|Monday, January 27, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार

खासदार श्रीनिवास पाटील यांना जीवनगौरव पुरस्कार 

प्रतिनिधी/ कराड

महाराष्ट्रातील सामाजिक क्षेत्रातील पुणे येथील मान अभिमान विकास फाऊंडेशन या संस्थेतर्फे देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक विजेते आणि कराडचे थोर सुपुत्र ऑलिम्पिकवीर पैलवान खाशाबा जाधव यांच्या जयंतीचे औचित्य साधून खासदार व शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडीचे संकल्पक श्रीनिवास पाटील यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले.

मलकापूर येथील श्री मळाईदेवी ग्रुपचे संस्थापक, शेतीमित्र अशोकराव थोरात यांना ‘प्रेरणा’ पुरस्कार’ तर डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील, भारत केसरी पैलवान विजय गावडे (पुणे) यांना ‘महाराष्ट्र गौरव’ पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. मानपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ, फेटा, मानधन असे या पुरस्काराचे स्वरूप होते. याचबरोबर संस्थेच्या पदाधिकाऱयांचा आणि सातारा आणि कराड परिसरातून आलेल्या क्रीडापटू, क्रीडा मार्गदर्शक, समाजसेवकांचाही यावेळी सन्मान करण्यात आला. हिंदकेसरी दीनानाथ सिंह अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय कुस्ती महासंघाचे उपाध्यक्ष हरीष कदम, शाहू शिक्षण संस्थेचे संचालक अजय साळुंखे, पुरस्कार निवड समिती सदस्य प्रा. विनोद कदम, प्रा. अमोल साठे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

श्रीनिवास पाटील यांनी कुस्तीसंबंधी अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिला. बालेवाडी स्टेडीयममध्ये सध्या 30 खेळांचे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती त्यांनी दिली. महाराष्ट्राच्या कुस्तीपटूंनी मैदाने गाजवली आहेत. मात्र सध्या महाराष्ट्रातल्या मातीतला हा खेळ असूनही महाराष्ट्रीयन खेळाडू मागे पडत असल्याचे सांगत सरकार या कुस्तीपटूंना पाठिंबा देईलच पण आपली मुलं समजून गावकऱयांनीही त्यांना मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. खेळांबाबत कोणतीही मदत लागल्यास थेट मला येऊन भेटा मी नक्कीच स्वत: लक्ष घालून मदत करेन, असे आश्वासनही पाटील यांनी केले.

पै. दिनानाथ सिंह म्हणाले की, ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांच्या भूमीत होणारा हा कार्यक्रम कुस्तीपटूंना प्रेरणा देणारा आहे. यातून प्रेरणा घेऊन खेळाडूंनी देशाचे नाव उज्ज्वल करावे. पै. अमोल साठे म्हणाले की, खाशाबा जाधव यांची जयंती 15 जानेवारीला असून देशाचे पहिले ऑलिम्पिक पदक पटकावणाऱया खाशाबांचा जन्मदिवस राज्य क्रीडा दिवस म्हणून साजरा करण्यात यावा. तसेच खाशाबांना मरणोत्तर पद्म पुरस्काराने गौरवण्यात यावे.

यावेळी संस्थेचे अध्यक्ष प्रा. अरुण पिसाळ यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. विनोद कदम यांनी आभार मानले.

 

Related posts: