|Sunday, March 29, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » जाळिती क्रोधाचा भुईनळा

जाळिती क्रोधाचा भुईनळा 

कृष्णाच्या वऱहाडाच्या या मिरवणुकीत त्याचे सोयरे भक्त, योगी, ज्ञानी व अनुभवी होते. त्यांना त्यांच्या योग्यतेप्रमाणे वाहने कृष्णाने दिली होती. काही भक्तांना सलोकतेचे घोडे दिले होते तर काहींना समीपतेचे रथ दिले होते. काहीना स्वरुपतेचे हत्ती दिले होते. साक्षात्कारी महात्म्यांना सायुज्याचा चवरीढोल दिला होता. त्यांचा सखोल अनुभव व निजात्मबोध जाणत असल्याने श्रीहरी त्यांना क्षणभरही आपल्यापासून दूर सारत नाही.

अग्नि लावूनि ठायीं ठायीं । ममता जाळिती हवायी। गगना उसळली पाही । धुपोनि ठायीं निमाली। मोहयंत्री सुमनमाळा । अग्निपुष्पे भासती डोळां । फुलें म्हणती अबला । पाहतां डोळां ते राख। अतिलोभाच्या चिचुंदरी । अग्नि लावूनि टाकिती दूरी। पेटल्या पडती जनांवरी । उरिं शिरिं जाळिती। देऊनि उपशम-अनळा। जाळिती क्रोधाचा भुईनळा। भडभडां निघती ज्वाळा । तोही निमाला तात्काळ। हातीं धरूनि कृष्णलीला । जाळिती कामाचा हातनळा।  धरूं नेणती त्या अबळा । जीवीं जिव्हाळा पोळत । पाहता अत्यंत कठीण । चिन्मात्र अग्नि देऊनि जाण। सांडिती अहंकाराचे बाण । पळे जीवपण दचकोनी । मदमत्सरधूम्रमेळें । एकाचें झांकले जी डोळे । देहबुद्धीचीं भेडें सकळें । विषयबळें पळालीं ।  स्वानुभवाचे महाथोर । उठावले जी कुंजर। रगडूनि अहंकाराचा दूर । निरंतर डुल्लती । सवेंचि निजतेजचंद्रज्योति । उजळली जी अवचित्तीं । प्रकटली परम दीप्ती । तेही स्थिती परियेसा । नि:शेष अंधार नाहीं जेथ । उष्णचांदणीयाहूनि अतीत ।  तेज प्रकटलें अद्‌भुत । संतोषत श्रीकृष्ण ।

मिरवणुकीपुढे शोभेचे दारुकाम चालले होते. ठिकठिकाणी अग्नी प्रज्वलित करून ममता जाळून अग्नीबाण आकाशात उडत होते व विझून खाली पडत होते. मोहरुपी यंत्रातून आगीची फुले उडत होती. तिथे जमलेल्या स्त्रिया त्या सुमनमाळा पहायला धावत तोवर त्या फुलांची राख होत होती. अतिलोभरूपी चिचुंदऱया पेटवून दूर फेकून देत. त्या अंगावर पडू नयेत म्हणून लोक दूर सरकत. नाहीतर त्या अंगावर डोक्मयावर पडून भाजीत. उपशमाचा अग्नी देऊन क्रोधाचा भुईनळा जाळीत. तो भडकून शांत होई. कृष्णलीला हातात धरून कामाचा हातनळा जाळीत. पहायला असे अत्यंत कठीण असे चिन्मात्र अग्नी देऊन अहंकाराचे बाण पेटवीत. जे दूर जाऊन विझून पडत. त्याने दचकून जीवपण दूर पळून जाई. मद मत्सररूपी धुराने एकाचे डोळे झाकले गेले होते. ते ज्ञानाच्या या प्रकाशात उघडले आणि देहबुद्धी दूर पळाली. स्वानुभवाचे थोर हत्ती उठले. त्यांनी अहंकार रगडून टाकला आणि ते आनंदाने डोलू लागले. त्याचवेळी अचानक निजतेजाची चंद्रज्योत प्रकाशली. सर्वत्र दिव्य, लख्ख प्रकाश पसरला. जिथे अंधकार नावालाही शिल्लक नाही, उष्ण चांदण्याच्या प्रकाशाच्याही जो पलीकडचा आहे, ते दैवी तेज प्रकट झाले. त्याने सारा आसमंत उजळून टाकला. कृष्णाला अत्यंत आनंद झाला.

Related posts: