|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिवसेना-मनसेकडे सर्वांचे लक्ष

शिवसेना-मनसेकडे सर्वांचे लक्ष 

शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झाले असून त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेची सभा तर मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईत होत आहे. मनसे आता हिंदुत्वाची भूमिका घेणार का हे पहावे लागणार आहे.

 राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाल्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांची पहिली जयंती 23 जानेवारीला होत आहे. शिवसेनेचा मुख्यमंत्री करण्याचे उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांना दिलेले वचन पूर्ण झाले असून या जयंतीच्या निमित्ताने शिवसेनेची सभा तर मनसेचे पहिले अधिवेशन मुंबईत होत आहे. मनसे आता हिंदुत्वाची भूमिका घेणार असून पक्षाच्या झेंडय़ाचा रंगही बदलण्यात येणार आहे. त्यामुळे मनसेच्या या अधिवेशनाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. तीन वर्षापूर्वी बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनीच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वांद्रे येथील रंगशारदा येथे आता यापुढे शिवसेना स्वबळावर सर्व निवडणुका लढणार असल्याची घोषणा केली होती. त्यानुसार मुंबई महापालिकेची निवडणूक शिवसेनेने स्वबळावर लढविली. मात्र, लोकसभा आणि विधानसभेला युती करून लढविली. आता या जयंतीला शिवसेनेचा मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे काय बोलणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात सत्तांतरावरून एक ते दीड महिना निर्माण झालेला वाद, शिवसेना आणि भाजपमधील कलगीतुरा आणि त्यानंतर शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येत सत्ता स्थापन केली. शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेल्याने शिवसेनेच्या हिंदुत्वाबाबत आता शंका उपस्थित केली जात आहे. त्यातच मनसे हिंदुत्वाची भूमिका घेऊन आता शिवसेनेला शह देण्याच्या तयारीत आहे. इतकेच नव्हे तर आता राज ठाकरे यांना उद्देशून ‘सत्तेसाठी सतराशे साठ आणि हिंदु धर्मीयांचा एकच सम्राट’ अशाप्रकारचे बॅनर मुंबईत ठिकठिकाणी लावले आहेत. तर मनसेने आपल्या पहिल्या अधिवेशनाच्या निमित्ताने जोरदार तयारी केली आहे. दिवसभर या अधिवेशनात विविध विषयांवर मार्गदर्शन केले जाईल. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर राज यांनी तशी आपली कोणतीही जाहीर भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे राज ठाकरे या अधिवेशनात काय बोलणार, त्यातच गेल्या काही दिवसांपासून छत्रपती शिवाजी महाराज, स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरून निर्माण झालेला वाद आणि सरकारमधील पक्षांची असलेली वेगवेगळी भूमिका यावरून राज हे सरकारला लक्ष्य करण्याची शक्यता आहे. आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपने मुंबईतील आपल्या संघटनात्मक पदांबाबत नवीन नियुक्ती केली असून मुंबई महापालिका स्वबळावर लढण्यासाठी भाजप तयारीला लागला आहे. संघटनात्मक पातळीवर विधानसभानिहाय आढावा घेण्यास भाजपने सुरुवात केली असून शिवसेनेचे गेली अनेक वर्षे मुंबई महापालिकेवर असणारे वर्चस्व संपविण्यासाठी भाजप भविष्यात आक्रमक होणार यात शंका नाही. त्यातच आता मनसे भाजपसोबत जाणार का  स्वबळावर लढणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

 मनसेच्या अधिवेशनात राज ठाकरे हे आपले पुत्र अमित ठाकरे यांच्याकडे मोठी जबाबदारी देण्याची शक्यता वर्तविली जात आहे. 9 मार्च 2009 मध्ये पक्ष स्थापन झाल्यानंतर 6 महिन्याच्या आधीच झालेल्या 2009 च्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी 13 आमदार राज्याच्या विविध भागातून निवडून आणले होते. त्यातील आता भाजपात असलेले विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर आणि भाजप आमदार राम कदम वगळता कोणीही आमदार नाही. मनसेच्या ‘त्या’ 13 आमदारांपैकी केवळ नितीन सरदेसाई आणि बाळा नांदगांवकर हे आज मनसेत आहेत. तर गेल्याच आठवडय़ात हर्षवर्धन जाधव आणि प्रकाश महाजन यांनी राज यांची भेट घेतली. त्यामुळे मनसे पुन्हा आपल्या शिलेदारांना साद देऊन आपले गतवैभव मिळविणार का हे बघणे महत्त्वाचे ठरेल. या अधिवेशनाच्या निमित्ताने काही मोठे पक्ष प्रवेश होणार असल्याचीही राजकीय चर्चा आहे.

महाविकास आघाडीचे सरकार आता कुठे स्थिर होत आहे. मात्र, गेल्या महिनाभरात सरकारने अनेक घोषणा केल्या. तसेच महत्त्वाचे अधिकारी विशेषत: भाजपच्या जवळ असणाऱयांच्या बदल्या केल्या. तर काही निर्णयांना स्थगिती दिली आहे. काही निर्णयांचा आढावा घेण्याचे निर्देश दिले आहे. दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ‘मेगा भरती’ ही भाजपची चूक असल्याचे वक्तव्य केले. पक्षाने बाहेरून आलेल्यांना संधी देण्यापेक्षा पक्षाच्या जवळ असणाऱयांना संधी दिली पाहिजे होती, असे बोलून दाखवल्याने भाजपमध्ये इतर पक्षातून आलेल्यांबाबत नकारार्थी संदेश पोहचला आहे. पाटील यांनी मेगा भरतीबाबत केलेल्या वक्तव्यावरून माध्यमात उलट-सुलट बातम्या आल्यानंतर पाटील यांनी घुमजाव करत सारवासारव करताना भाजपमध्ये आलेल्या प्रत्येकाचा पक्षाला फायदा झाल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र, आता भाजप यापुढे जास्तीत जास्त पक्षातील निष्ठावंतांचा विचार करेल हे पाटील यांच्या बोलण्यावरून वाटत आहे.

26 जानेवारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी निवडणुकीपूर्वी जाहीर केलेली शिवभोजन योजना आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी घोषणा केलेल्या नाईट लाईफचा शुभारंभ केला जाणार होता. मात्र, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाईट लाईफ योजना ही 26 जानेवारीपासून सुरू होणार की नाही याबाबत शंका व्यक्त करताना आधी हा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीसमोर मांडण्याचे संकेत दिले आहेत. त्यानंतर गृह विभागाकडून आढावा घेतल्यानंतर ही योजना कार्यान्वित केली जाणार असल्याचे सांगितले. तर अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी राज्यातील सर्व जिल्हय़ात शिवभोजन योजना लागू करण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार ही योजना 26 जानेवारीपासून राज्यात लागू होणार आहे. मात्र, छोटय़ा ठाकरेंच्या नाईट लाईफ योजनेला विरोधकांकडून होत असलेला विरोध लक्षात घेता याबाबत गृहमंत्री म्हणून अनिल देशमुख मंत्रिमंडळासमोर ही योजना आणून मगच त्याबाबत निर्णय घेण्याची शक्यता आहे.

प्रवीण काळे

Related posts: