|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सिंधुदुर्ग » विमानोड्डाणासाठी अखेर ‘अल्टिमेटम’

विमानोड्डाणासाठी अखेर ‘अल्टिमेटम’ 

चिपी विमानतळ :  राज्य सरकारकडून कंपनीला निर्देश :  विमानतळ  30 एप्रिलला कार्यान्वित करा!

मुख्यमंत्री 18 रोजी देणार भेट : विमानतळाच्या कामाला गती

भूषण देसाई / परुळे:

केंद्र सरकारच्या ‘उडान’ योजनेंतर्गत सिंधुदुर्ग व रत्नागिरी विमानतळाचे कंत्राट मार्च 2019 मध्ये अलायन्स एअरला मिळाले. मात्र, दोन्ही विमानतळांवरून अद्याप सेवा सुरू होऊ शकलेली नाही. यामुळेच आता सिंधुदुर्ग जिल्हय़ातील परुळे-चिपी विमानतळावरील विमान उड्डाण सुरू होण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिलचा अल्टिमेटम संबंधित आयआरबी कंपनीला दिला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे 18 फेब्रुवारी रोजी चिपी विमानतळाला भेट देणार असून या दौऱयाअगोदर चार दिवस आधीच राज्याचे मुख्य सचिव अजय मेहता यांनी संबंधित कंपनीला अल्टिमेटम दिल्याने पुन्हा एकदा विमानतळाच्या कामाने गती घेतली आहे.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी सिंधुदुर्ग विमानतळाबाबत स्वतःहून लक्ष दिल्याने आता विमानतळावरील विमान उड्डाण सुरू होण्यासाठी राज्य सरकारने 30 एप्रिलचा अल्टिमेटम संबंधित आयआरबी कंपनीला दिला आहे. हे विमानतळ अद्यापही उड्डाणासाठी तयार नसल्याची कुठलीही कारणे चालणार नाहीत, असा थेट इशारा राज्याचे मुख्य सचिव मेहता यांनी कंपनीच्या अधिकाऱयांना नुकत्याच झालेल्या एका बैठकीत दिला आहे.

                मुख्य सचिवांकडून नाराजी व्यक्त

तत्कालीन हवाईमंत्री सुरेश प्रभू यांनी सिंधुदुर्ग विमानतळाचा समावेश ‘उडान’ योजनेत करून घेतला होता. याअंतर्गत केंद्र सरकारच्या एअर इंडियाची उपकंपनी असलेली अलायन्स एअर मुंबई ते सिंधुदुर्ग विमान सेवा देण्यास तयार आहे. यासंबंधी त्यांना कंत्राट मिळून अकरा महिने झाले आहेत. परंतु अद्यापही ही सेवा सुरू झालेली नाही. विमानसेवा सुरू करण्यासाठी संबंधित कंपनीला अद्यापही डीजीसीएकडून विमानतळ परवाना मिळू शकलेला नाही आणि याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे विमानतळाला भेट देणार असल्याने राज्याचे मुख्य सचिव यांनी कडक भूमिका घेत संबंधित कंपनीला अल्टिमेटम दिला आहे. वर्षापूर्वी तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विमानतळाच्या पॅसेंजर टर्मिनल इमारतीचे उद्घाटन करण्यात आले होते. अल्पकालावधीत विमानतळ सुरू होईल, अशी वल्गना करण्यात आली होती. मात्र, वर्ष लोटल्यावरही अद्याप विमानतळ उड्डाणासाठी सज्ज नसल्याबद्दल मुख्य सचिवांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी संबंधित कंपनीचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. उपस्थित अधिकाऱयांनी विलंब लागण्यासाठी होत असलेल्या अडचणी मुख्य सचिवांसमोर मांडल्या. मात्र, मुख्य सचिवांनी आक्रमक होत कुठलीही कारणे न देता लवकरात लवकर विमानतळ कार्यान्वित करा, असे आदेश दिले. संबंधित कंपनीकडूनच 30 एप्रिल ही तारीख देण्यात आली. त्यानुसार 30 एप्रिलपूर्वी कुठल्याही स्थितीत विमानतळाला परवाना मिळायला हवा व सिंधुदुर्ग विमानतळ विमान सेवेसाठी सज्ज असायला हवे, असे मुख्य सचिव यांनी सांगितल्याचे सुत्रांच्या माहितीनुसार समजते.

परुळे-चिपी विमानतळावर ई-सेवा उडान योजनेंतर्गत सुरू होत आहे. राज्यात महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनी (एमएडीसी) ही सरकारी कंपनी या योजनेची नोडल एजन्सी आहे. उडान अंतर्गत असलेल्या सेवा सुरू करण्यासाठी एमएडीसी कार्यक्षम आहे.

                 मुख्यमंत्री वरिष्ठ अधिकाऱयांशी करणार चर्चा

18 रोजी खुद्द मुख्यमंत्री विमानतळाला भेट देऊन वरिष्ठ अधिकाऱयांबरोबर  चर्चा करणार आहेत. चर्चेनंतर स्थानिक पदाधिकारी, पत्रकार यांच्याशी संवाद साधण्याची शक्मयता आहे. मुख्यमंत्र्यांचे सिंधुदुर्ग किल्ल्यावरून हेलिकॉप्टरने थेट विमानतळावर आगमन होणार आहे. यावेळी सुरक्षेच्या कारणास्तव कार्यकर्ते व पदाधिकाऱयांना अलिप्त ठेवण्याची शक्मयता आहे.

                 महाराष्ट्र दिनी पहिले व्यावसायिक उड्डाण?

डीजीसीएच्या परवान्यासाठी आवश्यक असलेली सर्व तयारी करून 30 एप्रिलपर्यंत विमानतळ सुरू करू, अशी ग्वाही संबंधित कंपनीकडून देण्यात आली आहे. तसे झाल्यास महाराष्ट्र दिनी म्हणजेच 1 मे रोजी जिल्हय़ाच्या विमानतळावरून पहिले व्यावसायिक विमान उड्डाण होईल, असे बोलले जात आहे. आयआरबी कंपनीकडून विमानतळ पूर्ण तयार करून ठेवण्यात आला आहे. मात्र, शासनाकडून देण्यात येणाऱया काही सोयीसुविधा अद्याप याठिकाणी न पोहोचल्याने विमान उड्डाणात अडचणी निर्माण होत आहेत. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व पालकमंत्री उदय सामंत यांनी यात जातीनिशी लक्ष घातल्याने आता तरी सिंधुदुर्गवासियांचे ‘गगन भरारी’चे स्वप्न साकार होणार का?, असा प्रश्न सर्वांच्या मनात आहे.

Related posts: