|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » मिऱया बंदर पावसाळय़ापूर्वी सुरक्षित करणार

मिऱया बंदर पावसाळय़ापूर्वी सुरक्षित करणार 

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचे निर्देश

प्रतिनिधी/ रत्नागिरी

नजीकच्या पंधरामाड व लगतच्या गावात येणाऱया पावसाळय़ात समुद्राचे पाणी शिरू नये, यासाठी तातडीने काम सुरू करण्यात यावे, असे निर्देश राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रविवारी दिले. ग्रामस्थांशी संवाद झालेल्या बैठकीत पावसाळ्य़ापूर्वी हा बंधारा संरक्षित केला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले.  सुशोभिकरण व पूर्ण बंधाऱयाच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या बांधकामासाठी 189 कोटीची निविदा काढली जाणार आहे.

  या बैठकीस जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पतन विभागाच्या रूपा गिरासे, पतन अभियंता बी. ए. शिंदे, सहाय्यक पतन अभियंता ए. ए. हुनेरकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुभाष जुंजारे, सुमित भाटकर, दीपक पाटील, विठ्ठल मयेकर, बाळकृष्ण शिवलकर व इतर संबंधित विभागाचे अधिकारी तसेच ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.

  टेट्रापॉडच्या मदतीने समुद्राचे पाणी आत शिरू नये, यासाठी बंधारा संरक्षित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे. यासाठी 2 कोटी 20 लक्ष रुपयांचा निधी देण्यात आला असून इतर कामासाठी एक कोटी 34 लक्ष रुपये निधी यापूर्वीच देण्यात आला आहे. येथे आवश्यक असलेले 60 लक्ष रुपये नियोजन निधीतून देण्यात यावे, असे सामंत यांनी यावेळी सांगितले. बंधारा संरक्षित करण्यासाठी व त्याचे सुशोभिकरण करून या ठिकाणी पर्यटन संधी उपलब्ध करून देण्याचे यावेळी ठरवण्यात आले. सुशोभिकरण व पूर्ण बंधाऱयाच्या साडेतीन किलोमीटर लांबीच्या बांधकामासाठी 189 कोटीची निविदा काढली जाणार असल्याचे सांगण्यात आले.

  पावसाळ्य़ापूर्वी तातडीचे काम म्हणून 2 कोटी 20 लाखांच्या कामाची निविदा यापूर्वीच निघाली आहे. त्या व्यतिरिक्त 1 कोटी 34 लाख आणि नव्याने उपलब्ध होणारे 60 लक्ष रुपये याची अल्प मुदत निविदा काढून पावसाळ्य़ापूर्वी सर्व काम पूर्ण करा, असे निर्देश सामंत यांनी दिले. ग्रामस्थांनी या कामासाठी सहकार्य करावे. प्रशासन आपली बाजू व्यवस्थित पार पाडेल. दोघांच्या समन्वयातून किनाऱयावरील गावांचे संरक्षण केले जाईल, असेही त्यांनी सांगितले.

 

Related posts: