|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » आता नाईट लाईफ

आता नाईट लाईफ 

महाराष्ट्रात ठाकरे सरकार सत्तारुढ झाले आहे आणि युवा नेते आदित्य ठाकरे यांनी प्रजासत्ताक दिनापासून म्हणजे येत्या 26 जानेवारीपासून मुंबईत नाईट लाईफ सुरू करणार अशी घोषणा केली आहे, म्हणजे मुंबई आता घडाळय़ाप्रमाणे चोवीस तास चालणार आहे. जागती राहणार आहे. रात्री-अपरात्री कसे जायचे आणि हवे ते कसे मिळवायचे असा प्रश्न यापुढे कोणालाच पडणार नाही. मुंबई  चोवीस तास, सात दिवस सुरु राहणार आहे. मुंबईतील हॉटेल्स, बार, पफ, टॅक्सी, रेल्वे सेवा अखंड सुरू राहणार आहे. खरेतर 26 जानेवारी हा देश प्रजासत्ताक झाल्याचा दिवस, झेंडा वंदनाचा आणि तिरंगा उंचवण्याचा दिवस. त्या दिवशी नवे प्रकल्प, जनसेवेच्या नव्या योजना आणि लोकशाही व मानवाधिकार यांना बळकटी देण्याचा दिवस. त्या दिवशी ड्राय डे असतो पण आता नाईट लाईफ प्रारंभ डे म्हणूनही 26 जानेवारीकडे बघावे लागेल. आदित्य ठाकरे यांनी तोच मुहूर्त शोधला आणि तशी घोषणा केली आहे. ओघानेच मुंबई ही बँकॉक, पटाया, सिंगापूरप्रमाणे हळूहळू ओपन होणार. उघडी राहणार हे वेगळे सांगायला नको. पर्यटन, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मुंबईचा बोलबाला वृद्धिंगत व्हावा म्हणून ठाकरे सरकारने हा निर्णय घेतला आहे. शाहीर पठ्ठे बापूराव यांनी त्या काळात मुंबई शहराचे जे वर्णन केले आहे, त्यात ‘मुंबई नगरी बडी बाका, जशी रावणाची दुसरी लंका वाजतो डंका चौमुलखी’ असे म्हटले होते. आता नाईट लाईफ सुरू झाल्याने त्यात अधिक भर पडणार आहे. खरे तर न झोपणारे शहर आणि उपाशी न ठेवणारे शहर अशी मुंबईची ख्याती आहे. घडय़ाळाच्या काटय़ावर पोटासाठी धावणारे लोक या महानगरात राहतात. या नगराने कुणालाही उपाशी ठेवलेले नाही. त्यामुळे या शहरात देशातून लोढेंच्या-लोंढे येत असतात. मोठ-मोठी स्वप्ने घेऊन या मायावी नगरीत नशीब काढणारे अनेक आहेत. त्याचप्रमाणे झोपडपट्टीत कसे तरी जगणारेही अनेक आहेत. मुंबईत मराठी टक्का घसरतो आहे आणि परप्रांतीय वाढत आहेत. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा आहे आणि आता महाराष्ट्रावरही ठाकरे सरकार सत्तारुढ झाले आहे. नगर विकास, पर्यटन खाती सेनेकडे आहेत. त्यामुळे मुंबईची बँकॉक किंवा पटाया झाली तर आश्चर्य वाटायला नको. आदित्य ठाकरे यांनी मुंबईच्या हॉटेल चालकांना नाईट लाईफचा शब्द दिला होता आणि त्याची पूर्ती होते आहे. एकीकडे हे होत असताना या निर्णयावर जोरदार टीका होत आहे. पण शरद पवारांपासून सरकारमधील अनेकांना हा निर्णय पसंत पडला असून मुंबईमध्ये नाईट लाईफ सुरू होणार हे आता वास्तव आहे. सरकारच्या या निर्णयाचा आणि सरकारने मते मागत असताना मांडलेल्या विषयाची तुलना करून सरकारवर जोरदार टीका सुरू आहे. मुंबईचे नाईट लाईफ सुरू झाले. चला आता शेतकरी चिंतामुक्त झाले किंवा शिवथाळी आता मागेल त्याला मागेल त्या गावात मिळेल, वगैरे वगैरे ट्रोल सुरू झाले आहेत. स्व. आर. आर. पाटील यांनी गृहमंत्री असताना मोठा रोष पत्करून डान्स बार बंदी केली होती. गुटखा बंदी केली होती. कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी अनेक लहान-मोठय़ा शहरात रात्री 11 नंतर शांतता केली जायची. गाडे, रिक्षा, टपऱया, बार, हॉटेल्स, धाबे बंद केले जायचे. डान्स बार , पब, हुक्का पार्लर, मसाज सेंटर, कॉसिनो, जुगार क्लब यांच्यावर निर्बंध आणले जायचे. तरीही चोरून संगनमताने हे उद्योग व्हायचे. मोठय़ा शहरातील सेक्स रॅकेट्स आणि जुगाराचे अड्डे यांच्यावर कारवाया व्हायच्या. आता तर खुलेआम या गोष्टी होणार आणि यासाठीचा ग्राहक मुंबईची वाट तुडवणार हे वेगळे सांगायला नको. अनेक मोठय़ा शहरातून कॅसिनो खेळायला आणि मद्य चाखायला लोक सिंगापूर, बँकॉकला वगैरे जायचे. गोव्यात प्रुझवर फेरफटका मारायचे. आता या साऱया गोष्टी हळूहळू मुंबईत उपलब्ध झाल्यातर आश्चर्य वाटायला नको. रम, रमा, रमी हाच नाईट लाईफचा खरा अर्थ आहे आणि त्यासाठीची खिडकी चोवीस तास उघडी राहणार आहे. महाराष्ट्रात पुन्हा छमछम सुरू होईल आणि नोटांची उधळण होऊन मुंबईची, महाराष्ट्राची अर्थव्यवस्था गतिमान होईल. आर. आर. पाटील यांच्या आत्म्याला काय वाटेल हा वेगळा प्रश्न आहे. शेतकऱयांच्या आत्महत्या थांबतील का हा वेगळा सवाल आहे. चिंतामुक्त शेतकरी आणि रोजगार प्राप्त युवक, शिवथाळी वगैरे वगैरे करूच पण प्रथम मुंबईचे नाईट लाईफ, पुण्याची मेट्रो आणि मुंबईचा विकास हे सरकारचे धोरण उघड झाले आहे. चोवीस तास शेतीसाठी वीज द्या, अशी मागणी असणाऱया महाराष्ट्राला चोवीस तास नाईट लाईफ देतो असे उत्तर मिळाले आहे. या उत्तराचा ग्रामीण महाराष्ट्रात लगेच परिणाम दिसणार नसला तरी दिसणार नाही असेही नाही. पण शेतकऱयांची पोरं नाईट लाईफच्या नादी लागली, जीवाची मुंबई करायला लागली आणि डान्सबारच्या मोहजालात नोटांचा पंखा करू लागली तर शेती आणि शेतकऱयांचे वाटोळे व्हायला वेळ लागणार नाही. खऱया अर्थाने शेतकरी चिंतामुक्त होऊन जाईल. मुंबई महापालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. भाजपा-मनसे विरुद्ध ठाकरेंची महाआघाडी अशी लढत होणार असे दिसते आहे. मनसेने आपली भूमिका आणि झेंडा बदलून ‘हिंदुत्व’ कार्ड ओपन केले आहे. राज ठाकरे मनसेच्या मेळाव्यात आपली नवी भूमिका मांडणार आहेत. लोकसभा निवडणुकीत शरद पवारांची साथ दिली तर काय होते याचा त्यांनी अनुभव घेतला आहे. राज ठाकरे मुंबई महापालिका डोळय़ासमोर ठेवून नवे निर्णय घेणार हे उघड आहे. मनसे केवळ निर्णय घेणार नाही तर झेंडय़ापासून विचारधारेपर्यंत बदल होणार असे संकेत मिळत आहेत. या साऱया पार्श्वभूमीवर नाईट लाईफचा या निवडणुकीवर कसा परिणाम होतो हे बघावे लागेल. भाजपाने या निर्णयावर टीका सुरू केली आहे. नाईट लाईफच्या मुंबईच्या नागरी जीवनावर आणि कायदा सुव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल, विमानतळ वगैरे ठिकाणी थोडे फार शक्य मानले तरी नागरी वस्त्यात रहिवासी क्षेत्रात लोकजीवन अडचणीत आणता येणार नाही असे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार म्हणत आहेत. राज ठाकरेंची तोफ कशी धडाडते हे लवकरच समजेल. पण उद्धव ठाकरे यांच्या हाती सत्ता एकवटली आहे. शरद पवार यांचे समर्थन आहे. 26 तारखेपासून मुंबई नव्या रूपात दिसली तर आश्चर्य वाटायला नको.

Related posts: