|Monday, February 17, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » शिव्या देणारी माणसे

शिव्या देणारी माणसे 

आपल्यावर लहानपणी संस्कार झालेले असतात-की शिवी देऊ नये. तोंडात शिवी असणं हे असभ्यपणाचं लक्षण आहे. पण आपण मोठे होत जातो आणि हे संस्कार क्षीण होत जातात. आसपासची माणसं चिडल्यावर अपशब्द उच्चारतात. आसपास भांडताना गुंड आधी शिवीगाळ आणि मग हाणामारी करतात. सतत ऐकून नकळत आपल्यालाही मनात शिव्या खोल रुतून बसतात. प्रसंगी मनाविरुद्ध काही घडलं, आपल्यावर अन्याय झाला की त्या शिव्या आठवतात. येतात. कधी आपण त्या उच्चारतो, कधी पुटपुटतो, कधी गिळून टाकतो.

पुलंनी ‘रावसाहेब’ नावाचं व्यक्तिचित्र लिहिलं आहे. रावसाहेबांच्या बोलण्यात अनेकदा त्यांच्याही नकळत अपशब्द येतात. मात्र त्यांचा हेतू समोरच्याला दुखावण्याचा नसे, रावसाहेब मनाने निर्मळ हाते. पुल म्हणतात, ‘आवेग आवरता येणे हे सभ्यपणाचे लक्षण मानले जाते. रावसाहेबांना तेवढे जमत नव्हते. तरीही रावसाहेब सभ्य होते.’

रावसाहेबांची गोष्टच निराळी. ते एक अपवादात्मक उदाहरण झाले. पण क्रिकेटच्या सामन्यात अनेक खेळाडू परस्परांना उद्देशून असभ्य टोमणेबाजी ऊर्फ स्लेजिंग करतात. राजकीय सभेत बोलताना अनेक पुढाऱयांना टाळय़ा मिळवण्याचा आवेग आवरता येत नाही. मग विरोधी पक्षातल्या एखाद्या नेत्यावर शिवराळ भाषेत कोटी करतात. अमेरिकेचे विद्यमान अध्यक्ष अनेकवेळा भारदस्त बैठकांमध्ये देखील ‘एफ’ने सुरू होणाऱया चार अक्षरी इंग्रजी शिवीचा मुक्तकंठाने वापर करतात. सोशल मीडियावर सामान्य माणसे आणि पगारी ट्रोल्स देखील सतत शिवीगाळ करताना दिसतात. त्यांचे समर्थन केले जाते. लोक आणि अनेक प्रसिद्धी माध्यमे शिवराळ भाषेला दाद देतात तेव्हा सखेद नवल वाटते. शिव्यांविषयी समाजात एवढे आकर्षण का?

विख्यात विज्ञान लेखक डॉक्टर बाळ फोंडके यांनी या विषयावर नुकताच एक लेख लिहिला आहे. त्यात उल्लेखलेल्या ‘स्वेअरिंग इज गुड फॉर यू…’ या पुस्तकातील एक निरीक्षण सांगते की शिव्या देताना पापभीरू माणसाच्या मानसिक वेदनांचा निचरा (कॅथार्सिस) होत असतो. मात्र डॉक्टर फोंडके यांनी बजावले आहे की ‘कधीतरी भावनांचा कल्लोळ झाला असताना प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तोंडातून शिवी बाहेर पडणं वेगळं आणि जाणून बुजून सतत शिव्यांनी आपलं वाक्मय सजवणं वेगळं.’’ एवंच, खूप राग आल्यावर तुम्ही आम्ही तो आवरू नये, पण सतत कोणावर तरी रागावलेले असणे वाईटच हेही विसरू नये.

Related posts: