|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » विविधा » अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ कविता संग्रहावर चर्चासत्राचे आयोजन

अजय कांडर लिखित ‘युगानुयुगे तूच’ कविता संग्रहावर चर्चासत्राचे आयोजन 

राजन गवस यांच्यासह विविध मान्यवर साहित्यिकांचा सहभाग

सावंतवाडी / प्रतिनिधी :

     कवी अजय कांडर यांच्या बहुचर्चित ठरलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवरील ‘युगानुयुगे तूच’ या लोकवाड.मय गृह प्रकाशनने प्रकाशित केलेल्या दीर्घ कविता संग्रहावर ज्येष्ठ कादंबरीकार प्रा. डॉ. राजन गवस  यांच्या अध्यक्षतेखाली सावंतवाडी येथे शनिवार 15 फेब्रुवारी रोजी सायं. 5:30 वाजता श्रीराम वाचन मंदिरच्या सभागृहात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे.

      सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्रातर्फे विविध वैचारिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा समग्र मानव जातीच्या कल्याणाची असल्याने आणि तोच विचार ‘युगानुयुगे तूच’ या संग्रहातही मांडला गेल्याने सत्यशोधक मनोहर कदम प्रागतिक संशोधन केंद्रातर्फे सदर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात कादंबरीकार-कवी प्रवीण बांदेकर, समीक्षक प्रा डॉ अनिल फराकटे, लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते काँ संपत देसाई, सत्यशोधक कार्यकर्ते अंकुश कदम आदी मान्यवर ‘युगानुयुगे तूच’वर मांडणी करणार आहेत.तर यावेळी अजय कांडर हे या कवितेच्या निर्मिती प्रक्रियेविषयी बोलणार आहेत. यावेळी योगेश सपकाळ, निलेश जाधव, संतोष पेडणेकर आदी ‘युगानुयुगे तूच’ मधील कवितेचे प्रकट वाचन करणार आहेत.

बाबासाहेब आंबेडकरांच्या समग्र चळवळीत त्यांनी सामाजिक, शैक्षणिक, राजकीय आणि संवैधानिक पातळीवर जो संघर्ष केला त्या संघर्षाच्या केंद्रस्थानी येथील विस्थापित माणूस होता.परंतु डॉ आंबेडकरांची केवळ ‘दलितांचा कैवारी’ ही एकच ओळख पुढे आणली गेली.त्यामुळे जागतिक किर्तीच्या या महामानवाच्या मानवतावादी चळवळीची बीजे येथील सर्व जाती समुदायात सारख्या प्रमाणात रूजू शकली नाही. या पार्श्वभूमीवर कांडर यांची ही दीर्घकविता महत्वाची ठरते.

 ‘युगानुयुगे तूच’ या कवितेत कांडर यांनी आंबेडकरी चळवळीतील सूक्ष्म पैलु उजेडात आणले आहेत. समाजातील जातीयता, गुलामगिरी, अस्पृश्यता, कष्टकरी, शेतकरी वर्गाचे प्रश्न, स्त्रीमुक्तीचा आग्रह, स्वातंत्र्य,समता,बंधुता, न्याय, लोकशाही या मूल्यांच्या संवर्धनासाठी डॉ. आंबेडकरांनी केलेला संघर्ष याची मांडणी या कवितेत कांडर यांनी केली असून या अनुषंगाने या चर्चासत्रात विस्ताराने चर्चा होणार आहे.तरी कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन चर्चासत्राचे संयोजक राजेंद्र कांबळे, महेश पेडणेकर, योगेश सकपाळ, मधुकर मातोंडकर यांनी स्पष्ट केले आहे.

Related posts: