनतेला भलत्याच मुद्यावर भडकावणे आता थांबवले पाहिजे. शिवरायांचा प्रताप काय होता? त्यांची कृती कशी होती आणि राज्य कसे चालवले होते हे जाणले तर लोक प्रती शिवाजी आणि जाणता राजा या उपमांनाही लोक खपवून घेतात. हे महाराष्ट्रातच घडले आहे. त्यामुळे त्यातून बोध घेतला गेला तर अशी संघर्षाची परिस्थिती निर्माण होणार नाही.

Related posts: