|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » मिरजेत आज शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे एकाच व्यासपीठावर

मिरजेत आज शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे एकाच व्यासपीठावर 

प्रतिनिधी/मिरज

भाजपाचे कडवे आव्हान, पक्षांतर्गत सुरू असलेली धुसफुस आणि काँग्रेसचा रुसवा-फुगवा अशा अनेक आव्हानांवर मात करीत राज्यात महाविकास आघाडीचे शासन प्रस्थापित करण्यात सिंहाचा वाटा उचलणारे राष्ट्रवादीचे नेते शरद पवार या यशानंतर प्रथमच सांगली जिह्यात दाखल होत आहेत. निमित्त शहरातील गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्य महोत्सवी सांगता समारंभाचे. त्यानिमित्ताने गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात स्वागताची भव्य तयारी करण्यात आली आहे.

शरद पवार यांच्या समवेत माजी केंदीयमंत्री, काँग्रेसचे मात्तब्बर नेते मल्लिकार्जून खर्गे समारंभाचे अध्यक्ष आहेत. याशिवाय राज्यातील बहुतांशी मंत्री आणि मान्यवर समारंभासाठी हजेरी लावणार आहेत. यामध्ये माजी राज्यपाल, खासदार श्रीनिवास पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जलसंपदामंत्री जयंत पाटील, माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण, सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख, गृहराज्यमंत्री (शहर) सतेज पाटील, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभुराज देसाई, सहकार व कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम, आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिकचे कुलगुरू डॉ. दिपक म्हैसेकर, आमदार विक्रम सावंत, आमदार सुमनताई पाटील, माजी खासदार प्रकाश हुक्केरी, माजी आमदार काकासाहेब पाटील, वीरकुमार पाटील, प्रा. शरद पाटील, जयश्रीताई पाटील, विशाल पाटील आणि संजय बजाज यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

शहरातील गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात सकाळी 11 वाजता होणाऱया या कार्यक्रमात स्व. डॉ. पतंगराव कदम खुले सभागृह आणि स्व. संयोगिता पाटील केंब्रिज स्कुल असा नामकरण सोहळा मान्यवरांच्या हस्ते संपन्न होणार आहे. याचवेळी सिम्बायोसिस विद्यापीठ, पुणेचे कुलपती डॉ. शां. ब. मुजुमदार आणि नामवंत हृदयरोगतज्ञ डॉ. एस. व्ही. सोरटूर यांचा स्व. गुलाबराव पाटील पुरस्काराने सन्मान केला जाणार आहे.

याशिवाय गुलाबराव पाटील शैक्षणिक संकुलात शिक्षण घेऊन संस्थेबरोबर जिह्याचा देशात नावलौकीक केलेल्या डॉ. संताजी पाटील, तनुजा बंडगर, यश अग्रवाल, शुभांगी कांबळे या गुणवंत माजी विद्यार्थ्यांचाही गौरव यावेळी केला जाणार आहे. संकुलातील आदर्श कार्य करणारे शिक्षक बी. एन. पाटील आणि शिक्षकेत्तर कर्मचारी स्नेहा जोशी यांचाही सत्कार केला जाणार आहे.

शहरात प्रथमच कार्यक्रमाच्या निमित्ताने काँग्रेस-राष्ट्रवादीचे दिग्गज नेते एकाच व्यासपीठावर हजेरी लावणार आहेत. त्यानिमित्ताने शैक्षणिक संकुल प्रांगणात भव्य सभामंडप उभारला आहे. शरद पवार आणि मल्लिकार्जून खर्गे हे दोन दिग्गज नेते प्रथमच शहरात एकत्र येत असल्याने शहर आणि ग्रामीण भागातून काँग्रेस-राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठय़ा संख्येने समारंभाला हजेरी लावण्याची शक्यता आहे. मेमोरियल ट्रस्टचे संस्थापक चेअरमन पृथ्वीराज पाटील कार्यक्रमाचे संयोजन करीत आहेत.

शरद पवार यांचा जिल्हा दौरा

बारामतीहून हेलिकॉप्टरने कवलापूर विमानतळावर आगमन, सकाळी 11.30, मिरज येथे गुलाबराव पाटील मेमोरियल ट्रस्टच्या रौप्यमहोत्सवी सांगता समारंभाला उपस्थिती, सकाळी 11. 30 ते दुपारी 1, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या राष्ट्रवादी पक्षप्रवेश कार्यक्रमाला उपस्थिती, स्थळ भोकरे कॉलेज, वेळ दुपारी दोन, कोल्हापूर येथे एस. टी. कामगार संघटनेच्या कार्यक्रमाला रवाना सायंकाळी पाच वाजता.

Related posts: