|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » कोण कुठे काय करते

कोण कुठे काय करते 

काही दिवसांपूर्वी टीव्हीवर एक मालिका चालू होती. आसावरी नावाची मध्यमवयीन विधवा नायिका होती. तिच्या घरात तिचे खाष्ट सासरे, उडाणटप्पू मुलगा आणि समंजस सून आहेत. तिच्याच वयाचा विनापाश मध्यमवयीन अभिजित तिच्या प्रेमात पडतो. त्यांच्या प्रेमाला आसावरीचे सासरे, उनाड मुलगा कडाडून विरोध करतात. शेवटी सर्वांचे मतपरिवर्तन होते असा साधारण आशय. धड ना तरुण, धड ना वृद्ध अशा वयात पती निधनानंतर एकाकी पडलेल्या स्त्रीला मन मोकळे करण्यासाठी तिचे असे माणूस नाही. विषय खूप छान. पण त्या मंडळींनी टीआरपीचा विचार करीत त्यांच्याच पद्धतीने तो मांडला. कधी तो सुसहय़ झाला तर कधी असहय़. या मालिकेतला उनाड कार्टा आईला सतत अकारण घालून पाडून बोलतो आणि ‘तू तर काय घरातच तर असतेस, तुला कुठे काय काम असतं….’ असं सुनावतो. तेव्हा त्याची बायको त्याला आईची महती समजावते. तो दीर्घ आणि उपहासगर्भ संवाद ‘आई कुठं काय करते’ या शीर्षकाने लोकप्रिय झाला. विविध माध्यमातून व्हायरल झाला, पसरला. तेव्हा त्या शीर्षकाची निर्मात्यांना भुरळ पडली नसती तरच नवल. आता त्या शीर्षकाची नवीन मालिका येऊ घातली आहे. ती चांगली असेल किंवा कशी हे भविष्यातच कळेल.

पण आपल्याकडे भ्रष्ट नक्कल करण्याची परंपरा लक्षात घेता पुढे देखील या शीर्षकाची नक्कल होणारच नाही असे छातीठोकपणे सांगणे कठीण आहे. सरकार आणि विरोधी पक्ष एकमेकांची उणीदुणी काढतात तेव्हा ‘सरकार कुठे काय करते?’ ‘विरोधक कुठे काय करतात?’ अशा शीर्षकाचे अग्रलेख तर नक्कीच वाचायला मिळतील. शेजारचे भावोजी त्यांच्या बायकोचे किती लाड करतात असे म्हणत फुरंगटून बसलेल्या बायकोला ‘मी कुठे काय करतो?’ असे नवरा सुनावू शकेल. सतत दांडय़ा मारणाऱया कामवालीला ‘मी कुठे काय करते?’ असे गृहिणी सुनावू शकेल. पगारवाढ मागताना युनियनवाले ‘सगळी कामे संगणक करतो. आम्ही कुठे काय काम करतो?’ असे मराठीत विचारू शकतात. पण मॅनेजमेंटवाले अमराठी असतील तर समस्या येईल. हिंदीत ‘हम किधर क्मया कुछ काम करताय?’ म्हटलं मॅनेजमेंटवाल्यांना उपहास समजेलच असे नाही. त्यांना आधी मराठी मालिकेचे कथानक थोडक्मयात समजावून सांगावे लागेल! हो की नाही?

Related posts: