|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आंतरराष्ट्रीय » चीनमध्ये कोरोनाचे 1016 बळी

चीनमध्ये कोरोनाचे 1016 बळी 

42 हजारांहून अधिक जणांना विषाणूचा संसर्ग : लस तयार करण्याचे प्रयत्न झाले गतिमान

वृत्तसंस्था/  बीजिंग 

कोरोना विषाणूच्या संकटापासून चीनला मुक्ती मिळण्याची चिन्हे अद्याप दिसून येत नाहीत. चीनमध्ये आतापर्यंत कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे 1016 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 42634 जणांना या विषाणूचा संसर्ग झाल्याचे सांगण्यात येत आहे. चीनसह अन्य देशांमध्येही कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱयांची संख्या वाढू लागली आहे. हाँगकाँग आणि फिलिपाईन्समध्ये आतापर्यंत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे.

जागतिक आरोग्य संघटनेनुसार अन्य 24 देशांमध्ये 319 रुग्ण आढळून आले आहेत. तर चीनमध्ये कोरोना विषाणूमुळे सोमवारी 100 जण मृत्युमुखी पडले आहेत. अध्यक्ष क्षी जिनपिंग यांनी बीजिंगमध्ये लोकांना संबोधित करताना या विषाणूच्या संसर्गाबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे. अशाप्रकारच्या विषाणूमुळे देशाच्या जनतेचे नुकसान होण्याची दुसरी वेळ आहे. लोकांचे जीव जात असून आजार वाढत चालला आहे. कोरोना संकटाने आता उग्र रुप धारण केले असून प्रतिदिन शेकडो जणांना याचा संसर्ग होत असल्याचे जिनपिंग यांनी म्हटले आहे.

जिनपिंग यांनी एका रुग्णालयाला भेट दिली आहे. रुग्ण तसेच डॉक्टरांशी संवाद साधत जिनपिंग यांनी देशवासीयांना धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठीचे प्रयत्न गतिमान करण्यात आले आहेत, असे जिनपिंग म्हणाले. तर चीनचे प्रीमियर ली केकियांग हे कोरोनाचा संसर्ग रोखण्याच्या राष्ट्रीय मोहिमेची देखरेख करणाऱया उच्चस्तरीय समुहाचे नेतृत्व करत आहेत. कोरोना संकटाने मागील काही आठवडय़ांमध्ये चिनी अर्थव्यवस्थेला प्रचंड नुकसान पोहोचविले आहे.

चीनचा मध्यवर्ती प्रांत हुबेईला कोरोनाचा सर्वाधिक फटका बसला आहे. 10 फेब्रुवारी रोजी कोरोनाचे 2097 नवे रुग्ण हुबेईत समोर आले आहेत. प्रांतातील एकूण रुग्णांची संख्या 31728 वर पोहोचली आहे. तर बळींचा आकडा 974 झाला आहे. कोरोना विषाणूमुळे वुहान आणि हुबेई प्रांतातील लोकांना घरातून बाहेर पडणे अशक्य झाले आहे.

जगभरातील 168 प्रयोगशाळांमध्ये कोरोनावर लस तयार करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने कॅमरून, कोटे डी आयवर, डीआरसी, इजिप्त, इथियोपिया, गॅबॉन, घाना, इराण, केनिया, मोरक्को, नायजेरिया, टय़ुनिशिया, युगांडा आणि झाम्बियाला उपकरणे पाठविली आहेत.

Related posts: