|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » करिअर निवडा सावधगिरीने

करिअर निवडा सावधगिरीने 

श्रेयस आणि त्यांचे आईवडील आमच्याकडे आले तेव्हा तो एमबीबीएसच्या पहिल्या वर्षाला होता. त्याला आतापर्यंत इंटर्नल टेस्टसना जे मार्कस् मिळाले होते ते एकआकडी होते. त्याला अभ्यास जमत नव्हता. आवडत नव्हता, इतकंच नव्हे तर त्याला जरा मेडिकल कोर्सविषयीच तिटकारा उत्पन्न झाला होता. फिजीओलॉजी प्रॅक्टिकल करताना स्वतःच्या बोटाला सुई टोचून त्या रक्ताचा थेंब स्लाईझवर घेऊन मायक्रोस्कोपखाली तपासायचा होता. श्रेयसची घाबरगुंडी उडाली. तो थरथर कापू लागला. क्लिनीकला जाणं अजून सुरुच झालं नव्हते. पण आसपासचे पेशंट नुसते पाहून त्याला भीती वाटायची, ऍनॉटॉमी प्रॅक्टिकल करताना फॉर्मलीनचा वास सहन व्हायचा नाही. स्वतः डिसेक्शन करणं राहिलं बाजूलाच, त्याला ‘डेड बॉडी’ पाहूनच मळमळायचं! खरं तर काही गोष्टी विकून, दागिने गहाण ठेवून, कर्ज काढून सामान्य बुद्धिमत्तेच्या श्रेयसला ‘मॅनेजमेंट सीट’ घेऊन एम. बी. बी. एस.ची ऍडमिशन घेतली होती. आणि आता तर त्याला क्षमता आणि आवड दोन्हीही नाहीत, हे स्पष्ट दिसतं होतं.

   आम्ही श्रेयसच्या काही सायकॉलॉजिकल टेस्टस् केल्या. त्याचा आय क्मयू 110 होता. तो फार बुद्धिमानही नव्हता, व्यक्तिमत्व बहिर्मुख होतं. छानछोकी ब्रँडेंड शर्टस्, पाटर्य़ा, मित्रांबरोबर भटकणं यातच वेळ अधिक जायचा. सी.डी.एम. या टेस्टनुसार त्याचा कल कॉमर्सकडे होता. शिवाय जीवनाकडून त्याच्या अपेक्षांमध्ये पैसा पहिल्या क्रमांकावर होता. मल्टिपल इंटेलिजन्स टेस्टमध्ये त्याचे इंटरपर्सनल स्कील्स उत्तम आहेत, असं दिसून येत होतं. रियासेक टेस्टनुसार वैद्यकीय व्यवसायासाठी लागणारी सामाजिक जाणीव व सेवावृत्ती त्याच्यात कमी होती. पण तो एंटरप्रायझिंग होता. स्टडी स्कील्सच्या टेस्टचा रिपोर्ट अत्यंत निराशाजनक होता. एकंदरीत त्याला मेडिकल कोर्स अजिबात झेपणार नव्हता, असं असताना श्रेयस हट्टाने मेडिकल कॉलेजला गेलाच का? हे मी त्यालाच एकांतात विचारलं, विश्वासात घेऊन विचारलं आणि काही झालं तरी आपण तुझ्यासाठी योग्य करिअरची निवड करू हा दिलासाही दिला. तो अक्षरशः रडायला लागला. आईवडिलांनी परवडत नसताना आपली इच्छा पुरविली, पैसे, वर्ष फुकट गेले आणि आता करायचं तरी काय’ त्याला वाईट वाटणं साहजिक होतं. शिवाय जे घडतं ते त्याला फार अपमानास्पदही वाटत होतं. मेडिकल कोर्स सोडायला हवा हे तर त्याचे त्यालाही कळत नाही. लोक काय म्हणतील, याची भीती वाटत होती.

तो स्वतःच हे सगळं सांगत होता. तो शांत झाल्यावर मी त्याला पुन्हा तोच प्रश्न विचारला, ‘मग तुला मेडिकल कॉलेजला जावंसं का वाटलं हे सांग तरी आणि तरच तुझ्यासाठी योग्य करिअर निवडता येईल. नाहीतर पुन्हा अशीच चूक होऊ शकते.’

बेळगाव-कोल्हापूरच्या दरम्यान तालुक्मयाचं ठिकाण म्हणजे अगदी खेडेगाव नाही. मोठं शहरही नाही, असं श्रेयसच गाव होतं. श्रेयस सांगत होता… आमच्या गावात सगळय़ात जास्त भाव मिळायचा तो डॉक्टर लोकांना. लोकप्रियता, मानसन्मान हे सगळं कोणाकडे असायचं तर डॉक्टरकडे! मला अशी रिच लाईफस्टाईल हवी होती. म्हणून मी मेडिकल कॉलेजला जायचा हट्ट धरला. श्रेयसनं त्याला हवं तेवढंच डॉक्टरी पेशातील पाहिलं होते. शिवाय त्याचं गृहीतकच चुकीच्या समजुतीवर आधारीत होतं. त्याला जमणारी, झेपणारी त्याला हवं ते देणारी, त्याचे दोष झाकणारी आणि गुणांचा उपयोग होणारी करिअर त्याला मी सुचविली. त्यानं बीबीए किंवा बीसीए करावं बेळगावातच आणि नंतर प्रवेश परीक्षा देऊन एमबीए करावं. एखाद्या मल्टीनॅशनल कंपनीत अनुभव घेऊन तो स्वतःची इंडस्ट्री सुरु करु शकतो किंवा जॉबमध्येही प्रगती करत एखाद्या कंपनीचा सीईओ होऊ शकतो. अशा प्रकारचे गुण त्याच्या व्यक्तिमत्वात आहेत, हेंही टेस्ट रिपोर्टस्मध्ये मी त्याला दाखवून दिलं.

ही गोष्ट आहे 15 वर्षापूर्वीची. आता श्रेयस खरोखरच एका मल्टीनॅशनल कंपनीत मोठय़ा पदावर आहे. सतत फॉरेन टुर्स चाललेल्या असतात. भरपूर मोठ्ठं पॅकेज…. त्याला हवं ते सगळं मिळालंय. खूष आहे बेटा!

आयुष्याकडून नेमकं काय हवं, याचा प्राधान्यक्रम लावताना श्रेयससाठी पैसा प्रथम क्रमांकावर होता. त्याचे गुणदोष लक्षात घेता पैसा हा डॉक्टरांपेक्षा बिझनेस इंडस्ट्रीत जास्त मिळू शकतो. हे समजविल्यावर तो फक्त यशाची शिडी चढत राहिला. आपल्याला काय जमत नाही. यापेक्षा आपल्याला हवे ते मिळविता येण्यासाठी, काय जमू शकेल याचा विचार करुन करिअरची निवड करा. लक्षात घ्या. नुसते शैक्षणिक अभ्यासक्रम म्हणजेच करिअर नव्हे. आपल्याला हवे ते मिळविण्याची ही माध्यम आहेत. तुमची 70 ते 80 टक्के लाईफस्टाईल करिअरवर अवलंबून असते. तुमचा 70 टक्के वेळ करिअरसाठी दिला जातो. करिअर मॅनेजमेंट इज ऑफ मॅनेजमेंट हें लक्षात घ्या.

बेस्ट ऑफ लक! करिअर चॉईससाठी आणि जे हवं ते सगळं करिअरमधून मिळविण्यासाठी!!!                                               

-डॉ. रमा मराठे

Related posts: