|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » हॉटेल मराठा पॅलेस दरोडा प्रकरणी एकास अटक

हॉटेल मराठा पॅलेस दरोडा प्रकरणी एकास अटक 

गुन्हे प्रकरटीकरण शाखेच्या पथकाची कारवाई

प्रतिनिधी/ सातारा

गोडोली (सातारा) येथील हॉटेल मराठा पॅलेसवर सशस्त्र दरोडा टाकून 80 हजार रुपयांची रोकड चोरी केल्याप्रकरणी एकास शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने अटक केली. तर संशयिताकडून मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघडकीस आला आहे. करण धनाजी वाघमोडे (वय 20, रा. निमसोड, ता. खटाव, जि. सातारा) असे अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. तर संतोष अशोक उपाध्याय/गुरव (वय 21, रा. विभुते बंगला, जगदाळे बागेशेजारी, गोळीबार मैदान सातारा. मूळ रा. हाल दहिवडी, ता. सांगोला, जि. सोलापूर), मल्लाप्पा चंदाप्पा कांबळे (वय 23, अंबिरा मेंटस, कुपर कंपनी समोर नविन एमआयडीसी सातारा. मूळ रा. सिंदगी, ता. गोगी, जि. यातगिरी, कर्नाटक) व अमन (पूर्ण नाव, पत्ता माहित नाही) असे तीन संशयित मिळून आले नसून ते पसार आहेत.

  याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, गोडोली येथील हॉटेल मराठा पॅलेसवर दि. 3 रोजी पहाटे 3.30 वाजण्याच्या सुमारास 4 अनोळखी इसमांनी हातात तलवार, सुरा, गज, लाकडी दांडके घेवुन हॉटेलचा पाठीमागील दरवाजा उघडुन आत प्रवेश करुन तेथील कर्मचाऱयास तुझ्या मालकाला खूप मस्ती आली आहे,  अशी दमदाटी करुन गजाने काऊंटर उघडुन त्यामधील 80 हजार रुपयांची रोख रक्कम घेवून दोन मोटरसायकलवरुन चौघे पसार झाले होते. याप्रकरणी महेश अंकुश मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  याप्रकरणी सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अण्णासाहेब मांजरे यांनी गुह्यातील आरोपींना अटक करुन तत्काळ गुह्याचा छडा लावण्याबाबत गुन्हे प्रकटीकरण शाखेला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम व त्यांचे पथकातील कर्मचाऱयांनी आरोपीचा सातारा शहर परिसरात शोध घेतला असता मिळालेल्या गोपनिय माहितीच्या आधारे हॉटेल नेशन 11 येथे काम करित असलेल्या एका संशयित इसमास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने  सुरवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यास विश्वासात घेवुन अधिक विचारपूस केली असता त्याने त्याचे इतर 3 साथीदारांचे सहाय्याने हॉटेल मराठा पॅलेसवर दरोडा टाकल्याची कबुली दिली. त्याचे 3 साथीदार सातारा शहर परिसरात मिळुन आले नाहीत. करण वाघमोडे यास पोलिसांनी दि. 6 रोजी अटक केली असून त्यास न्यायालयात हजर केले असता दि. 12 रोजी पर्यंत पोलीस कोठडी मिळालेली आहे.

  दरम्यान, संशयित आरोपी करण वाघमोडे याच्याकडून 5 हजार रुपये रोख रक्कम व गुह्यात वापरलेली मोटरसायकल केटीएम डय़ुक जप्त असा एकुण 75 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. मोटरसायकल बाबत माहिती घेतली असता ती चोरीची असल्याचे निष्पन्न झाले आहे. हि मोटरसायकल संशयिताने त्याचे मित्राचे सहाय्याने गोडोली परिसरातून चोरी केल्याची सांगितले. याप्रकरणी मोटरसायकलचा गुन्हा उघडकीस आला आहे.

या कारवाईत पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील, सहाय्यक पोलीस अधीक्षक समीर शेख तसेच सातारा शहर पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांचे मार्गदर्शनाखाली सातारा शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस उपनिरीक्षक एन. एस. कदम, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक डी. वाय. कदम, पोलीस नाईक शिवाजी भिसे, पोलीस कॉन्स्टेबल धीरज कुंभार, अभय साबळे, गणेश घाडगे, गणेश भोंग, संतोष कचरे, विशाल धुमाळ यांनी सहभाग घेतला.

Related posts: