|Monday, February 17, 2020
You are here: Home » मनोरंजन » औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ

औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला 5 फेब्रुवारीपासून प्रारंभ 

 ऑनलाईन टीम / औरंगाबाद : 

जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाडय़ातील रसिकांपर्यंत पोहोचवणाऱया सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आली आहे. येत्या 5 ते 9 फेब्रुवारीदरम्यान हा महोत्सव आयनॉक्स थिएटर, प्रोझोन मॉल, औरंगाबाद येथे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील कलावंताच्या मांदियाळीत होणार आहे.

महोत्सवाचा उद्घाटन सोहळा बुधवारी 5 फेब्रुवारी 2020 रोजी सायंकाळी सहा वाजता होत असून, प्रसिद्ध हिंदी चित्रपट दिग्दर्शक श्रीराम राघवन, ‘हेल्लारो’ या सुवर्णकमळ विजेत्या राष्ट्रीय चित्रपटाचे दिग्दर्शक अभिषेक शाह, प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक, चिन्मय मांडलेकर, तान्हाजी चित्रपटाचे दिग्दर्शक ओम राऊत, चित्रपट दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, महोत्सवाचे आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, महोत्सवाचे संचालक अशोक राणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. या वेळी पद्मपाणी जीवनगौरव पुरस्काराचे वितरण करण्यात येणार असून त्याची घोषणा पुढील आठवडय़ात एका विशेष पत्रकार परिषदेत करण्यात येईल. उद्घाटन सोहळय़ानंतर यंदाची राष्ट्रीय सुवर्णकमळ विजेती गुजराथी भाषेतील फिल्म ‘हेल्लारो’ ही ओपनिंग फिल्म म्हणून दाखविण्यात येणार आहे.

महोत्सवाचा समारोप सोहळा रविवारी 9 फेब्रुवारी 2020 रोजी सायं. 7 वाजता होईल. याच सोहळय़ात पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे. नाथ ग्रुप, महात्मा गांधी मिशन प्रस्तुत व यशवंतराव चव्हाण प्रति÷ान, मुंबई-विभागीय केंद्र औरंगाबाद यांच्या वतीने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवातील सर्वोत्कृष्ट भारतीय चित्रपटाला एक लाख रुपये रोख रकमेचे गोल्डन कैलासा पारितोषिक देण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट पटकथा, सर्वोत्कृष्ट छायाचित्रण, सर्वोत्कृष्ट संकलन, सर्वोत्कृष्ट ध्वनी संकलन, सर्वोत्कृष्ट कलाकार (स्त्री/पुरुष) या वैयक्तिक पारितोषिकांचादेखील समावेश असणार आहे. ज्युरी समितीचे अध्यक्ष प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक सुनील सुकथनकर हे असणार आहे. तर ज्युरी सदस्य म्हणून प्रेमेंद्र मुजुमदार (कोलकाता), जितेंद्र मिश्रा (दिल्ली), दार गई (युपेन) हे मान्यवर असणार आहेत.

पुरस्कार वितरण सोहळय़ानंतर सातव्या औरंगाबाद आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव समारोपची फिल्म म्हणून ‘पॅरासाईड’ (गिसैनचुंग) (साऊथ कोरिया /2019) ही जगातील नामवंत दिग्दर्शकांपैकी एक दिग्दर्शक बोंग जून हो यांची कोरिएन फिल्म दाखविण्यात येणार आहे.

औरंगाबादचे नाव चित्रपट क्षेत्रात जागतिक व्यासपीठावर नेणाऱया या महोत्सवात मराठवाडय़ातील नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन संयोजन समितीचे अध्यक्ष नंदकिशोर कागलीवाल, औरंगाबाद विभागीय केंद्राचे अध्यक्ष अंकुशराव कदम, सचिन मुळे, सतीश कागलीवाल, महोत्सवाचे डायरेक्टर अशोक राणे, आर्टिस्टीक डायरेक्टर चंद्रकांत कुलकर्णी, अजीत दळवी, महोत्सवाचे संयोजक नीलेश राऊत, क्रियेटिव्ह डायरेक्टर शिव कदम, जयप्रद देसाई, ज्ञानेश झोटींग, आकाश कागलीवाल, डॉ. अपर्णा कक्कड, प्रा. दासू वैद्य, डॉ. आनंद निकाळजे यांनी केले आहे.

Related posts: