|Wednesday, February 19, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » बाल कायद्यातील कलम 32 चे काटेकोर पालन करा

बाल कायद्यातील कलम 32 चे काटेकोर पालन करा 

प्रतिनिधी / पणजी :

कुठल्याही परिस्थितीत पीडित अल्पवयीन मुलांचे नाव उघड होता कामा नये तसेच सुनावणीवेळी आणि निवाडय़ातही पीडित अल्पवयीन मुलांच्या नावाची टिपणी करण्यास मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाने बाल न्यायालयाला मज्जाव केला आहे. गोवा बाल कायद्यातील कलम 32 चे (खासगी आणि गोपनियता हक्क) काटेकोरपणे पालन करण्याची सूचना केली आहे.

मालकाच्या मुलाचे अपहरण करून दोघा कर्मचाऱयांनी 20 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. याप्रकरणी बाल न्यायालयाने दवर्ली येथील विक्टर उर्फ दुलशीदानियो फर्नांडिस व मोती डोंगर मडगाव येथील उदय उर्फ रुपेश फाळकर या दोघांना दोषी ठरवून प्रत्येकी 1 लाख रुपये दंड व जन्मठेपेची शिक्षा ठोठावली होती. या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठात आव्हान दिले होते. खंडपीठाने ते फेटाळले व या दोघांची जन्मठेपेची शिक्षा कायम केली.

30 जानेवारी 2017 रोजी बाल न्यायालयाने निवाडा देताना सदर अल्पवयीन पीडित मुलाचे नाव निवाडय़ात उघड केले होते. 19 सप्टेंबर 2011 रोजी दुपारी 1.15 वाजता रमेश गावकर नामक जीए 08 यु 4245 या क्रमांकाच्या विंगर गाडीने सदर अल्पावयीन मुलाला घेण्यासाठी शाळेत गेला होता. मुलाला त्याने गाडीत बसविले. तेवढय़ात संशयित आरोपी उदय उर्फ रुपेश फाळकर त्याच्याकडे आला व आपली ओमनी मारुती सुरु होत नाही असे सांगून ती ढकलण्यास बोलावले. सदर संशयित आरोपी त्या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या कंपनीत कामाला होता. त्यामुळे विंगर चालक रमेश गावकर सदर व्हॅन ढकलण्यासाठी गेला, पण सदर मारुती व्हॅन सुरू होत नसल्याने तो परत आपल्या व्हिंगर गाडीकडे आला. तेव्हा गाडीतून सदर मुलगा बेपत्ता असल्याचे त्याला आढळले.

सदर बंद पडलेली मारुती व्हॅन ढकलण्यासाठी आलेल्यांपैकी आणखी एकाने त्या मुलाला बरोबर नेल्याचे उघड केले. सदर चालकाने लगेच आपल्या मालकाला त्यांचा मुलगा बेपत्ता झाल्याचे सांगितले. पोलीस स्थानकात तक्रार झाली. शोधाशोध सुरू झाली. तेवढय़ात 20 लाख रुपयांची खंडणी मागणारा फोन आला. या संशयित आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी जाळे रचले व त्यात सदर दोघे संशयित अडकले. या दोघांना झालेली जन्मठेपेची शिक्षा खंडपीठाने कायम केली आहे.

 

Related posts: