|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश

ज्येष्ठ कसोटीपटू बापू नाडकर्णी कालवश 

वृध्दापकाळाने वयाच्या 87 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

प्रतिनिधी/ मुंबई

भारतीय क्रिकटचे माजी अष्टपैलू कसोटीपटू बापू उर्फ रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी यांचे शुक्रवारी मुंबईत वफद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी, जावई, नातू असा परिवार आहे. बापू नाडकर्णी पवईतील हिरानंदानी गार्डन येथे मुलीकडे राहत होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. बापूंच्या निधनाने एक बुजुर्ग आणि भारतीय क्रिकेट विश्वातील जुना-जाणता क्रिकेटपटू काळाच्या पडद्याआड गेला आहे.

महाराष्ट्राच्या नाशिक जिह्यात 4 एप्रिल 1933 मध्ये नाडकर्णी यांचा जन्म. रमेशचंद्र गंगाराम नाडकर्णी असे त्यांचे पूर्ण नाव. परंतु, क्रिकेटविश्व त्यांना बापू नाडकर्णी याच नावाने ओळखते. 1955 ते 1968 यादरम्यान भारतीय कसोटी संघाचे प्रतिनिधीत्व केले. 1955-56 मध्ये फिरोजशहा कोटला मैदानावर न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात बापूंनी आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमध्ये पहिले पाऊल ठेवले. त्यांनी 41 कसोटी 25.70 च्या सरासरीने एक शतक व 7 अर्धशतकांसह 1414 धावा केल्या तर गोलंदाजीत 29.07 च्या सरासरीने 88 गडी बाद केले. 1968 मध्ये त्यांनी अखेरचा कसोटी सामना खेळला होता. बापू नाडकर्णी सर्वोत्तम अष्टपैलू क्रिकेटपटूंपैकी एक होते. बापू 1950-51 मध्ये पुणे विद्यापीठाकडून रोहिंटन बरिया चषकात खेळले. त्यानंतर 1951ö52 मध्ये महाराष्ट्राच्या संघातून त्यांनी प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर दोन वर्षांनंतर ब्रेबॉर्न स्टेडियमवर तेव्हाच्या बॉम्बे संघाविरुद्ध त्यांनी आपले पहिले शतक झळकावले. 103 मिनिटांच्या खेळीत त्यांनी हे शतक साजरे होते. प्रथमश्रेणी क्रिकेटमधील सातत्यपूर्ण अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर त्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले होते.

 

कंजुश गोलंदाज

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात ‘कंजुश गोलंदाज’ अशी बापूंची ओळख होती. कसोटीत सलग 21 षटके निर्धाव टाकण्याचा विश्वविक्रम बापूंनी 12 जानेवारी 1964 रोजी इंग्लंडविरुद्ध रचला होता. चेन्नईच्या (तेव्हाचे मद्रास) मैदानावर हा सामना झाला होता. बापू डाव्या हाताने फिरकी गोलंदाजी करायचे. इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात त्यांनी 32 षटके टाकली. त्यातील तब्बल 27 षटके निर्धाव होती. 32 षटकांत त्यांनी 1.67 च्या सरासरीने केवळ 5 धावा दिल्या होत्या. बापूंचा हा विश्वविक्रम अबाधित राहिला. बापूंच्या गोलंदाजी सरावाचीही तेव्हा नेहमी चर्चा असायची. नेटमध्ये सराव करताना नाणे ठेवून ते सराव करायचे. नाण्याचा अचूक वेध घेऊन मारा करण्याचा त्यांचा प्रयत्न असायचा.

 

Related posts: