|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » हमाल संचालकाचा बाजार समितीत धिंगाणा

हमाल संचालकाचा बाजार समितीत धिंगाणा 

प्रतिनिधी/सांगली

हमाल संचालक बाळासाहेब बंडगर यांनी बुधवारी मध्यरात्री बाजार समितीमध्ये किरकोळ कारणावरून धिंगाणा घालून कर्मचाऱयाला शिवीगाळ करीत मारहाण केली. याप्रकरणी संबधित कर्मचाऱयाने बाजार समितीकडे लेखी तक्रार दिली मात्र याची माहिती बाहेर का दिली याचा जाब विचारत संचालकाने सचिवांनाही दमदाटी केली. संचालकाच्या या वागणुकीचा बाजार समिती कर्मचाऱयांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

बंडगर हे चिंचणी मायाक्कादेवी यात्रेला गेले होते ते बुधवारी रात्री पावणेदोनच्या सुमारास बाजार समितीसमोर आले. यावेळी त्यांनी रात्रपाळीच्या डुयटीवर असलेल्या कर्मचाऱयांना हाक मारून गेट उघडण्यास सांगितले. शिपाई सुर्यकांत कदम हे थोडया वेळाने आले त्यांनी गेट उघडले मात्र इतका उशिर हाका मारून झाले लवकर गेट का उघडले नाही, असा सवाल करीत त्यांच्या अंगावर धावून गेले. साहेब मी मद्यपान करीत नाही माझी मेडीकल टेस्ट करा, मात्र शिवीगाळ करू नका असे कर्मचारी म्हणत असतानाच धुंदीत असलेल्या हमाल संचालकांने कर्मचारी कदम यांना थोबाडीत लगावली.

सुमारे तासभर हा धिंगाणा बाजार समितीत सुरू होता. घडल्या प्रकाराबाबत कर्मचारी कदम यांनी बुधवारी दुपारी बाजार समितीकडे लेखी तक्रार करीत या प्रकरणाची चौकशी करून न्याय देण्याची मागणी सचिवांकडे केली. संबधित कर्मचाऱयाने आलेल्या विरोधात तकार केल्याचे समजताच दुपारी चारच्या सुमारास बंडगर यांनी पुन्हा बाजार समितीमध्ये येवून सचिव आर ए पाटील यांना दमबाजी करण्यास सुरूवात केली. माझ्या विरोधातील तक्रार अर्जाची माहिती बाहेर का दिली असे म्हणत त्यांना जाब विचारण्यास सुरूवात केली.

बाजारसमितीमध्ये तुम्ही काय करता, तुमच्या सर्व भानगडी बाहेर काढतो असे ते सचिवांना म्हणाले, मी कोणालाही माहिती देण्यास बोलाविले नाही, असे स्पष्टीकरण सचिव पाटील यांनी केले मात्र संतप्त झालेल्या बंडगरांनी त्यांचे न  ऐकून न घेता त्यांनाच दमबाजी सुरू केली, यामुळे सचिवही संतप्त झाले, मी कोणाच्याही मिंद्यात नाही, तुम्हाला काय करायचे ते करा, फारतर माझा राजीनामा देतो असे म्हणत त्यांनीही आवाज वाढविला. यामुळे बाजार समितीत दोघांमध्ये मोठा वाद झाला.

दरम्यान हमाल संचालकाकडून अशाप्रकारे वारंवार उध्दट भाषा केली जाते, रात्रीच्यावेळी येवून कर्मचाऱयांना मारहण करणे, त्यांना अर्वाच्या भाषेत बोलण्याचा संबधच काय, असा सवाल कर्मचाऱयांतून केला जात असून या हमाल संचालकाची  आरेरावी थांबवा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा कर्मचाऱयांनी दिला आहे.

हमाल संचालकांनी शिवीगाळ केली : कदम

शिपाई कर्मचारी सुर्यकांत कदम म्हणाले आपण कधीही दारू पित नाही, रात्री पावणेदोनच्या सुमारास हमाल संचालक बाजार समितीसमोर चारचाकीतून आले, त्यांनी हाका मारल्यानंतर आपण गेट उघडले, मात्र त्यांनी तु मद्यपान केलेस असे म्हणत शिवीगाळ करीत मारहाण केली आहे याबाबतची चौकशी करून न्याय देण्याचा लेखी अर्ज बाजारसमितीकडे दिला आहे.

कर्मचारी मद्यपान करीत डुयटीवर होते : बंडगर

हमाल संचालक बाळासाहेब बंडगर म्हणाले, रात्री दीड-ते दोनच्या सुमारास आम्ही यात्रेहुन बाजार समितीसमोर आलो त्यावेळी शिपाई कदम व शिरोळे हे दोघे मद्यपान केलेले होते, त्यांची मेडीकल करण्याची मी मागणी केली. कर्मचारी उध्दट बोलले म्हणून आपला संयम सुटला.

Related posts: