|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » दारूधंद्यावरील धाडीत साडेचार लाखाचा ऐवज जप्त

दारूधंद्यावरील धाडीत साडेचार लाखाचा ऐवज जप्त 

प्रतिनिधी/ खेड

तालुक्यातील तिसंगी-पिंपळवाडी येथील जंगलमय भागात बेकायदेशीररित्या सुरू असलेल्या दारूधंद्यावर येथील पोलिसांनी रविवारी पहाटेच्या सुमारास धाड टाकून रसायनासह हातभट्टीचे साहित्य असा 4 लाख 41 हजार 100 रूपयांचा ऐवज जप्त केला. या प्रकरणी विलास लक्ष्मण यादव याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसंगी-पिंपळवाडी येथील माळरानावर गावठी दारूची हातभट्टी धगधगत असल्याची कुणकुण येथील पोलिसांना लागली होती. त्यानुसार पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे, पोलीस नाईक विरेंद्र आंबेडे, पोलीस कॉन्स्टेबल प्रवीण म्हस्के, रूपेश जोगी, साजिद नदाफ, अजय कडू आदींच्या पथकाने सकाळच्या सुमारास धाड टाकली. या धाडीत पोलिसांनी 4 लाख 41 हजार 100 रूपयांचा ऐवज जप्त केला आहे. 12 हजार लिटर दारूचे रसायन पोलिसांनी उद्ध्वस्त केले.

या प्रकरणी संशयितावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 65 (ब) (क) (फ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबतचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सुजित गडदे करत आहेत.  काही दिवसांपूर्वीच पोलिसांनी कुळवंडी व तिसंगी येथे गावठी हातभट्टीच्या दारूधंद्यावर धाड टाकून लाखो रूपयांचा ऐवज जप्त केला होता. पोलिसांचे धाडसत्र सुरूच असल्याने अवैधरित्या दारूधंदा करणाऱया व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. पोलिसांच्या या कारवाईचे सर्वच स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.  

Related posts: