|Saturday, February 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » राज्यातील तीन चाकांचं सरकार लवकरच घसरणार!

राज्यातील तीन चाकांचं सरकार लवकरच घसरणार! 

चिपळूण/

सेना-भाजप यांच्या भांडणानंतर राज्यात कधी नव्हे ते तीन पक्षांनी एकत्र येऊन सरकार स्थापन केले आहे. मात्र हे सरकार फार काळ टिकणारे नसून राज्यातील हे तीन चाकांचं सरकार लवकरच घसरणार आहे. शेवटी दोन चाकेच भरधाव जातात, असा टोला केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत राज्यातील महाविकास आघाडी सरकारला हाणला.

कापसाळ यशोधननगर येथे मंगळवारी जागतिक बौध्द धम्माचे प्रचारक तसेच कोकणातील ज्येष्ठ विचारवंत दिवंगत ऍड. दयानंद मोहिते यांच्या स्मारक भूमिपूजन कार्यक्रमानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, सेनेला भाजपने अडीच-अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदाची तयारी कधीही दाखवली नव्हती. मात्र सेनेला जास्त मंत्रीपदे देण्यास भाजप तयार होते. मात्र त्याचा शेवट काडीमोड होण्यात झाला आणि यामुळे कधी नव्हे ते सेना, राष्ट्रवादी व काँग्रेस हे तीन पक्ष एकत्र आले. मात्र हे सरकार फार काळ चालणार नाही.

  मनसेवर टीका करताना ते म्हणाले, केवळ झेंडय़ाचा रंग बदलून चालणार नाही, तर मनसेने आपली मने बदलावीत. झेंडा बदलून राजकीय फायदा त्यांना कधीच होणार नाही. झेंडय़ामुळे सेना-मनसे कधीच एकत्र येणार नसून जर का ते तिकडे एकत्र आले तर आम्ही इकडे आरपीआय-भाजप एकत्र येऊ. तसेच ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळय़ाची उंची न वाढवता तो निधी वाडिया हॉस्पिटलला द्यावा, या मागणीस आपण सहमत नाही, असेही ते म्हणाले.

भारतात अनेक वर्षांपासून आलेल्या नागरिकांना नागरिकत्व मिळावे, यासाठी त्यांच्या अनेक वर्षाच्या मागणीनंतर नागरिकत्व कायदा तयार करण्यात आला आहे. मात्र या बाबत गैरसमज पसरवले जात असून काँग्रेस मुस्लिमांना भडकवत आहे. नागरिकत्व कायदा हा लोकांच्या दृष्टीने हिताचा कायदा आहे. या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी झाल्यानंतर कोणालाही त्याची अडचण निर्माण होणार नाही. त्यातूनही अडचणी निर्माण झाल्यास या अडचणी सोडवण्यासाठी निश्चितच त्यात बदल होऊ शकतो. केंद्र सरकारची कोणालाही अडचणीत आणण्याची भूमिका नाही. त्यामुळेच आपण या कायद्याला पाठिंबा दिल्याचे त्यांनी स्पष्ट पेले.

             ऍड. दयानंद मोहिते स्मारकाचे भूमिपूजन

कापसाळ यशोधननगर येथे मंगळवारी जागतिक बौध्द धम्माचे प्रचारक तसेच कोकणातील ज्येष्ठ विचारवंत दिवंगत ऍड. दयानंद मोहिते यांच्या स्मारकाचे भूमिपूजन केंद्रिय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांच्याहस्ते करण्यात आले. यावेळी आठवले यांनी ऍड. दयानंद मोहिते यांची प्रत्येक व्यक्तीस मदत करण्याची भावना होती आणि त्यांचा आदर्श घेऊन सर्वांनी वाटचाल करावी, असे आवाहन केले.

यावेळी जागतिक किर्तीचे धम्म अभ्यासक विपश्नाचार्य भदंत डॉ. राहुल बोधी, माजी आमदार विनय नातू, प्रा. आर. एल. तांबे, काँग्रेस प्रवक्ते ऍड. राजू वाघमारे, ज्येष्ठ नेते अरविंद वाघमारे, विठोबा पवार, प्रितम रुके, सुभाष मोहिते, मनोहर मोहिते, अब्दुल कपाडिया, सचिन मोहिते, संदीप मोहिते, संदेश मोहिते, के.डी कदम, संदीप पडय़ाळ, रामदास राणे, प्रशांत मोहिते विलास कदम, जयंत जाधव, उत्तम जाधव, प्रवीण कांबळी, राष्ट्रपाल सावंत, मंगेश कदम, उमेश सकपाळ, भूपेंद्र पवार उपस्थित होते.

फोटो मोठा 5 कॉलम घेणे…..

Related posts: