|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » पारंपरिक वेशभूषा दिनी समाधीस्थळी विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी

पारंपरिक वेशभूषा दिनी समाधीस्थळी विद्यार्थ्यांची हुल्लडबाजी 

कराडकर संतप्त, पोलिसांकडून हुल्लडबाजी करणाऱया युवकांची धरपकड

वार्ताहर/ कराड

बुधवारी मकर सक्रांतीनिमित्त शहर व परिसरातील महाविद्यालयांमध्ये पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. काही अतिउत्साही विद्यार्थांनी स्वर्गीय यशवंतराव चव्हाण समाधी परिसरात प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून प्रीतिसंगम बागेत अक्षरश: धुडगुस घातला. त्यामुळे यशवंतप्रेमी व कराडकर नागरिक संतप्त झाले. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली शहर पोलिसांनी धुडगुस घालणाऱया युवकांची धरपकड सुरू केली. रात्री उशिरापर्यंत पोलिसांची कारवाई सुरूच होती.

   मकरसंक्रातीच्या निमित्ताने बुधवारी विद्यानगर व शहर परिसरातील महाविद्यालयात पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात आला. प्रतिवर्षी केवळ महाविद्यालयाच्या परिसरातच पारंपरिक वेशभूषा दिन साजरा करण्यात येतो. यावर्षी मात्र विद्यानगर येथील महाविद्यालय परिसरात अतिउत्साही विद्यार्थांकडून हुल्लडबाजीचा प्रकार घडल्याने पोलीस व सुरक्षा रक्षकांनी हुल्लडबाजांना हुसकावून लावले. यानंतर मोठया संख्येने विद्यार्थी व विद्यार्थिनी प्रीतिसंगम बागेच्या परिसरात आले. यावेळी काही युवकांनी प्रीतिसंगम बागेत प्रतिकात्मक प्रेतयात्रा काढून प्रचंड हुल्लडबाजी केली. याबाबतचा व्हिडीओ काही वेळातच सोशल मिडियावर व्हायरल झाला. त्यावर संतप्त प्रतिक्रिया उमटण्यास सुरूवात झाली.

   समाधीस्थळी अंत्ययात्रा काढल्यानंतर यशवंतप्रेमींसह कराडकरांमधून संतप्त भावना व्यक्त झाल्या. काही नागरिकांनी याबाबतची माहिती डीवायएसपी सूरज गुरव यांना दिली. त्यांनी या नागरिकांच्या तक्रारींची दखल घेत धुडगुस घालणाऱया युवकांची धरपकड सुरु केली. रात्री उशिरापर्यंत पोलीस युवकांचा शोध घेत होते. बागेतील सीसीटीव्ही फुटेज व सोशल मिडीयावर व्हायरल झालेल्या व्हीडीओतील युवकही पोलिसांच्या रडारवर आहेत. दरम्यान, प्रीतिसंगमावर धिंगाणा घालणाऱया सर्वांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा गुरव यांनी दिला आहे. यापुढे असे कृत्य करणाऱयांवरही कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. प्रीतिसंगम बागेत नगरपालिकेचे सुरक्षा रक्षक तैनात असतात. त्यांच्या उपस्थितीत हा प्रकार घडला असून सुरक्षा रक्षक काय करत होते? असा सवाल कराडकरांनी उपस्थित केला आहे.

Related posts: