|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » राजधानीत मालुसरे मामांचं उत्साही स्वागत

राजधानीत मालुसरे मामांचं उत्साही स्वागत 

चित्रपटाला उदंड प्रतिसाद, तानाजींचा पराक्रम पाहणाऱया रसिकांवर ऑफर्सचा वर्षाव

प्रतिनिधी/ सातारा

नवीन वर्षात बॉलिवूडकडून प्रेक्षकांना एकाच दिवशी दोन सिनेमांची ट्रीट देण्यात आली. दीपिका पदुकोणचा छपाक तर अजय देवगणचा तानाजी-द अनसंग वॉरिअर सिनेमा 10 जानेवारीला प्रदर्शित झाला. प्रदर्शनापूर्वीचे हे दोन सिनेमे अनेक कारणांमुळे चर्चेत होते. अजयच्या तानाजीने आत्तापर्यंत करोडो रुपयांची कमाई केली असून हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर राज्य करत आहे. ऐतिहासिक राजधानी साताऱयात देखील रसिकांना तानाजी चित्रपटाने गारुड घातले आहे. तर चित्रपटाची क्रेझ आणि तानाजींच्या पराक्रमावर बेहद खुश असलेल्या हॉटेल्स मालक तसेच काही दुकानदारांनी चित्रपटाचे तिकीट दाखवल्यास ऑफर्सचा खजिना खुला असल्याने सध्या शहरात तानाजी चित्रपटाच्या निमित्ताने मालुसरे मामांच स्वागत मोठय़ा उत्साहात सुरू आहे.

 महाराष्ट्राच्या कडेकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि त्यांच्या मावळ्यांच्या शौर्यगाथांचे सूर आजही गुंजत असतात. महाराज आणि त्यांच्या मावळ्यांच्या या पराक्रमांबद्दल आजवर बऱयाच साहित्यातून आणि चित्रपटांमधून आपल्याला माहिती मिळाली आहे. याच सुवर्णमय इतिहासाची दखल आता बॉलिवूडनेही घेतली ती तानाजी-द अनसंग वॉरिअर या चित्रपटात. अभिनेता अजय देवगणने नरवीर तानाजी मालुसरे यांच्या भूमिकेत जीव ओतून काम केल्याने पराक्रमाचा धगधगता इतिहास रसिकांच्या हृदयावर राज्य करत आहे.

   सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली भूमी. मराठा साम्राज्याची राजधानी. सैनिकी परंपरेचा गौरवशाली इतिहास बलिदान देवून अंगाखांद्यावर मिरवणारा सातारा जिल्हा. सध्या सातारा शहरातील मल्टिफ्लेक्समधील चित्रपटगृहात तानाजी चित्रपट रसिकांची गर्दी खेचत आहे. सिंहगडाच्या संग्रामामध्ये तानाजी मालुसरे यांचं योगदान, कोंढाण्याच्या लढाईसाठी त्यांनी कुटुंबावर ठेवलेलं तुळशीपत्र या सर्व गोष्टी पुन्हा एकदा चित्रपटाच्या रुपानं जाग्या केल्या जाणार आहेत. तेव्हा आता ‘आधी लगीन कोंढाण्याचं मग आमच्या रायबाचं’, असं म्हणणाया एकनिष्ठ तानाजींची गाथा अनुभवण्यासाठी उत्सुकतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.

   या चित्रपटाचा फिव्हर एवढा आहे की मग एका हॉटेल मालकाने तानाजी चित्रपट पाहून आल्याचे तिकीट दाखवा चिकन थाळी मोफत असा उपक्रम सुरु केला आहे. तानाजी मालुसरे यांच्यावरील प्रेम किती अफाट आहे याचा हा नमुना तर पोवईनाक्यावरील एका ऑटो स्पेअपपार्ट विक्रेत्याने हेल्मेट खरेदीवर तानाजी चित्रपट पाहणाऱयांना 100 रुपये डिस्काउंट जाहीर करुन टाकला आहे तर अनेक ठिकाणी अशा ऑफर्स सध्या सोशल मिडियावर धुमाकूळ घालत असल्याने राजधानीत तानाजीचं वारं असल्याचा प्रत्यय येत आहे.

Related posts: