|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » गणपतीपुळेला मिळणार ‘क्लिन स्ट्रीट फुड हब’चा दर्जा!

गणपतीपुळेला मिळणार ‘क्लिन स्ट्रीट फुड हब’चा दर्जा! 

प्रतिनिधी/ रत्नागिरी

गुजरातमधील कांकरिया लेक देशातील पहिले ’क्लिन स्ट्रीट फुड हब’ घोषित झाल्यानंतर आता कोकणातील श्री क्षेत्र गणपतीपुळे पर्यटनस्थळाला हा बहुमान मिळाला आहे. अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त सय्यद इम्रान हाश्मी यांनी बुधवारी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली. यापुर्वी मुंबईतील गिरगाव चौपाटी आणि जुहू चौपाटी यांची यांना यापुर्वी असा दर्जा मिळाला आहे.

  रत्नागिरीतील श्री क्षेत्र गणपतीपुळे तीर्थक्षेत्र नेहमीच पर्यटकांनी गजबजलेले असते. हे स्थळ आंतरराष्ट्रीय नकाशावर आले असल्याने देशासह परदेशातून भाविक, पर्यटकांची मोठी रेलचेल असते. अशा या स्थळी अन्नपदार्थांचा दर्जा राखून ग्राहकांना स्वच्छ वातावरणात चांगल्या प्रतीचे सुरक्षित आणि पौष्टीक अन्नपदार्थांचा आस्वाद घेता यावा, यासाठी अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून अनेक उपाययोजना राबवल्या जात आहेत. त्यापैकी एक योजना म्हणजे अन्न सुरक्षा आणि मानके प्राधिकरणाकडून देशांतर्गत ज्या ठिकाणी मोठय़ा संख्येने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते, अशा ठिकाणी ‘क्लिन स्ट्रीट फुड हब’ ही संकल्पना राबवली जात आहे. त्यामध्ये श्री क्षेत्र गणपतीपुळेची निवड झाली आहे. त्या ठिकाणच्या फेरीवाल्यांच्या केलेल्या तपासणीत त्यांच्याकडील अन्न दर्जेदार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

  अजूनही त्या ठिकाणी काही सुधारणा आवश्यक असून त्याचे नियोजन करण्यात येणार आहे. त्यासाठी मॅरीको प्रा. लि. मार्फत यांना मदत केली जाणार आहे. या हबमधील फेरीवाल्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी एका व्यक्तीची नियुक्ती करण्यात येणार आहे. मात्र ’क्लिन स्ट्रीट फुड हब’मुळे गणपतीपुळेत येणाऱया पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्यास मदत होणार आहे. कोकणातील पहिले ’क्लिन स्ट्रीट फुड हब’ गणपतीपुळे येथे होण्यासाठी येत्या 2 महिन्यात अंमलबजावणी सुरु होणार आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्टॉलधारकांना प्रशिक्षण दिल्यानंतर प्रत्यक्षात त्याची अंमलबजावणी होणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्यावतीने सय्यद इम्रान हाश्मी यांनी सांगितले. भारतीय अन्न सुरक्षा प्राधिकरणामार्फत हा प्रकल्प राबवण्यात येणार आहे.

Related posts: