|Monday, February 17, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » स्वविवाह मुहूर्तापेक्षा सैनिकाला देश महत्त्वाचा

स्वविवाह मुहूर्तापेक्षा सैनिकाला देश महत्त्वाचा 

भारतीय सैन्याची ट्विटरवर प्रतिक्रिया : विवाह सोहळय़ात पोहोचू शकला नाही सैनिक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

 एका सैनिकाला स्वतःच्या आयुष्यात अनेक प्रकारचे त्याग करावे लागतात. याचेच उदाहरण म्हणजे एका सैनिकाला स्वतःच्याच विवाहाच्या दिवशी घरी पोहोचता आले नाही. देशाच्या रक्षणासाठी तैनात हिमाचलचा रहिवासी असलेला सैनिक हिमवृष्टीमुळे काश्मीरमधून बाहेर पडू शकला नाही. एक सैनिकासाठी देश सदैव प्रथम असतो आणि आयुष्य काय त्याची प्रतीक्षा करू शकते असे उद्गार सैन्याने काढले आहेत.

सैनिक असलेल्या सुनीलचा विवाह सोहळा गुरुवारी पार पडणार होता. पण हिमवृष्टीमुळे तो काश्मीर खोऱयातच अडकून राहिला. दोन्ही कुटुंबांनी आपाआपल्या घरांना भव्य स्वरुपात सजविले होते तसेच सर्व नातलगही दाखल झाले होते. सर्वजण केवळ सैनिक असलेल्या सुनीलची प्रतीक्षा करत होते.

आयुष्य प्रतीक्षा करणार हा सैन्याने दिलेला शब्द आहे. सैन्याचा एक सदस्य काश्मीर खोऱयातील हिमवृष्टीमुळे स्वतःच्याच विवाहात पोहोचू शकला नाही. चिंता करू नका, आयुष्य प्रतीक्षा करू शकते. देश सदैव अन्य गोष्टींपेक्षा अग्रस्थानी आहे. वधूचे कुटुंब नव्या तारखेसाठी तयार झाले आहेत असे चिनार कॉर्प्सने रविवारी ट्विट करत म्हटले आहे.

मार्ग बंद, विमानसेवा ठप्प

खराब हवामानामुळे सर्व मार्ग बंद झाल्याने सुनील बांदीपोरातच अडकून पडला. सुनीलने श्रीनगरमधून दूरध्वनीद्वारे संपर्क साधत कुटुंबीयांना वस्तुस्थितीची जाणीव करून दिली आहे. काश्मीरमध्ये तैनात सैनिकांची जबाबदारी हिवाळय़ात अधिकच वाढते. प्रचंड हिमवृष्टीतही सैनिक सीमेवर अत्यंत दक्ष असतात. तसेच सर्वसामान्य नागरिकांच्या मदतीसाठी सैनिक तत्पर असतात.

सुनीलबद्दल अभिमान

विवाहाची पूर्ण तयारी दोन्ही कुटुंबांकडून करण्यात आली होती. केवळ सुनीलची प्रतीक्षा करत होतो, त्याच्यासंबंधी चिंता वाटत होती. सीमेवर देशाच्या सेवेत तैनात असलेल्या सुनीलबद्दल आम्हा सर्वांना अभिमान वाटतो. विवाहाची तारीख पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वधूचे काका संजय कुमार यांनी दिली आहे.

Related posts: