|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » मच्छीमारांना हवा हक्काचा आधार!

मच्छीमारांना हवा हक्काचा आधार! 

महाराष्ट्रातील पहिली मत्स्य दुष्काळ परिषद मालवणला : शासन यंत्रणेवर तीव्र नाराजी

मच्छीमारांची उत्स्फूर्त उपस्थिती अन् संघर्षाचा इशारा

मासेमारी, मच्छीमार्केट बंद ठेवून मच्छीमारांनी दाखविली एकजूट

आमदार वैभव नाईक वगळता इतर लोकप्रतिनिधी अनुपस्थित

परिषदेतील प्रमुख मागण्या तात्काळ मत्स्य दुष्काळ जाहीर करा!

मच्छीमारांना सरसकट कर्जमाफी द्या!

बेकायदेशीर मासेमारी बंद करा!

अंमलबजावणी कक्ष सुरू करा!

मच्छीमारांना मदतीचे पॅकेज जाहीर करा!

मच्छीमारांबाबतचे धोरण निश्चित करा!

प्रतिनिधी / मालवण:

 सिंधुदुर्गात शिवसेना अडचणीत असताना पारंपरिक मच्छीमारांनी सहकार्याचा हात देत शिवसेनेचे आमदार पुन्हा एकदा निवडून आणले होते. त्यामुळे आता मच्छीमारांना शिवसेनेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. आज मच्छीमार पूर्णपणे अडचणीत सापडला आहे. एलईडी, पर्ससीन, हायस्पीड अशा विध्वंसकारी मासेमारीमुळे किनारपट्टीवरील मच्छीमाराच्याच घरातील जेवणातून मासळी गायब झाली आहे. मच्छीमार समाज आज प्रचंड दडपणाखाली आला असून भविष्यात कर्जबाजारी होऊन आत्महत्या करण्याच्याच विचारात पोहोचणार आहे. शासनाने केलेल्या कायद्यांची अंमलबजावणी प्रामाणिकपणे होत नसल्याने बेकायदेशीर मासेमारी अधिक जोमाने सुरू आहे. त्यामुळे सिंधुदुर्गच्या दौऱयावर येणाऱया मुख्यमंत्र्यांकडून मच्छीमारांना हक्काच्या आधाराची आवश्यकता असल्याचे सुतोवाच पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या दांडी येथील मत्स्य दुष्काळ परिषदेत करण्यात आले.

यावेळी रमेश धुरी, नगराध्यक्ष महेश कांदळगावकर, भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, उपाध्यक्ष बाबा मोंडकर, रेणुका कड, आनंद हुले, विकी चोपडेकर, दाजी सावजी, जिल्हा व्यापारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष नितीन तायशेटे, व्यापारी पतसंस्थेचे चेअरमन नितीन वाळके, तालुकाध्यक्ष प्रमोद ओरसकर, संजय बांदेकर, आकांक्षा कांदळगावकर, तेजस्विनी कोळंबकर, मनिषा जाधव, मत्स्य व्यवसाय विभागाच्या अधिकारी करंगुटकर तसेच अन्य पदाधिकारी व मच्छीमार प्रतिनिधी उपस्थित होते. सूत्रसंचालन महेंद्र पराडकर यांनी केले.

..तर मी आत्मदहन करेन – रमेश धुरी

मत्स्य दुष्काळ परिषदेच्या अध्यक्षस्थानी असलेले रमेश धुरी म्हणाले, आपण येत्या 14 जून रोजी 77 व्या वर्षात पदार्पण करीत आहे. आजपर्यंत मी मच्छीमार समाजासाठीच आयुष्य व्यथित केले आहे. ज्येष्ठ मच्छीमार नेते ज्ञानेश देऊलकर यांनी दिलेल्या मार्गावरून जात असताना आता मच्छीमारांच्या लढय़ाला प्रबळ बळ येण्यासाठी आणि शासनाला जागे करण्यासाठी माझ्या वाढदिवसादिवशीच आत्मदहन करून मच्छीमारांच्या व्यथा शासनाला कळविण्याचा प्रयत्न करेन. धुरी यांनी दिलेल्या या इशाऱयावर मच्छीमारांनी आक्रमकपणे प्रतिक्रिया नोंदविली. धुरी यांच्या बोलण्यातून मच्छीमारांच्या वेदना या परिषदेच्या निमित्ताने बाहेर आल्या.

झेंडे उतरवा खांद्यावरून – आकांक्षा कांदळगावकर

आक्रमक महिला मच्छीमार नेत्या आकांक्षा कांदळगावकर म्हणाल्या, मच्छीमारांनी इतर पक्षांचे झेंडे खांद्यावर घेऊन त्या नेत्यांना मिरविण्यापेक्षा आपल्या समाजाचा झेंडा आणि नेता निवडण्याची वेळ आली आहे. मच्छीमारांच्या आंदोलनाला पाठून पाठिंबा देण्यापेक्षा पुढे राहून आंदोलनाचे नेतृत्व करणाऱया नेत्यांची आवश्यकता आहे. शेतकऱयांना सरसकट कर्जमाफी दिली जाते. मग मच्छीमारांना ती देताना शासनाचे हात का आखडतात? असा सवाल त्यांनी केला.

तुमचा प्रतिनिधी म्हणून लढेन – वैभव नाईक

बेकायदेशीर मासेमारीच्या विरोधात लढा देण्यासाठी आपण मच्छीमारांचा प्रतिनिधी म्हणून लढू, अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी यावेळी दिली. मच्छीमार दुष्काळ परिषदेतून उपस्थित झालेले प्रश्न आणि त्यावर आवश्यक असणारी उपाययोजना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत पोहचविण्यात येईल, असे आश्वासन नाईक यांनी दिले. अशा परिषदांतून त्या-त्या समस्यांची गंभीर परिस्थिती समोर येत असते. त्यामुळे अशा परिषद होणे आवश्यक आहे. शासनाचे मत्स्य धोरण निश्चित होताना मच्छीमार म्हणजे नमके कोण? हे ठरविले गेले पाहिजे. पारंपरिक मच्छीमार शासनाकडून फायदा मिळत असताना बाहेर फेकला जातो आणि इतर त्याचा फायदा घेतात, असेही नाईक यांनी सांगितले.

मासेमारी बंद, मच्छीमार्केटही बंद

मत्स्य दुष्काळ परिषदेनिमित्त मालवणातील मासेमारी पूर्णपणे बंद ठेवण्यात आली होती. तसेच मच्छीमार्केटही बंद होते. मच्छीमारांची उत्स्फूर्त गर्दी या परिषदेला होती. मच्छीमार प्रतिनिधींनी पोटतिडकीने मत्स्य दुष्काळाबाबत भावना व्यक्त केल्या. यात शिवसेना आणि भाजप नेत्यांनाही मच्छीमारांच्या रोषाला सामोरे जावे लागले. शेतकऱयांप्रमाणे कर्जमाफी आणि दुष्काळ पॅकेजची मागणी सरकारकडे करण्यात आली.

Related posts: