|Sunday, March 29, 2020
You are here: Home » Top News » शिक्षक मागणीसाठी विद्यार्थीच जिल्हा परिषदेच्या दारात

शिक्षक मागणीसाठी विद्यार्थीच जिल्हा परिषदेच्या दारात 

प्रतिनिधी / कोल्हापूर

एका बाजूला जिल्हा परिषदेच्या शाळांमधील पटसंख्या वाढावी यासाठी प्रयत्न सुरू असताना दुसरीकडं शाळेला शिक्षकच नसल्याची परिस्थिती आहे. तब्बल तीन महिने वर्गाला शिक्षकच नसल्यानं आज दऱ्याचे वडगाव (ता.करवीर) प्राथमिक शाळेच्या विद्यार्थ्यानी जिल्हापरिषदेच्या दारातच ठिय्या मारला. शिक्षक आम्हाला मिळालेच पाहिजेत, शिक्षण आमच्या हक्काचं, अशा घोषणा देत अवघ्या चौथीत शिकणाऱ्या या विद्यार्थ्यांनी परिसराच लक्ष वेधल. अधिकाऱ्यांनाच दारात यायला भाग पाडत विद्यार्थी आणि पालकांनी त्यांच्या व्यथा मांडल्या.

दऱ्याचे वडगावमध्ये जिल्हा परिषदेची विद्यामंदिर दऱ्याचे वडगाव ही शाळा आहे. पाहिली ते सातवी पर्यंतच्या या शाळेत 280 हून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. येथील चौथीच्या वर्गाच्या दोन तुकडया आहेत. चौथीच्या एका वर्गावर शिकवणाऱ्या शिक्षकांचे तीन महिन्यापूर्वी पदोन्नतीवर बदली झाली आहे. शिवाय तत्कालीन मुख्याध्यापिका पूजा शेटवे यांनी शाळेच्या सहलीचा निधी तसेच स्क्रॅपमध्ये भ्रष्टाचार केल्याने त्यांची बदली करण्यात आलीय. त्यामुळे सध्या मुख्याध्यापक पदाचा कार्यभारही एका शिक्षकावरच देण्यात आला आहे. परिणामी दोन वर्गांवर गेल्या तीन महिन्यांपासून शिक्षकच नाही. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने पालकांनी याबाबत करवीर गटशिक्षणाधिकारी त्याच बरोबरच वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. मात्र तरीही शिक्षक मिळत नसल्याने विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषदेवर धडक मारली.

अवघ्या चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी शिक्षक मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली त्याचबरोबर पालकांनीही शिक्षक मागणी बरोबरच भ्रष्टाचार करणाऱ्या शेटवे मुख्याध्यापिकांना अधिकारी पाठिशी घालत असल्याबद्दल प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. अखेर प्रशासनाला या आंदोलनाची दखल घ्यावी लागली. मुख्य कार्यकारी अधिकारी माने यांच्या सूचनेनुसार गटशिक्षणाधिकारी एस. के. यादव यांनी या विद्यार्थी आणि पालकांची चर्चा केली. शिक्षक आणि मुख्याध्यापक भरती बरोबरच मुख्याध्यापिका पूजा शेट्ये यांना पाठीशी घालण्यात अधिकार्‍यांवर कारवाईची मागणी पालकांनी केली. शिक्षक हजर झाले नाहीत तर शाळेला बेमुदत टाळे ठोकण्याचा इशारा पालकांनी दिला. या आंदोलनात विद्यार्थ्यांसोबत शाळा व्यवस्थापन समितीचे दत्तात्रय मगदूम, अनिल पाटील, बापू शिंदे, साताप्पा बेनके, दत्तात्रय देवकुळे, दत्तात्रय परीट, आण्णा बोडके, सातप्पा मगदूम आदींनी सहभाग घेतला.

अर्ध्या तासानंतर आली जाग

चौथीत शिकणारी हे विद्यार्थी हक्काचा शिक्षक मिळावा या मागणीसाठी हातात फलक घेऊन जिल्हा परिषदेच्या मुख्य प्रवेशद्वाराबाहेर आले.. मात्र दखल घेतली जात नसल्याने तिथेच त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. विद्यार्थी घसा बसेपर्यंत घोषणाबाजी करत होते मात्र तळमजल्यावर असलेल्या शिक्षण विभागापर्यंत जवळपास अर्धा तास हा आवाज पोहोचला नाही. या विभागातील कर्मचारी, कनिष्ठ अधिकारी आंदोलनाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करताना दिसले. मात्र विद्यार्थ्यांनी केलेल्या घोषणांचा आवाज दुसऱ्या मजल्यापर्यंत पोहचला. या अधिकाऱ्यांना दारात यायला या विद्यार्थ्यांनी भाग पाडलं.

Related posts: