|Saturday, February 29, 2020
You are here: Home » leadingnews » कोल्हापूर : किणी टोलनाक्याजवळ पोलिस आणि गुन्हेगारी टोळीत धुमश्चक्री

कोल्हापूर : किणी टोलनाक्याजवळ पोलिस आणि गुन्हेगारी टोळीत धुमश्चक्री 

प्रतिनिधी / कोल्हापूर

पुणे-बेंगलोर महामार्गावर किणी टोलनाक्याजवळ पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये धुमश्चक्री उडाली. मंगळवारी (दि. २८) रात्री साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली. पोलीस आणि गुन्हेगारी टोळीमध्ये एकमेकांवर झालेल्या बेछूट गोळीबारात एक गुंड जखमी झाला असून त्याला सीपीआरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.  तसेच तिन्ही गुंडांना कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले आहे. 

याबाबत अधिक वृत्त असे की, सराईत गुन्हेगारांची टोळी राजस्थानातील आहे. पोलिसांना चकवा देत ते दोन दिवसांपूर्वी धारवाडला आले होते. आज ते बेळगावहून पुण्याच्या दिशेने निघाले होते. याचा सुगावा बेळगाव पोलिसांना लागला होता. त्यानंतर बेळगाव पोलीस आणि कोल्हापूर पोलिसांनी गुन्हेगारी टोळीचा पाठलाग सुरू केला. किणी टोलनाक्याजवळ पोलिसांनी नाकाबंदी केली होती.

किणी टोलनाक्यावर पोलिसांनी गुन्हेगारांच्या टोळीला अडवण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकानेही गुन्हेगारांवार गोळीबार केल्याने धुमश्चक्री उडाली. यात एक गुंड जखमी झाला. 

घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर अभिनव देशमुख यांच्यासह इचलकरंजीचे अप्पर पोलीस अधीक्षक श्रीनिवास घाटगे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक तानाजी सावंत, पेठवडगाव पोलीस ठाण्याचे प्रदीप काळे यांच्यासह अधिकारी पोहोचले आहेत. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली असून घटनास्थळी लोकांनी मोठी गर्दी केली आहे.

Related posts: