|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » क्रिडा » मुंबईचे सामन्यावर वर्चस्व, मध्य प्रदेशची घसरगुंडी

मुंबईचे सामन्यावर वर्चस्व, मध्य प्रदेशची घसरगुंडी 

वृत्तसंस्था / मुंबई  :

वानखेडे स्टेडियमवर मध्य प्रदेशविरुद्ध रणजी चषक सामन्यात यजमान मुंबईने सामन्यावर वर्चस्व प्रस्थापित केले आहे. मुंबईने पहिल्या डावात 427 धावा केल्यानंतर मध्य प्रदेशची 7 बाद 200 अशी घसरगुंडी उडाली आहे. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा मध्य प्रदेश संघ 227 धावांनी पिछाडीवर होता. दिवसअखेरीस व्यंकटेश अय्यर 87 धावांवर खेळत होते.

प्रारंभी, 4 बाद 352 धावसंख्येवरुन मुंबईने दुसऱया दिवशीच्या खेळाला सुरुवात केली. सर्फराज मैदानात असल्याने मुंबई संघ पाचशेचा टप्पा गाठेल अशी आशा होती. पण, दीडशतकवीर सर्फराज खानला रवी यादवने 177 धावांवर बाद करत मुंबईला जोरदार धक्का दिला. सर्फराज बाद झाल्यानंतर इतर मुंबईकर फलंदाजांनी सपशेल निराशा केली. कर्णधार आदित्य तरेने 38 चेंडूत 4 चौकारासह 32 धावा केल्यामुळे मुंबईला चारशेचा टप्पा गाटता आला. शाम्स मुलाणीने 18 धावांचे योगदान दिले. मुंबईचा पहिला डाव 108.3 षटकांत 427 धावांवर संपुष्टात आला. मध्य प्रदेशकडून गौरव यादवने 101 धावांत 4, कुलदीप यादवने 88 धावांत 3, शुभम शर्माने 2 तर रवी यादवने 1 गडी बाद केला.

मध्य प्रदेशची खराब सुरुवात

मुंबईच्या धावसंख्येचा पाठलाग करताना मध्य प्रदेशच्या डावाची सुरुवात खराब झाली. सलामीवीर रमीज खानला (4) दीपक शेट्टीने बाद करत मध्य प्रदेशला पहिला धक्का दिला. यानंतर, अजय रोहेरा (19) व आनंद बैस (12), यश दुबे (25), आदित्य श्रीवास्तव (12) या मधल्या फळीतील फलंदाजांनी सपशेल निराशा केल्याने मध्य प्रदेशची 20 षटकांत 5 बाद 72 अशी बिकट स्थिती झाली होती. पण, कर्णधार शुभमान शर्मा व व्यकंटेश अय्यर या जोडीने सहाव्या गडय़ासाठी 62 धावांची भागीदारी करत संघाचा डाव सावरला.

शर्मा-अय्यर ही जोडी मैदानात स्थिरावलेली असताना शर्माला 18 धावांवर अंकुश जैस्वालने बाद करत ही जोडी फोडली. अय्यरने मात्र एका बाजुने किल्ला लढवताना संघाचा धावफलक हलता ठेवला.

त्याला मिहीर हिरवानीने 3 चौकारासह 21 धावा करत चांगली साथ दिली. या जोडीने सातव्या विकेटसाठी 65 धावांची भागीदारी केली. एका खराब फटक्यावर हिरवानीन 21 धावांवर तंबूत परतला. यानंतर, अय्यरने दिवसअखेरीस आणखी पडझड होऊ दिली नाही. दुसऱया दिवसाचा खेळ थांबला तेव्हा व्यंकटेश अय्यर 105 चेंडूत 11 चौकार व 2 षटकारासह 87 धावांवर खेळत होता. दिवसअखेरीस मध्य प्रदेशने 58 षटकांत 7 बाद 200 धावापर्यंत मजल मारली होती.

Related posts: