|Saturday, February 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » लगे रहो केजरीवाल

लगे रहो केजरीवाल 

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपच्या पुढे मुसंडी मारली असली तरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रमाणे काँग्रेसकडे चेहरा नाही. ‘केजरीवाल विरुद्ध कोण?’ या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस देऊ शकत नसल्याने या निवडणुकीत आप बाजी मारू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.

दिल्लीतील विधानसभा निवडणूक फेबुवारीच्या पहिल्या पंधरवडय़ात होणार आहेत. तेथे अरविंद केजरीवाल परत मुख्यमंत्री बनणार आहेत अशीच सर्व चिन्हे आहेत. तसे घडले नाही तर तो चमत्कार समजला जाईल. कारण गेल्या पाच वर्षात आम आदमी पक्षाने तळागाळातील लोकांकरता, कनि÷ मध्यम वर्ग तसेच मध्यम वर्गाकरता भरपूर काम करून राष्ट्रीय राजधानीत आपली पकड बसवली आहे. केजरीवाल हे इतर मुख्यमंत्र्यांसारखे नाहीत. मी आणि माझ्या सरकारने काम केले असेल तरच मला मत द्या. जर माझ्या सरकारने काम केले नसेल असे तुम्हाला वाटत असेल आम्हाला तर अजिबात मत देऊ नका असे ते स्पष्टपणे मतदारांना सांगतात. जनतेला भरमसाठ आश्वासनांची खैरात करायची आणि त्यातून सत्ता लाटायची परंपरा सगळीकडे दिसत असताना केजरीवाल यांचा आत्मविश्वास खरेच शोभून दिसतो. ‘अच्छे बीते पांच साल, लगे रहो केजरीवाल’, ही आप पक्षाची घोषणा घराघरात पोहोचली आहे.

या निवडणुकीत काँग्रेस जेवढी मते घेईल तेवढे भाजपचे फावेल असे मोदी-शाहना वाटते. याउलट भाजपची आणि आपची मते कशी खाता येतील अशी काँग्रेसची रणनीती आहे. ‘चोर चोर मौसिरे भाई’ या न्यायाप्रमाणे मोदी आणि केजरीवाल हे आतून मिळालेले आहेत असा काँग्रेसचा आरोप आहे तर आपण शीला दीक्षित यांचा सुवर्णकाळ परत दिल्लीत आणू असे सोनिया आणि राहुल गांधी सांगत आहेत. पण राजधानी दिल्ली गेल्या दोन दशकात पार बदलली आहे. पंजाबी चेहरा असलेल्या दिल्लीने उत्तर भारतीय म्हणजे ‘पुरबिया’ (पूर्वी उत्तर प्रदेश आणि बिहार) चा रंग आता जास्त धारण केला आहे कारण या दोन प्रांतातून लाखो लोक दिल्लीत उदरनिर्वाहासाठी आले आहेत आणि त्यांची मतपेढी फार महत्त्वाची झाली आहे. दिल्ली भाजपचे प्रमुख असलेले मनोज तिवारी हे भोजपुरी चित्रपटातील आघाडीचे नायक असल्याने त्यांना मुख्यमंत्रीपदाची स्वप्ने पडली नसती तरच नवल ठरले असते. पण दिल्ली भाजपमध्ये किमान अर्धा डझन नेते असे आहेत की त्यांना मुख्यमंत्री बनायचे आहे. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन हा दिल्लीतील जाणता नेता असला तरी त्याला पक्षाने कधीच न्याय दिलेला नाही. माजी केंद्रीय मंत्री विजय गोयल हे महत्त्वाकांक्षी आहेत आणि मुख्यमंत्रीपदावर त्यांची बऱयाच काळापासून नजर आहे. प्रवेश वर्मा हे माजी मुख्यमंत्री साहेबसिंग वर्मा यांचे चिरंजीव आहेत आणि भाजपचा जाट चेहरा आहेत. विदेशी सेवेतून निवृत्त होऊन मोदी-शाह यांच्या आशीर्वादाने केंद्रात मंत्री झालेले शीख नेते हरदीप पुरी हे बाजी मारून नेतील काय अशी भीती इतरांना वाटत आहे. तात्पर्य काय तर भाजप अंतर्गत प्रचंड राजकारण सुरू आहे त्याचा आयता फायदा केजरीवाल याना मिळणार असे बोलले जाते.

भाजप विकासवादी राष्ट्रवादाच्या मुद्यावर केजरीवालना चारी मुंडय़ा चित करू पाहत आहे. पण तेल लावलेल्या पहिलवानांप्रमाणे दिल्लीचे मुख्यमंत्री मोदी-शाह यांच्या कचाटीतून शिताफीने सुटत आहेत. एकेकाळी ‘पंतप्रधान मला जीवे मारायला निघाले आहेत’ असा आरोप करणारे केजरीवाल मोदी परत सत्तेवर आल्यावर त्यांच्याविषयी लोण्यासारखे मऊ झालेले आहेत. भाजप केंद्रात आणि दिल्लीतील म्युनिसिपल कॉर्पोरेशनमध्ये राज्य करत आहे. आता राज्य सरकार हाती आले तर तिब्बल एंजिनाच्या जोरावर राजधानीतील विकासाची गाडी भरधाव दौडेल असा मोदी-शाह यांचा प्रचार म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बेभरवशाच्या कारभाराने फिका पडत आहे. नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या करता केजरीवाल हे एक कोडे बनले आहेत. काहीही करून दिल्लीत भाजपाला सरकार बनवायचे आहे. त्याकरता ते जंग जंग पछाडत आहेत. केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर याना या ‘दिल्ली स्वारी’ करता प्रभारी बनवण्यात आलेले आहे पण पक्षातील जाणकार मात्र केजरीवाल परत एकदा बाजी मारून जाणार असे मानत आहेत. गेल्या विधानसभा निवडणुकीत केजरीवाल याना 67 तर भाजपला अवघ्या 3 जागा मिळाल्या होत्या. दिल्ली विधानसभा 70 जागांची आहे. केजरीवाल हे घाग राजकारणी आहेत. त्यांनी जाणूनबुजून नागरिकता दुरुस्ती कायदा बाबत गोलमोल भूमिका घेऊन मोदी-शाहना गुगली टाकला आहे. आपल्या मुस्लिम मतपेढीला खुश ठेवण्यासाठी केजरीवाल जहाल भूमिका घेतील अशी भाजपाची अटकळ फोल ठरली. विधानसभा निवडणुकीत मोदी-शाह याना हरवण्यासाठी आम आदमी पक्षाला मत देण्याशिवाय अल्पसंख्यानक समाजाला गत्यंतर नाही हे केजरीवाल जाणून आहेत. दोन कोटीहून अधिक लोकसंख्या असलेल्या राजधानी दिल्लीत केजरीवाल यांनी काही मूलभूत काम केलेले आहे त्याचा फायदा त्यांना निवडणुकीत मिळू शकतो. लोकांना स्वस्त दरात वीज मिळत आहे तर राजधानीच्या विविध भागात मोहल्ला क्लिनिक खोलून आम जनतेचा त्यांनी दुवा मिळवला आहे. सरकारी शाळांमधील शिक्षणाचा दर्जा त्यांनी सुधारलेला आहे तसेच खाजगी शाळांमध्ये गरीब विद्यार्थ्यांना नाममात्र फी देऊन शिकवणे भाग पाडले आहे. ज्या भागात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष आहे तिथे दररोज टँकरद्वारे पाणी पुरवण्याचे काम देखील केले गेले आहे.आत्तापर्यंत कोणत्याही राज्यात पार न पडलेल्या योजना केजरीवाल यांनी यशस्वीरीत्या राबवल्या आहेत. आपल्या कामाचा ढोल कसा पिटायचा हे केजरीवाल याना चांगलेच माहिती असल्याने त्यांनी आम आदमी पक्षाचा ‘झाडू’ सगळीकडे पसरवला आहे.

गमतीची गोष्ट अशी की लोकसभा निवडणुकीत लाखेंच्या मताधिक्मयाने भाजपला जिंकवणारे दिल्लीकर स्थानिक प्रश्नावर केजरीवाल यांचा जयजयकार करताना दिसतात. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने आपच्या पुढे मुसंडी मारली असली तरी विधानसभा निवडणुकीत भाजपप्रमाणे काँग्रेसकडे चेहरा नाही. ‘केजरीवाल विरुद्ध कोण?’ या प्रश्नाचे उत्तर भाजप आणि काँग्रेस देऊ शकत नसल्याने या निवडणुकीत आम आदमी पक्ष बाजी मारू शकतो असा जाणकारांचा अंदाज आहे.

दिल्लीमध्ये या वेळेला भाजप जिंकली नाही तर तो पक्षाकरता अपशकुन ठरेल. याला कारण असे की दिल्ली म्हणजे ‘छोटा भारत’ होय. येथे आमचा पक्ष हरला तर पुढील लोकसभा निवडणुकीत आमचे खरे नाही, अशी स्पष्ट कबुली स्थानिक कार्यकर्ते देत आहेत.

सुनील गाताडे

Related posts: