|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » ‘हायपरलूप’ आपल्याकडे नको : अजित पवार

‘हायपरलूप’ आपल्याकडे नको : अजित पवार 

  पुणे / प्रतिनिधी :

सार्वजनिक पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून फडणवीस सरकारने मान्यता दिलेल्या, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) मुंबई – पुणे ‘हायपरलूप’ प्रकल्प उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाकारला आहे. ‘हायपरलूप’ जगात कुठे झालेली नाही, त्यामुळे त्याची ट्रायल आपल्याकडे नको. ‘हायपर लूप’ ची ट्रायल घ्यायची आपली क्षमता नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, पुणे ते मुंबई ‘हायपरलूप’ प्रकल्पासाठी सुमारे पाच हजार कोटी रूपयांचा करार केला होता. हा प्रवास ताशी 1,220 किलोमीटर असेल, अशी त्याची रचना होती. हायपरलूप सुरू झाल्यानंतर, वांदे -कुर्ला कॉम्प्लेक्स ते वाकड (पुणे) दरम्यानचे 117.5 किलोमीटरचे अंतर 23 मिनिटांत पार करता येईल, असे त्यांनी सांगितले होते. 70 हजार कोटींच्या प्रकल्पासाठी दुबईतील कंपनी गुंतवणुकीस तयार झाली होती. पहिला टप्पा पीएमआरडीए प्राधिकरणाच्या गहुंजे ते उर्से गावापर्यंतचा 11.8 किलोमीटरचा होता. तो अडीच वर्षांत पूर्ण करण्याचे नियोजन होते. त्यासाठी 5 हजार कोटींची तरतूद होती. पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण झाल्यास बीकेसी ते वाकडपर्यंतच्या दुसऱया टप्प्याचे नियोजन होते. त्यानुसार हा टप्पा 6 ते 8 वर्षांत पूर्ण करण्यात येणार होता.

बोगद्याचे नवीन काम हाती

पुणे-मुंबई दरम्यानचा प्रवास सुखकर व्हावा, याकरिता हायपर लूपऐवजी अन्य पर्यायाबाबत मुंबईत नुकतीच चर्चा झाली. घाटातील बोगद्याचे काही हजार कोटींचे नवीन काम हाती घेतले असून, यामुळे वाहतूक कोंडी व वेळेची समस्या मार्गी लागेल. तोपर्यंत ‘हायपरलूप’ हे तंत्रज्ञान पुढे गेले तर त्याचा विचार करू, असे पवार यांनी सांगितले.

पालखी मार्गांचे भूसंपादन तत्काळ कराः अजित पवार

श्री क्षेत्र देहू, आळंदी, पंढरपूर, भंडारा डोंगर, नेवासा पालखीतळ मार्गाचे रुंदीकरण भूसंपादनाअभावी रखडले असून, तत्काळ भूसंपादन करून कामे मार्गी लावा, अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला केल्या आहेत. देहू, आळंदी, पंढरपूर येथील वाळवंट सुधारणा कार्यक्रम, पालखी मुक्काम व रिंगण विकास, पालखी तळ भूसंपादन आदी विषयांची माहिती दिली. संत तुकाराम महाराज, व संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गासाठी तसेच आवश्यक सोयीसुविधेसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही, असेही पवार यांनी यावेळी सांगितले.

मेट्रोचा विस्तार

महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून (महामेट्रो) राबवण्यात येणाऱया पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील दोन मार्गिका तसेच पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पीएमआरडीए) करण्यात येणारी एक मार्गिका अशा तीन मार्गिकांच्या विस्तारीकरणाला उपमुख्यमंत्री आणि जिह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी मंजुरी दिली. वनाजच्या बाजूला चांदणी चौकापर्यंत, रामवाडीच्या बाजूला वाघोलीपर्यंत, पिंपरीच्या बाजूला निगडीपर्यंत, तर स्वारगेटच्या बाजूला कात्रजपर्यंत असे नवे विस्तारित मार्ग राहणार आहेत. हिंजवडी ते शिवाजीनगर मार्ग हिंजवडीच्या बाजूला पिरंगुटपर्यंत वाढविण्यात येणार असून, शिवाजीनगरपासून हडपसरमार्गे लोणी काळभोर-कदमवाक वस्तीपर्यंत पीएमआरडीएची मेट्रो धावेल.

Related posts: