|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » शेजवलीत आढळले बिबटय़ाचे दोन बछडे

शेजवलीत आढळले बिबटय़ाचे दोन बछडे 

 वार्ताहर/ राजापूर

तालुक्यातील शेजवली गावात जवळपास 15 दिवसांपूर्वी बिबटय़ाची दोन बछडे ग्रामस्थ आणि मुलांनी पाहिलेली असताना गुरूवारी सायंकाळी पुन्हा एकदा दोन बछडे आढळून आली आहेत. या दोन्ही पिल्लांना वनविभागाने पिंजऱयात बंद करून सुरक्षितस्थळी सोडले आहे.

शेजवली परिसरात मागील काही दिवसांपासून बिबटय़ांच्या बछडय़ांचा वावर सुरू असताना गुरूवारी सायंकाळी 7 च्या सुमारास शेजवली-वरचीवाडी येथील विजय गुणाजी परवडे यांच्या घरात बिबटय़ाचा एक बछडा शिरला तर एक बछडा बाहेर होता. आराडाओरड झाल्यानंतर दोन्ही बछडय़ांनी तेथून पळ काढला आणि प्रकाश महादेव मांजरे यांच्या मालकीचा गोठय़ा असलेल्या लाकडाच्या माचाखाली जाऊन लपले. या बाबत शेजवली उपसरपंच मंदार राणे यांनी राजापूर वनविभागाला खबर दिली. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी रात्री पिंजऱयासह घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर ग्रामस्थांच्या मदतीने दोन्ही बछडय़ांना पिंजऱयात बंद करण्यात आले. या कामी वनविभागाचे विभागीय अधिकारी रमाकांत भवर यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी वनक्षेत्रपाल प्रियांका लगड, राजापूर वनपाल एस. व्ही. घाटगे, वनरक्षक संजय रणधीर, सहकारी दीपक म्हादये, विजय म्हादये, दीपक चव्हाण आदींनी मोलाची भूमिका बजावली. बिबटय़ाच्या पिल्लांना पिंजऱयात बंद करण्यासाठी शेजवली उपसरंपच मंदार राणे, राजेंद्र देवळेकर, सुरेश परवडे, रामचंद्र देवळेकर, विलास परवडे, प्रथमेश परवडे आदी ग्रामस्थांनी वनविभागाला सहकार्य केले. दरम्यान बिबटय़ाचे हे बछडे 7 ते 8 महिन्याचे असल्याची माहिती वनविभागाने दिली. पिंजऱयातील बिबटय़ाच्या बछडय़ांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.

दरम्यान शेजवली गावात काही दिवसांपूर्वी घराच्या वाशांमध्ये बिबटय़ाचे बछडे अडकले होते. त्यानंतर सुमारे 15 दिवसांपूर्वी याच गावात बिबटय़ाचे 2 बछडे आढळून आले होते. बिबटय़ाच्या बछडय़ांना बघितल्यानंतर शालेय विद्यार्थ्यांनी आरडाओरडा केल्याने व नंतर कुत्र्यांनी पाठलाग केल्यामुळे एक बछडा घाबरून कणकीच्या बेटावर चढला. या बछडय़ाची वनविभागाच्या अधिकाऱयांनी सुखरूप सुटका केली होती. त्यानंतर गुरूवारी पुन्हा एकदा दोन बछडे आढळून आले.    

  

Related posts: